होळी म्हणजेच मदनाचे दहन !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
होळीला महाराष्ट्रात ‘शिमगा’ म्हणतात. (दक्षिणेत होळीला ‘कामदहन’ म्हणतात. ‘हुताशनी’, ‘दौलयात्रा’, अशीही होळीला नावे आहेत.) देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची. बहुधा गावाच्या ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते. मध्यभागी एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्याभोवती गोवर्या आणि लाकडे रचतात. नंतर व्रतकर्त्याने स्नान करून ‘ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं समस्तपीडापरिहारार्थं होलिकापूजनम् अहं करिष्ये ।’ असे म्हणून आणि नंतर ‘होलिकायै नम:।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवायची. त्यानंतर होळीची प्रार्थना करायची…
वन्द़ितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥
अर्थ : हे धुळी, तू ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना वंद्य आहेस, तू आम्हाला ऐश्वर्य दे अन् आमचे रक्षण कर.
भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधीत होते. त्या वेळी मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. आपणाला कोण चंचल करतो आहे; म्हणून शंकरांनी डोळे उघडले आणि मदनाला पहाताच क्षणी जाळून टाकले. त्या मदनाचे दहन होळी पौर्णिमेला दक्षिणेत करतात. होळी म्हणजेच मदनाचे दहन आहे. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी