सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या वाणीतील चैतन्याची साधिकेला आलेली प्रचीती !
१. साधिकेने सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना तिच्या वाढदिवसाविषयी सांगितल्यावर त्यांनी साधिकेला दिलेला आशीर्वाद !
‘६.३.२०२४ या दिवशी एका सेवेनिमित्त माझे सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी भ्रमणभाषवरून बोलणे झाले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘२१.३.२०२४ या दिवशी माझा वाढदिवस आहे.’’ त्या वेळी सद़्गुरु काकांनी मला आशीर्वाद दिला, ‘‘आतापर्यंत तुमचा वाढदिवस केवळ वय वाढले आहे’, असे दर्शवणारा होता. यापुढे ‘तुमचा वाढदिवस साधना वाढली आहे’, असे दर्शवणारा असेल.’’
२. साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा आणि तिला स्वतःत जाणवलेले पालट
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपा आणि सद़्गुरु पिंगळेकाकांचा संकल्प’ यांमुळे ६.३.२०२४ या दिवसानंतर मला स्वतःत पालट जाणवले.
२ अ. स्वतःच्या प्रकृतीविषयीच्या विचारांत झालेले पालट
१. त्यानंतर दोन दिवसांनी माझी प्राणशक्ती अल्प झाली. मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा माझ्या मनात ‘माझा प्रत्येक श्वास माझ्या गुरूंचे स्मरण करण्यासाठी आहे. गुरुदेवांचे स्मरण होत आहे. मी गुरुदेवांची कृपा अनुभवत आहे’, असे विचार येत होते.
२. मी काही मासांपासून रुग्णाईत आहे. माझी प्रकृती काही वेळा अधिकच बिघडली, तर ते स्वीकारण्यात माझ्या मनाचा संघर्ष होत असे. आता मला वाटते, ‘गुरुकृपा आहे. गुरुदेव माझ्या समवेत सतत आहेत.’ माझा नामजप आपोआप चालू होतो. ‘माझ्याकडून हे प्रयत्न गुरुकृपेमुळेच होत आहेत’, याची जाणीवही मला गुरुदेवांच्या कृपेमुळेच होते.
३. पूर्वी माझी प्रकृती बिघडली, तर माझ्या मनात ‘मला कोणत्या गोष्टी करता येणार नाहीत ? मला त्या गोष्टी करता न आल्याने कोणते परिणाम होतील ?’, असेे विचार येत असत. आता मी गुरुदेवांना प्रार्थना केली की, ते ‘मी परिस्थितीत काय करू शकते ? मला कोणते प्रयत्न करणे शक्य आहे’, हे माझ्या लक्षात आणून देतात. ‘गुरुदेवच माझ्याकडून करून घेत आहेत’, याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते.
४. माझे शारीरिक त्रासांकडे लक्ष न जाता माझ्याकडून सहजतेने प्रार्थना, कृतज्ञता, आत्मनिवेदन आणि भावजागृतीचे प्रयत्न होतात.
२ आ. मनातील निरर्थक विचारांकडे लक्ष न जाणे : आता माझ्या मनात येणारे निरर्थक, अनावश्यक आणि सूक्ष्मातील मोठ्या अनिष्ट शक्ती मनात घालत असलेल्या विचारांकडे माझे लक्ष जात नाही. ‘मी कोणता प्रयत्न करू शकते ?’, हे माझ्या लक्षात येते.
२ इ. ‘अंतर्मन शुद्ध हवे’, असे वाटून साधकांनी सांगितलेली चूक सहजतेने स्वीकारता येणे : मला वाटते, ‘ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर अंतर्मन शुद्ध हवे.’ माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी एकरूप होण्यासाठी प्रार्थना होऊ लागल्या. आता कुणीही माझी चूक सांगितली, तर ती स्वीकारण्यात माझ्या मनाचा संघर्ष होत नाही. ‘साधक मला चुका सांगून माझ्यातील त्रुटी दूर करत आहेत आणि मला गुरुदेवांच्या चरणांशी एकरूप होण्यासाठी साहाय्य करत आहेत’, असा विचार येऊन सहजतेने चूक स्वीकारता येते.
३. कृतज्ञता आणि प्रार्थना
देवतुल्य, ऋषितुल्य आणि गुरुतुल्य, सद़्गुरु पिंगळेकाकांच्या कृपेने माझ्याकडून हे प्रयत्न झाले. मी ते सद़्गुरु पिंगळेकाकांच्या पावन श्रीचरणी शरणागतभावाने आणि समर्पणभावाने अर्पण करते.
‘हे प्रभो, या जिवाकडून आपल्याला अपेक्षित अशी श्री गुरुचरणांची भक्ती होवो’, अशी मी आपल्या परम दिव्य श्रीचरणी प्रार्थना करते.’
– कु. पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |