‘सनातन संस्थेने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने अनेक साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे’, ही आध्यात्मिक इतिहासातील अद्वितीय घटना !
‘प्रत्येक व्यक्ती जीवनात सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करत असते. ती बाह्य वस्तूंमधून सुख उपभोगण्याचा प्रयत्न करत असते. काही जण सांप्रदायिक साधना करतात; मात्र कलियुगात आपल्यातील षड्रिपूंचे निर्मूलन न केल्यास आपल्याला साधनेतील खरा आनंद अनुभवता येत नाही. सनातन संस्थेत गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना सांगण्यात आली आहे. त्यातील पहिला टप्पा ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ अन् दुसरा टप्पा ‘अहं निर्मूलन’ आहे. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करून सहस्रो साधक जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त झाले आहेत. अनेक साधक संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु या पदांवर विराजमान आहेत. ही विश्वाच्या आध्यात्मिक इतिहासातील अद्वितीय घटना आहे.
स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या जीवनमुक्तीसाठी दिलेला कानमंत्र अन् मोक्षप्राप्तीसाठी दिलेले अमृत !
१. व्यक्तीने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्याने तिच्यातील रज-तम न्यून होऊन तिच्यातील सत्त्वगुणात वाढ होणे अन् तिला अंतर्मुखता साधता येऊन तिची अल्प कालावधीत जीवनमुक्ततेकडे वाटचाल होणे : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे जीव शीघ्रतेने शिवाशी एकरूप होण्यास लायक बनतो. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे’, तसेच ‘गुणसंवर्धन करून स्वतःच्या क्षमतेत वृद्धी करणे’, हा व्यष्टी आणि समष्टी साधनेचा पाया आहे. व्यक्ती करत असलेले विचार आणि कृती त्या व्यक्तीतील रज-तम यांच्या प्रमाणावर अवलंबून असतात. व्यक्तीने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्याने तिच्यातील रज-तम न्यून होऊन सत्त्वगुणात वाढ होते अन् ती अंतर्मुख होते. ती व्यक्ती अल्प कालावधीत जीवनमुक्ततेकडे वाटचाल करते. स्वभावदोष आणि अहं याचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करणार्या व्यक्तींना अध्यात्ममार्गातील वाटचाल सहज साध्य होते. स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया, म्हणजे गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधकांच्या जीवनमुक्तीसाठी दिलेला कानमंत्र आणि मोक्षप्राप्तीसाठी दिलेले अमृत आहे.
२. स्वभावदोषांमुळे मनुष्याला वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या स्तरांवरील अडचणींना सामोरे जावे लागत असणे : व्यक्तीतील स्वभावदोषांमुळे तिच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर गंभीर परिणाम होतात, उदा. विसरणे या स्वभावदोषामुळे दूध उतू गेल्यास स्वच्छता करण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि पैसे अन् इंधन वाया जाते. वाहनात वेळेत इंधन न भरल्यास वेळ, परिश्रम आणि पैसेही वाया जातात. वेळेत विद्युत् देयक भरले नाही, तर अतिरिक्त दंड भरावा लागतो. ‘राग येणे’ या स्वभावदोषामुळे एखाद्या प्रसंगात पतीने पत्नीला मारहाण केल्याने जीवितहानी झाल्याच्या गंभीर घटनाही घडल्या आहेत. व्यक्तीतील अशा लहान-सहान स्वभावदोषांमुळे पुष्कळ कालावधीपर्यंत तिच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावहारिक जीवनावर गंभीर परिणाम होऊन त्या व्यक्तीला दु:ख, निराशा अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे त्या व्यक्तीची साधना वाया जाते. तिच्याकडून पापकर्म घडते आणि सनातन धर्मातील कर्मफल सिद्धांताप्रमाणे तिला पापाचे फळ भोगावे लागते. व्यक्तीतील स्वभावदोषांमुळे तिला पुनःपुन्हा विविध योनींमध्ये जन्म घ्यावा लागून नरकयातना भोगावी लागते.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया तळमळीने अन् अपार श्रद्धेने राबवून शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा आनंद घेता येत असणे : प्रत्येक व्यक्तीला तिचे विचार आणि कृती यांनुसार फळ भोगावे लागते. अयोग्य कर्मामुळे वाईट फळ आणि योग्य कर्मामुळे चांगले फळ पदरी येते. ‘आपल्याकडून अयोग्य कर्म होऊ नये’, यासाठी आपले मन, बुद्धी आणि इंद्रिये यांवर सतत नियंत्रण ठेवावे लागते. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा त्याग व्हावा लागतो. यासाठी गुरुकृपायोगात सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया तळमळीने अन् अपार श्रद्धेने राबवायला हवी. त्यामुळे आपल्याला शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा आनंद घेता येईल.
