होलिका दहनाचे अध्यात्मशास्त्र आणि महत्त्व !
उद्या (२४ मार्च २०२४ या दिवशी) ‘हुताशनी पौर्णिमा’ (होळी) आहे. त्या निमित्ताने..
सण, धार्मिक उत्सव आणि व्रते हे हिंदु धर्माचे एक अविभाज्य अंग आहेत. आज सणानिमित्त केवळ चांगले कपडे परिधान करणे, चांगले भोजन करणे, हीच सण साजरा करण्याची पद्धत झाली आहे; परंतु आमचे सण साजरे करण्यामागे विशेष नैसर्गिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारण असते. आमच्या प्रत्येक सणामागे एक अलौकिक असे धर्मशास्त्र आहे, ज्याचे पालन केल्यामुळे आम्हाला आध्यात्मिक लाभ होतात. त्यामुळे सण, धार्मिक उत्सव आणि व्रत साजरे करण्याचा शास्त्राधार समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शास्त्रानुसार धार्मिक कृती करून सण साजरा केल्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात अनेक लाभ होतात. यामुळे संपूर्ण समाजाची आध्यात्मिक उन्नती होते. आजच्या लेखात फाल्गुन पौर्णिमेला येणारी ‘होळी’ ही धर्मशास्त्रानुसार कशी साजरी करावी ? आणि त्यामुळे होणारे अनन्यसाधारण लाभ यांची माहिती येथे देत आहे.
१. भारतात होळी साजरी करण्याची पद्धत, तिची विविध नावे आणि त्या निमित्ताने करावयाचा संकल्प
होळी फाल्गुन पौर्णिमेला करतात. प्रांतानुसार फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत ५ दिवसांत, काही ठिकाणी २ दिवस, तर काही ठिकाणी ५ दिवसांसाठी हा ‘होलिकोत्सव’ साजरा केला जातो. उत्तर भारतात हा उत्सव ‘होरी’, ‘डोल यात्रा’ या नावाने, तर गोवा आणि महाराष्ट्रात ‘शिमगा’, ‘होळी’, ‘हुताशनी महोत्सव’ किंवा ‘होलिका दहन’ या नावाने, बंगालमध्ये ‘डोल यात्रे’च्या नावाने आणि दक्षिणेमध्ये ‘काम दहन’च्या नावाने ओळखली जाते. उत्तर भारतात होळीच्या ३ दिवस आधी श्रीकृष्णाला पाळण्यात झोपवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी पुतना राक्षसिणीची प्रतिकृती बनवून तिला रात्री जाळतात. दक्षिणेत लोक कामदेवाच्या दहनाप्रित्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती बनवून त्याचे दहन करतात. मदनाला जिंकण्याची क्षमता होळीमध्ये आहे, यासाठी होळीचा उत्सव असतो.
‘होळी हा दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव आहे. विकारांना जाळून नव्या उत्साहाने सत्त्वगुणाकडे अग्रेसर होण्यासाठी सिद्ध व्हावे’, असा संदेश देणारा हा सण आहे. ‘वृक्षरूपी समिधा अग्नीमध्ये अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे’, या उदात्त भावाने होळी साजरी केली जाते.
२. त्रेतायुगात प्रथम यज्ञाच्या स्मरणार्थ करण्यात आली होळी !
होळी ही अग्निदेवतेच्या उपासनेचेच एक अंग आहे. या दिवशी अग्निदेवतेची पूजा केल्यामुळे व्यक्तीला तेजतत्त्वाचा लाभ होतो. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या ५ तत्त्वांच्या साहाय्यामुळे देवतेचे तत्त्व पृथ्वीवर प्रकट करण्यासाठी यज्ञ हे एक माध्यम आहे. प्रथम त्रेतायुगात परमेश्वराद्वारे एकाच वेळी ७ ऋषिमुनींना स्वप्नदृष्टांताद्वारे यज्ञाचे ज्ञान झाले. त्यांनी यज्ञाची सिद्धता आरंभ केली. नारदमुनींच्या मार्गदर्शनानुसार यज्ञाचा आरंभ झाला. मंत्रघोषासह सर्वांनी विष्णुतत्त्वाचे आवाहन केले. यज्ञाच्या ज्वालांसह यज्ञकुंडामध्ये विष्णुतत्त्व प्रकट होऊ लागले. यामुळे पृथ्वीवर असलेल्या अनिष्ट शक्तींना त्रास होऊ लागला आणि त्यांच्यामध्ये गोंधळ माजला. त्यांना आपल्याला होणार्या त्रासाचे कारण लक्षात येत नव्हते. हळूहळू श्रीविष्णु संपूर्ण रूपात प्रकट झाले आणि ऋषिमुनींसह तेथे उपस्थित सर्व भक्तांना श्रीविष्णूचे दर्शन झाले. त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा होती. अशा प्रकारे त्रेतायुगात प्रथम यज्ञाच्या स्मरणार्थ होळी साजरी केली जाते.
३. होळीच्या संदर्भातील शास्त्र आणि पुराणामध्ये सांगितलेल्या कथा
होळीच्या संदर्भात शास्त्र आणि पुराण यांमध्ये अनेक कथा प्रचलित आहेत.
अ. भविष्यपुराणात एक कथा आहे. पूर्वीच्या काळी ‘ढूंढा’ नावाची राक्षसीण गावात घुसून लहान मुलांना त्रास देत होती. ती रोग निर्माण करत होती. तिला गावाच्या बाहेर हाकलण्यासाठी लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; परंतु ती काहीही करून जात नव्हती. नगरातील मुलांना त्रास देणार्या ढूंढा नावाच्या राक्षसिणीचा प्रतिकार कसा करावा ? याविषयी नारदमुनींनी सम्राट युधिष्ठिराला उपाय सांगितला की, सुकलेली लाकडे आणि वाळलेल्या गोवर्या यांचा ढीग रचून ‘राक्षोघ्न’, म्हणजे राक्षसांचा नाश करणार्या मंत्रांसह अग्नी प्रज्वलित करावा. अग्नीला ३ प्रदक्षिणा घालून आनंदाने टाळ्या वाजवाव्यात आणि हसावे. अशी कृती केल्यामुळे पापी राक्षसिणीची शक्ती क्षीण होऊन ती तेथून निघून जाते. भविष्य पुराणात याचा उल्लेख केला आहे. यामध्ये होळीला प्रदक्षिणा करतांना शिव्या देण्यास सांगितलेले नाही.
आ. आणखी एक पौराणिक कथा आपण सर्वांना ठाऊक आहे. दानवराज हिरण्यकश्यपूने जेव्हा पाहिले की, त्याचा पुत्र प्रल्हाद केवळ भगवान विष्णूचेच भजन करतो. दुसर्या कुणालाही भजत नाही. तेव्हा तो क्रोधित झाला. शेवटी त्याने आपली बहीण होलिकेला आदेश दिला की, तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे; कारण की, होलिकेला वरदान प्राप्त झाले होते की, तिला अग्नी काहीच हानी पोचवू शकत नाही; परंतु प्रत्यक्षात घडले अगदी याच्या विपरीत ! होलिका जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हादाला काहीच झाले नाही. या घटनेच्या स्मरणार्थ या दिवशी ‘होलिका दहन’ करण्याचे विधान आहे. होलिकेचा अंत झाल्यामुळे आनंद स्वरूपात ही होळी साजरी केली जाते.
होळीचे पर्व असा संदेश देते की, ईश्वर आपल्या अनन्य भक्तांच्या रक्षणासाठी नेहमीच सज्ज असतो.
