प.पू. भक्तराज महाराज यांनी दिव्यत्वाची प्रचीती देऊन साधनामार्गात आणल्याची श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली अनुभूती !
२२.३.२०२४ या दिवशी आपण ‘श्रीमती जयश्री मुळे यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती ’पाहिल्या. आज उर्वरित अनुभूती पाहू. (भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा:https://sanatanprabhat.org/marathi/776136.html
७. इंदूर येथे जातांना आणि गेल्यावर घडलेल्या बुद्धीअगम्य घटना !
७ अ. स्वप्नात इंदूरमधील प.पू. बाबांचा आश्रम शोधत असल्याचे दिसणे आणि प्रत्यक्षातही आश्रमाचा पत्ता लिहिलेली नोंदवही विसरल्याचे लक्षात येणे : दुसर्या दिवशी रात्री आम्ही बसने इंदूरला जायला निघालो. मध्यरात्री मला एक स्वप्न पडले. त्यात ‘मी काहीतरी विसरले आहे’, असा विचार माझ्या मनात येत होता. ‘इंदूरमध्ये मी आणि माझा धाकटा मुलगा मार्गावर फिरून प.पू. बाबांचा आश्रम शोधत आहोत’, असे मला दिसले.
त्यानंतर मला जाग आली आणि मी घाबरले. ‘मी प.पू. बाबांच्या आश्रमाचा पत्ता लिहून घेतलेली नोंदवही (डायरी) विसरले कि काय ?’, असा विचार माझ्या मनात आला. मी ती नोंदवही पर्समध्ये शोधली; पण मला ती सापडली नाही. तेव्हा माझा चेहरा रडवेला झाला. मला फार वाईट वाटले. प्रवासाला निघतांना ‘पत्ता लिहून घेतलेली नोंदवही पर्समध्ये ठेवली कि नाही ?’, हे पहायचे माझ्या लक्षात आले नव्हते.
७ आ. साधिकेचा रडवेला चेहरा पाहून समवेत असलेल्या भिडेआजी यांनी ‘ते प.पू. नाना महाराज तराणेकर असतील’, असे म्हणणे : आम्ही सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास इंदूरला पोचलो. भिडेआजी मला म्हणाल्या, ‘‘तुझा चेहरा असा का गं ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘खरेतर मी प.पू. भक्तराज महाराज यांना भेटण्यासाठी आले होते; परंतु त्यांच्या आश्रमाचा पत्ता लिहिलेली नोंदवही माझ्या पर्समध्ये दिसत नाही.’’ त्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘ते प.पू. नाना महाराज तराणेकर असतील.’’ मी म्हटले, ‘‘नाही. ते प.पू. भक्तराज महाराजच आहेत.’’
८. असा सापडला प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमाचा पत्ता !
८ अ. मुक्कामाच्या ‘हॉटेल’च्या व्यवस्थापकांनी ‘प.पू. नाना महाराज तराणेकर यांचा आश्रम जवळ असून तुम्हाला त्यांचा आश्रम दाखवू’, असे सांगणे : तेवढ्यात त्यांनी ठरवलेले ‘हॉटेल’ आले. आम्ही ‘बॅगा’ घेऊन ‘हॉटेल’ व्यवस्थापकाकडे गेलो. ते व्यवस्थापक आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही प.पू. नाना महाराज यांच्या दर्शनाला आला आहात का? सध्या महाराष्ट्र्रातील पुष्कळ लोक येत आहेत. १५ दिवसांपूर्वी त्यांचे महानिर्वाण झाले आहे. त्यांचा आश्रम येथून १० मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर आहे. आम्ही तुम्हाला आश्रम दाखवू.’’ भिडेआजी परत मला म्हणाल्या, ‘‘बघ गं !’’; पण मी माझ्या मतावर ठाम होते.
८ आ. देवाने स्वप्नात ‘गुरुतत्त्व एकच आहे’, याची जाणीव करून दिल्यानंतर प.पू. नाना महाराज तराणेकर यांच्या आश्रमात जाण्याचे ठरवणे : त्या दिवशी आम्ही इंदूरमध्ये फिरलो. नंतर आम्ही उज्जैन आणि ओंकारेश्वर येथेही गेलो; पण ‘आपण कशासाठी आलो आणि काय झाले ?’, असा विचार मनात येऊन मला चैन पडत नव्हते. परत देवालाच माझी काळजी वाटली ! पहाटे पुन्हा मला स्वप्न पडले. त्यात मला आवाज ऐकू आला, ‘अगं, ‘महाराज, महाराज’ काय करतेस ? सगळे एकच आहेत.’ मग मी ताडकन् उठले आणि भिडेआजींना म्हटले, ‘‘चला आजी, आपण प.पू. नाना महाराजांच्या आश्रमात जाऊया.’’ मग भिडेआजी, मी आणि काकू लगेच सिद्ध झालो. व्यवस्थापकाने आश्रम दाखवण्यासाठी आमच्या समवेत एक मुलगा दिला. आम्ही सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प.पू. नाना महाराज तराणेकर यांच्या आश्रमात पोचलो.
