पिंपरी (पुणे) येथील रेल्वेच्या सेवानिवृत्त ‘ट्रॅकमन’कडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती !
केंद्रीय गुन्हे अन्वेषणकडून गुन्हा नोंद, एका वर्षासाठी ‘तडीपार’ केले होते !
पिंपरी (जिल्हा पुणे) – भारतीय रेल्वे विभागातून सेवानिवृत्त ‘ट्रॅक मेंटेनर’ मल्लीनाथ नोल्ला यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आढळली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याने त्यांच्या विरोधात ‘केंद्रीय गुन्हे अन्वेषण’ने (सी.बी.आय.ने) गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. (सरकारी कर्मचार्यास प्रतिवर्षी मिळकतीचे विवरणपत्र सादर करावे लागते. तेव्हाच ही गोष्ट आढळून का आली नाही ? – संपादक)
नोल्ला हे पुणे येथील खडकी रेल्वेस्थानकामधून ऑगस्ट २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली. त्यामध्ये ६ सदनिका, ६ दुचाकी आणि १ चारचाकी गाडी यांचा समावेश आहे. ही संपत्ती २ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. नोल्ला यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आणि पुणे ग्रामीण पोलीस यांकडे गुन्हे नोंद आहेत. त्यांना १ वर्षाकरता तडीपार केले होते. (अशा गुन्हेगाराला वेळीच बडतर्फ का केले नाही ? – संपादक)