४. होळीमध्ये वापरण्यात येणार्या विशिष्ट झाडांच्या लाकडांचे महत्त्व
काही ठिकाणी होळीचा उत्सव साजरा करण्याची सिद्धता एक मास आधीच आरंभ केली जाते. यामध्ये मुले घरोघरी जाऊन लाकडे गोळा करतात. पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या पूजेपूर्वी ती लाकडे विशिष्ट पद्धतीने रचली जातात. त्यानंतर तिची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर त्यात अग्नी प्रज्वलित केला जातो. होळीमध्ये जे ऊसाचे लांबलचक कांड ठेवले जाते, ते तेजतत्त्वाला प्रवाहित करून वायुमंडल शुद्ध करते. यासह एरंडाचे एक लाकूड असते, त्यातून निघणार्या धुरामुळे अनिष्ट शक्तींद्वारे वातावरणात प्रक्षेपित करण्यात आलेला दुर्गंधयुक्त वायू नष्ट होतो. सुपारीच्या लाकडाच्या साहाय्याने तेजतत्त्वाच्या कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये वृद्धी होते. त्यामुळे या झाडांची लाकडे त्यासाठी गोळा करतात.
५. होळीच्या रचनेची आणि विधीची योग्य पद्धत
सामान्यत: ग्रामदेवतेच्या देवालयासमोर होळी करावी. जर ते शक्य नसेल, तर योग्य सुविधायुक्त स्थान निवडावे. ज्या ठिकाणी होळी जाळायची असेल, ते ठिकाण सूर्यास्तापूर्वी झाडून स्वच्छ करावे. नंतर त्यावर शेणाच्या पाण्याचा सडा घालावा.
सायंकाळी आणि रात्री होळी पेटवतांना श्री होलिकापूजनाचे स्थान शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढून ते सुशोभित करावे. मध्यभागी एरंड, सुपारी किंवा ऊसाचे कांड उभे करून त्याच्या भोवती गोवर्या आणि सुकलेली लाकडे रचावीत. पूजा करणार्याने शुचिर्भूत होऊन आणि देशकालाचा संकल्प करून पूजा करावी. नंतर नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर ‘होलिकायै नमः ।’, असे म्हणून होळी पेटवावी. होळी पेटवल्यानंतर प्रदक्षिणा घालाव्यात आणि तोंडावर उलटा हात ठेवून ओरडावे (बोंब मारावी). श्री होलिकादेवीला पुरणपोळीचा नैवेद्य आणि नारळ अर्पण करावा. तेथे एकत्रित आलेल्या लोकांना तो प्रसाद आणि फळे वाटावीत. होळी पूर्ण जळल्यानंतर त्यावर दूध आणि तूप शिंपडून तिला शांत करावे. अशा प्रकारे हा होळीचा विधी आहे.
होळीमध्ये गायीच्या शेणाने बनवलेल्या गोवर्यांचा उपयोग करावा. गायीमध्ये ३३ कोटी देवतांचा वास असतो. ब्रह्मांडात विद्यमान असलेल्या सर्व देवतांच्या तत्त्वतांना आकृष्ट करण्याची सर्वाधिक क्षमता गायीमध्ये असते. गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवर्यांमधून ५ टक्के सात्त्विकतेचे प्रक्षेपण होत असते.
६. होळीच्या रचनेचा आकार शंकुसारखा असण्यामागील कार्यकारणभाव
शंकुसारख्या आकारात येणार्या अग्नीचे तेजतत्त्व भूमंडळावर येत असते. त्यामुळे पाताळातून भूगर्भाच्या दिशेने प्रक्षेपित होणार्या त्रासदायक स्पंदनांपासून भूमीचे रक्षण होते. या रचनेमुळे आलेल्या तेजामुळे तेथील स्थानदेवता, वास्तुदेवता आणि ग्रामदेवता यांसारख्या देवतांचे तत्त्व जागृत होते. त्यामुळे वातावरणातील अनिष्ट शक्तींचे उच्चाटन सहजतेने साध्य करता येते. या तेजाच्या संपर्कात येणार्या व्यक्तीची मनःशक्ती जागृत होण्यात साहाय्य लाभते. त्यामुळे त्याची कनिष्ठ स्वरूपातील मनोकामना पूर्ण होते आणि व्यक्तीला मनोवांच्छित फलप्राप्ती होते.
