भारती विद्यापिठातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्याकडून गंभीर नोंद !
घटनेची सखोल चौकशी करून आरोपपत्र प्रविष्ट करण्याची पोलिसांना सूचना !
पुणे – येथील भारती विद्यापिठातील वसतीगृहातील एका विद्यार्थिनीने खोलीत सोबत असलेल्या मुलीच्या त्रासाला कंटाळून आणि विद्यापिठाच्या उपाहारगृहामधील मुलाच्या एकतर्फी प्रेम प्रकाराला घाबरून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी गंभीरपणे नोंद घेतली. ‘याविषयी संबधित पोलीस अधिकार्यांशी दूरभाषद्वारे संवाद साधला असून, अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, या घटनेच्या वस्तूस्थितीमध्ये जाऊन त्याविषयीचे योग्य ते आरोपपत्र पोलिसांनी प्रविष्ट करावे’, अशा प्रकारच्या सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण संवेदनशील अधिकारी करत असल्याचे उपसभापती डॉ. गोर्हे यांनी सांगितले.
डॉ. गोर्हे यांनी सांगितले की,
१. साधारण ४ दिवसांपूर्वी या मुलीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर तिचे दुर्दैवी निधन झाले. मुलीच्या पहिल्या मृत्यूपूर्व पत्रामध्ये तिने ‘परीक्षेचा ताण असह्य झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला’, असे म्हटलेले आहे. दुसर्या मृत्यूपूर्व पत्रामध्ये ‘रूममेट आणि उपाहारगृह कर्मचार्याने त्रास दिला’, असे म्हटलेले आहे.
२. विद्यापिठाच्या वसतीगृहामध्ये विद्यार्थी जेव्हा रहातात, त्या वेळी त्यांना काही बंधने पाळावी लागतात, तसेच शासनाच्या कायद्याप्रमाणे सर्वांना वागावे लागते. शासनाच्या छळ प्रतिबंधक कायदा आणि कामाच्या ठिकाणी होणार्या लैैंगिक शोषणाच्या विरोधी कायदा हे सर्व वसतीगृहाला लागू आहेत. आपल्याला कुणी त्रास दिला, तर कुणाकडे तक्रार करायची याविषयी सविस्तर मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.
३. पालकांचा अभ्यासासाठी दबाव, वसतीगृहात आल्यावर विद्यार्थ्यांना आलेला एकटेपणा या सगळ्यामुळे मुलं-मुली पुष्कळ तणावामध्ये असतात. अशा वेळेला कुटुंबियांनीही स्वत:च्या पाल्याचे समुपदेशन करणे आवश्यक आहे.
४. या मुलीच्या ज्या मित्र किंवा मैत्रिणी यांना तिच्या मानसिक अवस्थेविषयी काही माहीत असेल, त्यांची नावे गुप्त ठेवून आणि त्यांना आवश्यक संरक्षण पुरवून माहिती गोळा करावी. अशा प्रकारच्या सूचनाही पोलिसांना दिलेल्या आहेत.