८ इ. प.पू. नाना महाराज यांच्या आश्रमात गेल्यावर तेथील एक ताई प.पू. भक्तराज महाराज यांच्या नातेवाईक असल्याचे समजल्यावर आनंद होणे : प.पू. नाना महाराज तराणेकर यांचा आश्रम मोठा होता. आम्ही तिथे पोचल्यावर प.पू. नाना महाराज तराणेकर यांच्या पत्नी बाहेर आल्या. त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘सभागृहात बसा.’’ आम्ही तिघी तेथे थांबलो. तेथे कुणीच नव्हते. एक ताई तिथे काहीतरी वाचत बसल्या होत्या. माझ्या मनात विचार चालले होते, ‘आता ‘प.पू. भक्तराज महाराज यांचा आश्रम कुठे आहे ?’, हे कुणाला कसे विचारावे ?’ देवाने मला त्या ताईंना विचारायचे सुचवले. मी त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि त्यांना विचारले, ‘‘एक विचारू का ?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘काय ?’’ मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्हाला प.पू. भक्तराज महाराज ठाऊक आहेत का ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘अहो, ते तर माझे सख्खे मामा लागतात. कालच ते आले आहेत.’’ हे ऐकून ‘मला किती आनंद झाला !’, ते मी शब्दांत कशी सांगू ? त्यांनी मला प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे मोठे छायाचित्र दाखवले.
८ ई. ताईंकडून प.पू. बाबांच्या आश्रमाचा पत्ता घेऊन रिक्शाने तेथे पोचणे : त्या ताई म्हणाल्या, ‘‘या काकू (प.पू. नाना महाराज तराणेकर यांच्या पत्नी) तुम्हाला पत्ता देतील.’’
मी त्या काकूंना म्हणाले, ‘‘आम्हाला परत जायचे आहे. तुम्ही आम्हाला पत्ता द्या. आम्ही दुसर्या रिक्शाने तिकडे जातो.’’ त्यांनी आम्हाला पत्ता सांगितला. आम्ही दुसरी रिक्शा करून निघालो. तेव्हा ‘प.पू. बाबांना देण्यासाठी काय घेऊन जाऊया ?’, असा विचार माझ्या मनात आला. तिकडे जातांना मार्गात बाजार लागला. तेथे उतरून मी आंबे घेतले. नंतर लक्षात आले, ‘गंगा दशहरा चालू आहे; म्हणूनच देवाने मला हे सुचवले.’ अशा प्रकारे आम्ही प.पू. बाबांच्या आश्रमात पोचलो !
९. प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रथम दर्शन आणि त्यांची अनुभवलेली अपार प्रीती !
९ अ. आश्रमाचे दार उघडल्यावर ‘जणू मोक्षाचे दार उघडले’, असे वाटणे आणि प्रत्यक्ष प.पू. बाबांचे दर्शन होणे : पूर्वीचा आश्रम ! दाराला साधी कडी होती. आम्ही कडी वाजवली. तेव्हा आतून आवाज आला, ‘‘अरे राजू, दार उघड. ‘कोण आले आहे ?’, बघ !’’ राजूदादा (टीप १) झाडांना पाणी घालत होते.
टीप १ – राजूदादा : प.पू. बाबांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांचा मुलगा श्री. राजू निरगुडकर
राजूदादांनी दार उघडले. तेव्हा मला वाटले, ‘जणू मोक्षाचे दार उघडले !’ आम्ही आत गेलो. तेव्हा प्रत्यक्ष प.पू. बाबाच समोर आले आणि आम्हाला ‘या’, असे म्हणाले. प.पू. बाबा तेथील कडप्प्याच्या कठड्यावर बसले. आम्ही तिघी त्यांच्या चरणांशी बसलो.