७. होळी प्रज्वलित केल्यानंतर जोरजोरात ओरडतात (बोंब मारतात) या कृतीमागील शास्त्र
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, होळी प्रज्वलित केल्यानंतर ओरडण्याची (बोंब मारण्याची) कृती योग्य प्रकारे केली, तर त्याचा लाभ होतो आणि जर ती कृती विकृत पद्धतीने केली, तर त्याचे दुष्परिणाम होतात.
होळी प्रज्वलित केल्यानंतर व्यक्तीकडून भावपूर्ण प्रार्थना आणि नामजप केल्यावर तिच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी वलय निर्माण होते. ओरडण्याची कृती करतांना शक्तीचे गोळे आणि नाद यांचे वलय निर्माण होते. वातावरणात शक्ती आणि चैतन्य यांचे प्रसरण होते. त्यामुळे पृथ्वी, वायु आणि आकाश या तत्त्वांच्या माध्यमातून ध्वनीतरंग वातावरणात पसरतात आणि अनिष्ट शक्ती दूर फेकल्या जातात. ओरडण्याची कृती केल्यामुळे व्यक्तीच्या देहाच्या चहूबाजूंनी आलेले त्रासदायक (काळे) आवरण आणि देहात असलेली त्रासदायक शक्ती बाहेर फेकली जाते अन् ती नष्ट होते; परंतु ओरडण्याची कृती विकृतीकडे झुकू नये, यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे.
होळी पेटवल्यानंतर तोंडावर उलटा हात ठेवून ओरडण्याच्या कृतीचे विकृतीकरण करणार्या व्यक्तीमध्ये तीव्र अहंकार असतो. अशा व्यक्तीच्या देहात चहूबाजूंनी त्रासदायक दाट आवरण निर्माण होते. ओरडण्याची कृती करतांना विकृत आवाज काढल्यामुळे आणि अपशब्द बोलणे यांसारख्या कृतींमुळे तमोगुणी त्रासदायक वलयाची निर्मिती होते अन् त्याद्वारे वातावरण दूषित होते. त्याचे अस्तित्व दीर्घकाळापर्यंत टिकते. यावरून स्पष्ट झाले असेल की, विकृत पद्धतीने ओरडणे, म्हणजे मंत्रोच्चारण आणि देवतापूजन या पवित्र गोष्टींचा अनादर करणेच आहे. त्यामुळे आपल्याला देवतेची कृपा कशी प्राप्त होणार ? त्यामुळे शास्त्र समजून घेऊन मनात देवतेप्रती भाव ठेवून योग्य कृती करण्याचे भान आम्हाला ठेवलेच पाहिजे आणि इतरांनाही याविषयी धर्मशिक्षित केले पाहिजे.
यासह होळीसाठी बळजोरीने वर्गणी गोळा करणे, होळीच्या ठिकाणी मोठ्या आवाजात सिनेसंगीत लावणे, विकृत रूपात नाचणे इत्यादी जे अयोग्य प्रकार होळीत होतात, ते रोखण्यासाठीही आम्हीच प्रयत्न केले पाहिजेत. होळी म्हणजे मनोरंजन नाही, तर तो एक सण आहे. त्याचा आनंद घ्यावा, त्याचा आध्यात्मिक लाभ करून घ्यावा. जे अयोग्य प्रकार करतात, त्यांचे विनम्रतेने प्रबोधन करून ते थांबवावे.’
८. कृतज्ञता
अग्निच्या तेजासह मानवी जीवनात आनंद आणि उत्साह आणणारा होळीचा उत्सव सर्वांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. हा सण आनंदाने साजरा करण्यासह अध्यात्म शास्त्रानुसारही साजरा केला, तर त्याचा अधिक लाभ होतो, हे जाणून त्यानुसार कृती केली, तर होलिकादेवीची कृपा होईल. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने केलेले हे लिखाण त्याच्याच चरणी अर्पण करतो.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
होळीत लाकडे जाळण्याला कथित पर्यावरणवाद्यांकडून होणारा विरोध हा निव्वळ हिंदुद्वेषच !
आजकाल हिंदु धर्मविरोधी आणि स्वतःला ‘पर्यावरणवादी’ म्हणवणारे म्हणतात की, होळीमध्ये लाकडे जाळणे चुकीचे आहे; परंतु आज ज्या इमारती बनत आहेत आणि कागद बनवण्यासाठी जी जंगलतोड होत असते, त्या संदर्भात ते मूग गिळून गप्प बसतात. वनभूमीवर मानवनिर्मित जे अतिक्रमण केले जात आहे, त्यासाठी बेकायदेशीरपणे जंगले नष्ट केली जात आहेत. सरकारी योजनांसाठी वनसंपदा नष्ट केली जात आहे, यावर ते कुणीही आक्षेप का घेत नाहीत ? सुकलेली आणि तुटलेली लाकडे गोळा करून होळी जाळण्यावरच त्यांचा आक्षेप असतो. हा निव्वळ हिंदुद्वेष आहे.
होळीमध्ये पुरणपोळी अर्पण करण्याचे महत्त्व आणि अंनिसवाल्यांकडून केले जाणारे वैचारिक आक्रमण !
होलिकादेवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि होळीमध्ये अर्पण करण्यासाठी शिजवून घेतलेली हरभर्याची डाळ आणि गुळाचे मिश्रण, ज्याला महाराष्ट्रात ‘पुरण’ असे म्हणतात. ते भरून गोडपोळी म्हणजेच पुरणपोळी बनवली जाते. या पोळीचा नैवेद्य म्हणून ती होळी प्रज्वलित केल्यानंतर त्यात समर्पित केली जाते. होळीमध्ये अर्पण करण्यासाठी नैवेद्याच्या घटकांमध्ये तेजोमय तरंगांना अतीजलद गतीने आकृष्ट करणे, ग्रहण करणे आणि प्रक्षेपित करणे यांची क्षमता असते. या घटकांद्वारे प्रक्षेपित सूक्ष्म वायूमुळे नैैवेद्य दाखवणार्या व्यक्तीच्या देहातील पंचप्राण जागृत होतात. त्या नैवेद्याला प्रसादाच्या स्वरूपात ग्रहण केल्यामुळे व्यक्तीची सूर्यनाडी कार्यरत होऊन तिला कार्य करण्यासाठी बळ प्राप्त होते.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संस्थेचे कार्यकर्ते गरिबांसाठी स्वतः काहीही न करणारे बुद्धीवादी असा चुकीचा प्रचार करतात की, होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याऐवजी ती गरिबांना दान करावी; परंतु हे योग्य नाही. दानामुळे पुण्य अवश्य लाभते; परंतु ‘दानही ‘सत्पात्रे दानम्’ झाले पाहिजे’, असे शास्त्रात सांगितले आहे. भावपूर्ण नैवेद्य अर्पण केल्यामुळे अर्पणकर्त्याला लाभ होतात. बुद्धीवादी एका बाजूला धर्म मानत नाहीत; परंतु दुसरीकडे धर्मासंदर्भात द्वेषपूर्ण गोष्टी पसरवण्यात पुढे सरसावतात. हे हिंदूंच्या धार्मिक कृतींना रोखणारे एक प्रकारे वैचारिक आक्रमणच आहे.
– श्री. रमेश शिंदे
संपादकीय भूमिकाहोळीत पुरणपोळी अर्पण करण्यावरून कांगावा करणारे कथित बुद्धीवादी प्रतिदिन उपाहारगृहातून अन्नाच्या नासाडीवर काही बोलतील का ? |