ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा देवाप्रती असलेला भोळा भाव !
२२.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘पू. राजाराम नरुटे (पू. नरुटेआबा) यांची देवभक्ती आणि ‘देवच सर्व करून घेतो’, हा भाग पाहिला. आजच्या भागात ‘त्यांनी प्रपंच आणि परमार्थ कसा केला ?’, याविषयी जाणून घेऊया. (भाग २)
मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा:https://sanatanprabhat.org/marathi/776086.html
५. लहानपणापासून देवाने साधनेचे ज्ञान देऊन साधना करून घेणे
श्री. शंकर नरुटे : तुम्ही लहानपणी सेवा आणि साधना कशी करायचा ?
पू. नरुटेआबा : जसजसे आयुष्य पुढेपुढे गेले, तसतशी बुद्धीला चालना मिळत गेली. देव मला साधनेविषयी ज्ञान देत गेला आणि साधना करून घेत गेला.
५ अ. देवाच्या कृपेने साधना चालू होणे : तुमचे (शंकर नरुटे यांचे) लहानपण कसे गेले ? या देवळात जा, त्या देवळात जा, देवाला फुले वहा, पूजा करा इत्यादी करत गेले. तुमचे लहानपण महादेवाच्या देवळातच गेले. तिथले गुरव सांगतील, ती सेवा तुम्ही करायचा. त्यातून म्हणजे शून्यातून तुम्ही देवाकडे, म्हणजे सनातनकडे पोचलात.
आमचेही तसेच होते. आम्ही काय केले ? शेतातील किंवा गुरांची कामे करायचो. तिथूनच धर्मकार्य चालू झाले. आई-वडिलांनी लहानपणीच माझ्या गळ्यात माळ घातली. त्यामुळे मला पांडुरंगाची आवड लागली. आता कलंकेश्वराची आवड लागली.
६. आई-वडिलांनी लहानपणीच देवाची माळ गळ्यात घालून साधनेला लावल्यामुळे निर्व्यसनी राहून प्रकृती चांगली रहाणे
पू. नरुटेआबा : एकदा शेजारील एक व्यक्ती मला म्हणाली, ‘‘तुमच्या वडिलांनी लहानपणीच तुमच्या गळ्यात माळ घालून चांगले केले नाही.’’ तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, ‘‘माझ्या वडिलांनी लहानपणी माझ्या गळ्यात माळ घातली; म्हणून मला अजूनपर्यंत औषधाची एकही गोळी घ्यावी लागत नाही. नाहीतर तुम्हाला पन्नास गोळ्या घेऊनही पन्नासदा रुग्णालयात जावे लागते. अजूनपर्यंत मी रुग्णालयाची पायरीही चढलो नाही. आई-वडिलांनी माझ्या गळ्यात १२ व्या दिवशीच माळ घातली; म्हणून मला कशाचेही व्यसन लागले नाही.’
७. कलंकीकेशव संप्रदायानुसार साधना चालू होणे
श्री. शंकर नरुटे : तुम्ही सगळ्या देवळात जायचा का ?
पू. नरुटेआबा : सगळ्या देवळात गेलो आहे. पंढरपूरला गेलो, तरी एक देव ठेवला नव्हता. सगळ्या देवांचे दर्शन घ्यायचो. सर्वत्र फिरायचो. मी गावातल्या सर्व देवळात जायचो. नंतर मी कलंकीकेशव संप्रदायानुसार साधना करू लागलो. तिथे पुराण चालायचे. मी तिथे जाऊन बसायचो.
श्री. शंकर नरुटे : रात्रभर तिकडे थांबायचा ?
पू. नरुटेआबा : रात्री ११ – १२ वाजेपर्यंत तिकडे थांबायचो. नंतर झोप लागली नाही, तर नामजप करत बसायचो. नंतर सकाळपासून आपला प्रपंच ! सकाळी घरातली कामे करून शेतात जायचो. नंतर म्हशी फिरवायला जायचो.
श्री. शंकर नरुटे : हे केव्हापासून ? लहानपणी, म्हणजे किती वर्षांचे असल्यापासून ?
पू. नरुटेआबा : माझे आई-वडील प्रतिदिन पहाटे उठायचे. उठले की ते लगेच शेणगोठा करायला (म्हशींचे शेण काढायला) जायचे. लहानपणापासूनच मी त्यांच्या समवेत जायचो.
८. वाळूच्या ट्रकवर केलेली कामे
पू. नरुटेआबा : ‘आई-वडिलांना सुखी ठेवायचे आहे’, असा माझा विचार होता. त्यांची सगळी कामे मी करायचो. मी वाळूचे ट्रक भरायला जायचो, तेव्हा आमची आई होती.
श्री. शंकर नरुटे : तुम्ही ट्रक भरायला जायचा, तेव्हा १ – २ ट्रक उतरावयाचे असत ना ?
पू. नरुटेआबा : आधी ट्रक भरायचा आणि नंतर तो ईश्वरपूरला किंवा कोल्हापूरला नेऊन उतरवायचा. ट्रक मोकळा झाल्यावर पुन्हा जायचे. प्रतिदिन ३ – ३ खेपा केल्या. कधी कधी ईश्वरपूरमध्ये ४ – ४ खेपा केल्या आहेत.
श्री. शंकर नरुटे : तुमच्या समवेतचे लोक तुम्हाला अधिक काम करू द्यायचे नाहीत ना ?
