नगर जिल्ह्यातील मावलया डोंगरावर प्रथमच अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे सापडले पुरावे !
इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांनी केले संशोधन
केडगाव (अहिल्यानगर) – पुणे-अहिल्यानगर महामार्गापासून आत ३ कि.मी.वर असलेल्या कामरगावजवळील मावलया डोंगरावर अश्मयुगीन अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांनी गेले महिनाभर केलेल्या संशोधनातून डोंगरावरील अवशेष हे अश्मयुगीन असल्याचे लक्षात आले आहे. नगर जिल्ह्यात प्रथमच असे शिल्प सापडले आहे.
कामरगावच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग आहे. यातील विठ्ठलवाडीकडून अस्तगावच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरील एका टेकडीला मावलयाचा डोंगर म्हणतात. या ठिकाणी सोनवणे यांना काही उभ्या शिळा ठेवलेल्या दिसल्या. त्यांचा बारकाईने अभ्यास केला असता, ही वेगळीच रचना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतिहास अभ्यासक प्रा. टी. मुरुगेश यांच्या मतानुसार हे इतिहास पूर्वकालीन थडगे असावे. त्यानुसार आणखी निरीक्षण करण्यासाठी दुसर्यांदा गेल्या १० मार्चला त्यांनी पुन्हा भेट दिली. या वेळी त्यांना काही पुरावे सापडले. त्यात ७ उभ्या शिळा होत्या, यांची मावलया नावाने पूजा केली जात आहे. या शिळांचा आकार वेगवेगळा असून त्यावर स्थानिक लोकांनी शेंदूर लावला आहे. सर्वांत महत्त्वाचा पुरावा म्हणजे मानवी प्रतिमा असलेली शिळा (कातळ शिल्प) !
यातील एका शिळेवर एका ४ पायांच्या प्राण्यावर बसलेल्या मानवाचे चित्र दगडावर कोरलेले आहे. चित्राची उंची साधारणतः २० से.मी. आहे आणि रुंदी १५ से.मी. आहे. ज्या प्राण्यावर माणूस बसलेला आहे, त्याची मान उंच आहे. यावरून तो घोडा किंवा उंट असावा असा अंदाज आहे. यातील माणूस वारली चित्राप्रमाणे भासतो. डोके वर्तुळाकृती, छाती आणि पोटांच्या जागी दोन त्रिकोण अशी रचना आहे.