९ आ. प.पू. बाबांनी आस्थेने विचारपूस करणे आणि गरम पोहे अन् बुंदीचा लाडू खाऊ घालणे : प.पू. बाबांनी ‘कुठून आला आहात ? कुठे उतरला आहात ?’, अशी आमची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी संभाजीनगर येथील त्यांच्या भक्तांविषयी आम्हाला माहिती सांगितली. नंतर ते आम्हाला म्हणाले, ‘‘आता आश्रम पहा !’’ त्यांनी कु. सीमा गरुड हिला बोलवले आणि ‘यांना आश्रम दाखव’, असे सांगितले. तिने आम्हाला आश्रम दाखवला आणि वरच्या माळ्यावरील श्री अनंतानंद साईश यांच्या मूर्तीच्या जवळ बसायला सांगितले. तिथेच तिने आम्हाला गरम गरम पोहे आणि बुंदीचे लाडू आणून दिले अन् ‘येथेच खा’, असे सांगितले. ते पोहे आणि बुंदीचा लाडू यांची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे !
९ इ. प.पू. बाबांनी गुरुपौर्णिमेचे निमंत्रण देणे आणि राजूदादांना शिष्य डॉ. आठवले यांचे ग्रंथ अन् इंदूरमधील प्रसिद्ध ठिकाणे दाखवून ‘हॉटेल’वर सोडून येण्यास सांगणे : प.पू. बाबा आम्हाला म्हणाले, ‘‘माझा एक शिष्य डॉक्टर (शिष्य डॉ. आठवले) आहे. त्यांनी गोव्याला गुरुपौर्णिमा ठेवली आहे. तिकडे या. आता ‘हॉटेल’मध्ये उतरायचे नाही. सरळ आश्रमातच यायचे.’’ त्यानंतर त्यांनी प.पू. रामानंद महाराज अन् राजूदादा यांना हाक मारून सांगितले, ‘‘यांना डॉक्टरांचे ग्रंथ दाखवा.’’ नंतर त्यांनी राजूदादांना सांगितले, ‘‘गाडी नेणार आहेस ना ? त्यांना अन्नपूर्णा मंदिर आणि काचेचा महाल (शिशमहल) दाखव अन् ‘हॉटेल’वर सोडून ये.’’
१०. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भेटीनंतर साधिकेला आलेल्या अनुभूती !
१० अ. मुलाला परीक्षा देता येऊन तो उत्तीर्ण होणे : नंतर आम्ही संभाजीनगरला परत आलो. माझा मोठा मुलगा सुजित शारीरिक त्रासामुळे अभियांत्रिकीच्या दुसर्या वर्षाचे २ ‘पेपर’ सोडवू शकत नव्हता; पण प.पू. बाबांच्या भेटीनंतर तो परीक्षेसाठी पुण्याला जाऊ शकला आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला.
१० आ. मुलाच्या मित्राच्या माध्यमातून इंदूर येथील आश्रमातील प्रसाद मिळाल्याने भावस्थिती अनुभवता येणे : त्यानंतर २ मासांनी माझा मुलगा विक्रांत याचा एक मित्र श्री. अजय भागवत भेटायला आला. इंदूरला त्याच्या मावस भावाचे लग्न झाले. मी त्याला विचारले, ‘‘लग्न कुणाशी झाले ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘प.पू. बाबांची नात, म्हणजे मुलीची मुलगी प्रीती हिच्याशी लग्न झाले.’’ त्याने तिथला प्रसाद दिला. तेव्हा मला पुन्हा भावस्थिती अनुभवता आली.
१० इ. त्यानंतर फेब्रुवारी १९९४ मध्ये देवाने माझ्याकडून त्र्यंबकेश्वर येथे ‘नारायण नागबली’ हा विधी करून घेतला.
१० ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी संभाजीनगर येथे अध्यात्मप्रसाराचे कार्य करण्याचा निरोप देणे : त्यानंतर १० दिवसांनी, म्हणजे मार्च १९९४ मधील पहिल्या आठवड्यात श्री. शिवाजीराव कुलकर्णी हे माझी भाची सौ. सुप्रिया संतोष आळशी हिचे पत्र घेऊन आले. त्या पत्रात ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी तुम्हाला संभाजीनगर येथे अध्यात्मप्रसाराचे कार्य करायला सांगितले आहे’, असा निरोप होता.
‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः दंडवत अन् कृतज्ञता ! देवा, ‘हे सर्व तूच लिहून घेतलेस’, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
(समाप्त)
– श्रीमती जयश्री मुळे (वय ७७ वर्षे), फोंडा, गोवा. (१४.३.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |