नवी मुंबईत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
नवी मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच, नवी मुंबई यांच्या वतीने आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २२ मार्च या दिवशी बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे ‘स्पेशल स्क्रीनिंग’ करण्यात आले. चित्रपटाला सावरकरप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषकरून युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, सावरकर यांच्या नात असिलताताई राजे, नितीन राजे, स्मारक समितीच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, ‘सावरकर विचार मंच नवी मुंबई’चे अध्यक्ष संतोष कानडे, डॉ. राजेश म्हात्रे, डॉ. वैशाली म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेश नाईक म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्ययोद्धे होते. त्यांच्या उत्तुंग कार्याला या चित्रपटातून न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रप्रेमी नागरिक हा चित्रपट पाहिल्याविना राहू शकत नाही.
रणजीत सावरकर यांनी सांगितले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना जातीपाती विरहित समाजरचना अपेक्षित होती. त्यांचे कार्य आजही अपूर्ण असून आपल्या सर्वांना ते पूर्ण करायचे आहे.’’
‘या चित्रपटांमधून सावरकरांविषयीची वास्तविकता पहावयास मिळाली. सावरकरांची देशासाठीची तळमळ दिसून येते. प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा’, असे आवाहन डॉ. संजीव नाईक यांनी केले आहे.