‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत सर्वत्र सदा !
या पृथ्वीवरील भरकटलेल्या अनेक जिवांपैकी आम्हीही एक होतो. या मायेतील जगात आम्ही आनंद शोधत होतो. प्रत्येक जण आनंदाच्या शोधात असतो; पण ‘मूळ आनंद कशात आहे ?’, याची जाणीव गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर तुम्ही आम्हाला सनातन संस्थेच्या माध्यमातून करून दिलीत. प्रारंभी सत्संग, अभ्यासवर्ग, जाहीर प्रवचने, यांद्वारे तुम्ही साधकांना मनुष्यजन्माच्या उद्देशाची जाणीव करून दिली आणि त्यांची ईश्वरप्राप्तीकडे, म्हणजेच आनंदप्राप्तीकडे वाटचाल चालू झाली. तुम्ही अध्यात्म समाजापर्यंत पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या माध्यमातून कार्य चालू केले. समर्थ रामदासस्वामी यांनी सांगितलेल्या ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’, या तत्त्वाप्रमाणे समाजाला अध्यात्मशास्त्र सांगण्यासाठी साधकांनी आपापल्या भागात सत्संग चालू केले, प्रवचने घेतली. यांच्या जोडीला ‘सनातन प्रभात’ नियतकालिके; अध्यात्म, धर्म, राष्ट्र आदी विषयांवरील सहस्रो ग्रंथांची निर्मिती; सनातनचे आश्रम आदींद्वारे सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू झाले. अध्यात्मप्रसाराचे हे कार्य एवढे व्यापक बनले आहे की, ते जाणल्यावर अनेक संतांनीही ‘असे कार्य केवळ अवतारी जीवच करू शकतो’, असे उद्गार काढले. नंतर जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनीही तुमच्या अवतारत्वाची जाणीव साधकांना करून दिली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर तुम्ही साधकांना ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय दिले. स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, नामजप, सत्संग, सेवा, त्याग, प्रीती अंतर्भूत असलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधकांनी समाजातील जिज्ञासूंपर्यंत पोचवला. ‘सनातन संस्था’ या नावाला एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे की, ‘सनातनचा साधक’ म्हटले की, समाजातील सर्वसामान्य व्यक्ती त्याच्याकडे आदराने पहाते. साधकांचे वागणे, चालणे-बोलणे पाहूनच समाज ‘हा सनातनचा साधक आहे’, हे ओळखतो. ही सर्व किमया सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर तुमचीच ! सनातन संस्थेच्या स्थापनेद्वारे तुम्ही आमच्यावर अपार कृपा केली आहे. ‘तुम्हाला अपेक्षित अशी आध्यात्मिक प्रगती करणे’, हा एकच ध्यास आम्हाला लागू दे. या घोर कलियुगात सनातन संस्थेच्या संपर्कात आम्ही आलो आणि साधना करायची आम्हाला सद्बुद्धी झाली, हीसुद्धा आम्हावर तुमचीच कृपा आहे.
‘सनातन संस्था’ हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचेच एक रूप असून ‘अधिकाधिक जिज्ञासू सनातन संस्थेशी जोडले जाऊन त्यांना साधना करण्याची स्फूर्ती मिळो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !
– सनातन संस्थेचे सर्व सद्गुरु, संत आणि साधक यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अर्पण