पू. नरुटेआबा : हो, ते मला अधिक काम करू द्यायचे नाहीत. ते म्हणायचे, ‘‘तुम्ही काही करू नका; पण आमच्या समवेत या.’’ मला पहिल्यापासून आत्मज्ञान (सूक्ष्म ज्ञान) आहे. त्यामुळे ते मला समवेत चला म्हणायचे.
– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.५.२०२२)(क्रमश:)
पू. नरुटेआबांनी युगांविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण माहितीश्री. शंकर नरुटे : पंचांगात युगांचा उल्लेख आहे, त्यातले ४ लक्ष ३२ सहस्र वर्षे हे काय आहे ? पू. नरुटेआबा : ‘कृत(सत्युग), त्रेता, द्वापर आणि कली’, अशी चार युगे असून एक कलियुग ४ लक्ष ३२ सहस्र वर्षांचे असते. कर उलट पालट । परि त्रिकुट शिखर । पू. नरुटेआबांनी २ अर्थ सांगितले आहेत. अर्थ १ – ‘कर उलट पालट’, म्हणजे ‘आपण आपली साधना योग्य मार्गाने चालू आहे ना ?’, हे सतत पारखून घेतले पाहिजे. आपले अनुसंधान सतत रहायला हवे. स्वतःचे निरीक्षण सतत करत रहायचे आणि अंतर्मुख रहायचे. ‘परि त्रिकुट शिखर ।’, म्हणजे देव, गुरु आणि साधक यांच्यातील संवाद ! ‘परी अमृत झरझर । वाहे निरन्तर ।’, म्हणजे त्या संवादातून जे ज्ञान देव देतो, ते आपल्या मनामध्ये आणि शब्दांमधून वहायला हवे. ‘युग बळाने प्याहे प्याहे ।’, म्हणजे प्रत्येक युगात, प्रत्येक जन्मात मला हे ज्ञान मिळायला हवे. ‘तरी जन्माला यावे ।’, म्हणजे ‘जेव्हा सद्गुरु जन्म घेतील, तेव्हा त्यांच्या समवेतच मला पुन्हा जन्म मिळावा’, एवढी माझी साधना झाली पाहिजे. अर्थ २ – ‘कर उलट पालट ।’, ४ लक्ष ३२ सहस्र हा कलियुगाच्या वर्षांचा आकडा उलटपालट करायचा. युगाचे बळ (क्रमांक) उलट कर. उलट केल्यावर शेवटची ३ शून्ये पुढे येतील. मग दोन, तीन, चार आकडा येऊन तो आकडा ०००२३४ असा झाला. श्री. शंकर नरुटे : २३४ आकडा आला. पू. नरुटेआबा : मग २३४ अवतार आहेत. किंवा प्रत्येक युगात लोकसंख्या जशी वाढत गेली, तशी ती न्यून होणार आहे. १. ‘परि त्रिकुट शिखर ।’ अर्थ : देव, गुरु आणि साधक यांच्यातील संवाद ! २. ‘परी अमृत झरझर । वाहे निरन्तर ।’ अर्थ : त्या संवादातून जे ज्ञान देव देतो, ते ग्रहण करून आपली साधना निरंतर चालू रहायला हवी. ३. ‘युग बळाने प्याहे प्याहे ।’ अर्थ : प्रत्येक युगात माझे डोळे तुलाच (श्री गुरूंना किंवा भगवंताला) पाहू देत. माझे मस्तक नेहमी तुझ्याच चरणी राहू दे. तुझेच नाम माझ्या मुखात राहू दे. ४. ‘तरी जन्माला यावे ।’ अर्थ : ‘प्रत्येक युगात तूच मला तुझ्या समवेत घेऊन ये. – पू. राजाराम नरुटे (वय ९० वर्षे), ईश्वरपूर, जिल्हा सांगली. (३.५.२०२२) |
एखाद्याला दिलेल्या वराचा तो अपलाभ घेत असल्यास देव त्याचा नाश करत असणे‘श्रीविष्णूच्या चौथ्या अवतारात, म्हणजे नरसिंह अवतारात भक्ताने, म्हणजे हिरण्यकश्यपूने वराचा दुरुपयोग केल्यावर घडलेली कथा आहे. हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला, ‘‘बाळा, तुझा नारायण कुठे आहे ?, मला दाखव.’’ भक्त प्रल्हाद म्हणाला, ‘‘सगळीकडे आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, जगात सर्वत्र आहे.’’ हिरण्यकश्यपूला देवाकडून वर मिळाला होता, ‘घरात, बाहेर, माणूस किंवा जनावर यांच्याकडून, भूमीवर, पाण्यात किंवा आकाशात किंवा कुठल्याही शस्त्राने तुला मरण येणार नाही.’’ देवाने दिलेल्या वराप्रमाणे त्याचे मरण घरात, बाहेर किंवा भूमीवर नव्हते; म्हणून नरसिंहाने त्याला उंबरठ्यावर मांडीवर घेतले. श्रीविष्णूचे नरसिंहरूप मनुष्याचेही नाही आणि जनावराचेही नाही. ‘कमरेपासून खाली माणूस आणि वर सिंह’, असे त्याचे रूप आहे. त्याने हिरण्यकश्यपूचे पोट नखांनीच फाडले, कुठल्याही शस्त्राने नाही. अशा प्रकारे त्याला देवाने मारले. ‘वर दिला असला, तरी त्याचा अयोग्य उपयोग केल्यावर देव त्याला कशाही मार्गाने ठार मारतोच’, हे यातून शिकता येते.’ – पू. राजाराम नरुटे (वय ९० वर्षे), ईश्वरपूर, जिल्हा सांगली. (३.५.२०२२) |