संपादकीय : ‘साधे’पणामागील भ्रष्ट चेहरा !
हलीत २१ मार्चला रात्री ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अटक केली. एखाद्या मुख्यमंत्र्यांचे नाव घोटाळ्याच्या प्रकरणात घेतले जाणे, हे काही देशासाठी नवीन नाही. अनेक मंत्र्यांंचे हात अशा प्रकारे घोटाळे, भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांत बरबटलेले असतातच; पण मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तींना अटक होणे हे देशासाठी, पर्यायाने देशाच्या राजधानीच्या दृष्टीने लाजिरवाणे ठरते. साधा, सोज्वळ, प्रामाणिक चेहरा घेऊन राजकारणात प्रवेश केलेल्या ‘आम आदमी पक्षा’चे या सोज्वळतेमागील खरे रूप गेल्या काही वर्षांपासून सर्वांसमोर उघड होत आहे. आता केजरीवाल यांच्या अटकेमुळे त्यांच्या साधेपणाचा बुरखा पूर्णपणे फाटला आहे. केजरीवाल यांची स्थिती फुगणार्या बेडकाप्रमाणेच झाली होती. तो फुगा फुटण्याची वेळ आलीच होती. शेवटी २१ मार्चला तसे घडलेच ! ‘आम्ही स्वच्छ आहोत’, ‘चारित्र्यवान आहोत’, असे म्हणणार्यांची अनैतिकता चव्हाट्यावर आली. ‘स्वच्छ’ राजकारणाचे स्वप्न बाळगून राजकीय पक्ष स्थापन केलेल्या केजरीवालांनी स्वतःच स्वतःचे स्वप्न धुळीला मिळवले आहे. केजरीवाल यांना ज्या प्रकरणात अटक झाली आहे, ते प्रकरण वर्ष २०२१ मध्ये केजरीवाल सरकारने सादर केलेल्या देहलीच्या नवीन मद्यविक्री धोरणाशी संबंधित आहे. यातील विविध गोष्टींमध्ये घोटाळा झाल्याचे समजते. यात वाद वाढल्यानंतर हे धोरण रहित करण्यात आले. हे प्रकरण सुमारे १०० कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले आहे. आता केजरीवालांची चौकशी होईल, आरोप-प्रत्यारोप होतील, न्यायालयीन कामकाज पार पडेल, त्यानंतर काय घडेल, याची संपूर्ण देशालाच उत्सुकता आहे. केजरीवाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीने त्यांना ९ वेळा समन्स बजावले होते; मात्र केजरीवाल एकदाही चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. काही वर्षांपूर्वी याच केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘हुकूमशहा’ असे संबोधले होते. ९ वेळा समन्स बजावूनही त्याला उपस्थित न रहाणार्या केजरीवालांना कुणी ‘हुकूमशहा’ संबोधले, तर चुकले कुठे ? देशाच्या राजधानीतील मुख्यमंत्रीच जर कायद्याला अशा प्रकारे धुडकावत असतील, तर सुव्यवस्था रहाणार तरी कशी ? केजरीवालांच्या उद्दामपणाचा हा अतिरेकच आहे. जर केजरीवाल यांना स्वतःवरील आरोप मान्य नाहीत, तर मग चौकशीला टाळण्याचा पळपुटेपणा त्यांनी केलाच का ? म्हणजेच यात काहीतरी गौडबंगाल आहे, हे निश्चित ! असे पळपुटे, उद्दाम आणि कायदे वाकवणारे मुख्यमंत्री देहलीला लाभणे लाजिरवाणेच आहे. सूज्ञ आणि सुजाण नागरिकांनी याचा अवश्य विचार करावा.
बोलाची कढी आणि बोलाचाच भात !
देशात सर्वांसमोर येत असतांना आधी आंदोलनांच्या माध्यमातून केजरीवालांनी मागणी केली होती की, देशात असा कायदा आणायला हवा की, ज्यात देशातील मोठ्यात मोठ्या भ्रष्टाचारी नेत्यालाही अटक होईल. त्यांच्या या मागणीची पूर्तता त्यांनी स्वतःच केली आहे आणि स्वतःचे वाक्य खरे करून दाखवले आहे ! ‘देशात होणार्या वर्ष २०२४ च्या निवडणुकीत ‘देश एक क्रमांकाचा बनवणे, हे आमचे लक्ष्य आहे. आम्ही राजकारण करून सत्ता स्थापन करण्यासाठी नाही, तर देश घडवण्यासाठी आलो आहोत’, अशी मुक्ताफळेही केजरीवाल यांनी मागील वर्षी उधळली होती. देशाला घडवणे तर दूरच; पण मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला अटक होणे, तसेच देहलीची झालेली दुर्दशा यांवरूनच देश बिघडला असल्याची पोचपावती मिळते. केजरीवाल यांनी याआधीही अनेक वचने दिली होती; मात्र त्यांतील किती वचनांची त्यांनी पूर्तता केली, हा अभ्यासाचाच विषय ठरेल.
केजरीवालांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांनी ‘व्यक्ती जसे कर्म करते, तसे तिला फळ मिळते’, अशा आशयाचा संदेश ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केजरीवाल यांच्या अटकेला विरोध करत सरकार विरोधकांना लक्ष्य करत असल्याचे सांगितले आणि संताप व्यक्त केला. अनेकांनी या प्रकरणी केंद्रशासनावर टीका करत केजरीवालांचे समर्थन केले आहे; पण त्यांपैकी कुणीही केजरीवाल यांना ‘तुम्ही समन्सना उत्तरे का दिली नाहीत ? टाळाटाळ का केली ?’ अशी विचारणा करत नाही. काँग्रेसचे राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांवर ‘घाबरलेला हुकूमशहा’ अशी टीका केली आहे.
‘जे केले, ते कधी ना कधी फेडावे लागतेच. सत्य कटू असले, तरी केजरीवालांना पाठीशी घालू पहाणार्यांना ते स्वीकारावेच लागणार आहे’, हे त्यांनी लक्षात ठेवावे. देहलीत जरी ‘आप’चे सरकार असले, तरी हा प्रदेश केंद्रशासित असल्याने तेथे केंद्रशासनाचे नियंत्रण आहे. त्यामुळे केंद्रशासनावर टीका करणारे स्वतःचेच हसे करून घेत आहेत. केजरीवालांचे उघडपणे समर्थन करणार्यांचाही या प्रकरणात सहभाग नसेल कशावरून ? अशी शंका कुणाच्याही मनात येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी !
घोटाळेबाजांची शृंखला !
देहलीतील मद्य घोटाळा प्रकरणात आतापर्यंत आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.सी.आर्. यांची कन्या के. कविता यांना अटक करण्यात आली आहे. के. कविता हिचे सनदी लेखापाल असलेले बुचीबाबू गोरंतला यांनाही या प्रकरणी अटक केली होती. सीबीआयने कविता यांच्यावर मद्य धोरण प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप केला आहे.
वरकरणी आपल्याला इतकीच नावे दिसत आहेत; पण यात आणखी घोटाळेबाजही दडलेले असू शकतात, तसेच ही सर्व नावे आणि त्यांचा अन्यांशी असलेला संबंध पहाता यात मोठ्या नेतेमंडळींचाही परस्परसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणे क्रमप्राप्त आहे. देशातील सर्वच घोटाळेबाजांची जागा ही कारागृहात आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते; कारण भ्रष्टाचाराची कीड देशाला आतून पोखरते. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. अशांचे घोटाळे बाहेर काढायला हवेतच; मात्र त्यासह त्यांची बँक खाती गोठवून त्यांनी मिळवलेला पैसा सरकारच्या तिजोरीत जमा व्हायला हवा. पूर्वी भ्रष्टाचार्यांच्या प्रकणात राजकारण्यांना अटक होत नव्हती. आता अटक होते. त्याचा पुढील टप्पा म्हणजे जलद गती न्यायालयात अशांच्या विरोधात खटला चालवून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. असे झाले, तर देश भ्रष्टाचारमुक्त व्हायला वेळ लागणार नाही.
उद्दाम वर्तन करून कायदे वाकवणारे नव्हे, तर कायद्यांच्या पालनाने जनतेसमोर आदर्श निर्माण करणारे आदर्श मुख्यमंत्री हवेत ! |