४. स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया श्रद्धेने करून चित्तावर गुणांचा संस्कार करणे आवश्यक ! : साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांची श्रद्धा दृढ होण्यास साहाय्य होते आणि त्यांचा ईश्वरप्राप्ती करण्याच्या ध्येयातील आत्मविश्वास वाढतो. साधकांनी असे प्रयत्न निरंतर केल्याने त्यांच्यात साधकत्व निर्माण होऊन त्यांच्यावर गुरुकृपा होते. साधकांचा सेवेतील ताण दूर झाल्याने त्यांची सेवेत एकाग्रता साधली जाऊन त्यांच्याकडून सेवा परिपूर्ण होते. त्यांच्या निर्णयक्षमतेत वाढ होते. व्यक्तीतील रागीटपणा दूर होऊन तिच्यातील प्रेमभाव वाढतो आणि तिच्यातील अनेक गुणांत वृद्धी होते. तिची तामसिक व्यक्तीमत्त्वातून प्रथम राजसिक आणि नंतर सात्त्विक व्यक्तीमत्त्वाकडे वाटचाल होते. त्या व्यक्तीला असलेला वाईट शक्तीचा त्रासही न्यून होतो. यासाठी साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया श्रद्धेने करून चित्तावर गुणांचा संस्कार करणे आवश्यक आहे.
यासाठी गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत स्वतःकडून झालेले अयोग्य विचार अन् कृती यांचे निरीक्षण करणे, स्वयंसूचना देणे, चुकीच्या परिणामानुसार प्रायश्चित्त घेऊन चुका न होण्यासाठी प्रयत्न करणे, मनाच्या विरुद्ध जाणे, असे प्रयत्न केल्याने साधक शीघ्र आध्यात्मिक प्रगती करत आहेत.
– (पू.) रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था (२७.२.२०२४)
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे साधक अन् जिज्ञासू यांच्यात झालेले पालट
१. कु. उर्मिळा शेट्टी, कर्नाटक
१ अ. आत्मविश्वास वाढणे आणि गुरुस्मरणात वाढ होणे : ‘पूर्वी उत्तरदायी साधकांचा भ्रमणभाष आल्यास ‘ते मला सेवा सांगतील’, असे मला वाटत असे. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यावर आता मला उत्तरदायी साधकांचा भ्रमणभाष आल्यास ‘गुरुसेवा करण्याची संधी मिळेल’, असे वाटून आनंद होतो. माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझ्या गुरुस्मरणातही वाढ झाली आहे.’
२. श्रीमती पार्वती हडगली (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६६ वर्षे), विजयपूर, कर्नाटक
२ अ. सुनेशी आईच्या नात्याने वागणे : ‘पूर्वी मला पुष्कळ राग येत असे. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे मला शांत रहाणे जमू लागले आहे. आता मी घराला आश्रम करण्याचा प्रयत्न करते. मी सुनेला घरकामांत साहाय्य करते. आमच्यात आई-मुलीचे नाते निर्माण झाले आहे.’
३. एक साधिका, कर्नाटक
३ अ. राग अल्प होऊन शांत रहाता येणे : ‘पूर्वी माझा घरातील व्यक्तींशी वाद होत असे. घरातील व्यक्ती रागावल्यास मलाही राग येत असे. मी घरातील साहित्य व्यवस्थित ठेवत नव्हते. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना मला उत्तरदायी साधिकेने सांगितले, ‘‘समोरची व्यक्ती कशीही वागली, तरीही तिला प्रत्युत्तर द्यायचे नाही.’’ नंतर मी घरातील साहित्य व्यवस्थित ठेवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे माझ्या मनाचा संघर्ष न्यून झाला आहे. घरातील व्यक्तींशी वाद होत नाही. आता मला राग आल्यास मी लगेच शांत होते.’
४. आधुनिक वैद्य प्रणव मल्ल्या (एम्.डी.), मंगळुरू, कर्नाटक
४ अ. स्वयंसूचना सत्रे केल्याने ताण आणि मनातील प्रतिक्रिया न्यून होऊन सकारात्मक अन् आनंदी रहाता येणे : ‘मी आधुनिक वैद्य आहे. पूर्वी रुग्णालयात रुग्ण अधिक संख्येने आल्यास मला ताण येत असे. मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी समजल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मला रुग्णांमुळे नाही, तर माझ्यातील स्वभावदोषांमुळे ताण येत आहे.’ नंतर मी स्वयंसूचना देणे चालू केल्यावर एका आठवड्यातच माझा ताण न्यून झाला. मला आश्चर्यच वाटले आणि या प्रक्रियेविषयी माझी श्रद्धा वाढली. मी वाहन चालवत असतांना अन्य वाहनचालकांच्या अयोग्य कृतीमुळे मला येत असलेल्या प्रतिक्रिया न्यून झाल्या. मला संघर्षावर मात करणे सोपे झाले. मी सकारात्मक राहू लागलो. मी लोकांशी आपुलकीने वागू लागलो. मला आनंदी रहायला जमू लागले.’
५. अधिवक्ता कृष्णस्वामी, बेंगळुरू, कर्नाटक
५ अ. राग आणि ताण न्यून होणे : ‘पूर्वी मला वकिली व्यवसाय करतांना पुष्कळ राग येत असे. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवू लागल्यानंतर माझा रागीटपणा न्यून झाला आहे. माझे सहकर्मचारी माझे मित्र झाले आहेत. आता माझ्यावरील ताण न्यून होऊन माझे कामकाज व्यवस्थित चालू आहे.’
६. आधुनिक वैद्य प्रशांत नंबियार, सूरत्कल, कर्नाटक
६ अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी समजल्यापासून त्याच दिवसापासून प्रयत्न चालू करणे आणि पत्नीला पालट जाणवणे : मी आधुनिक वैद्य आहे. माझ्यात पुष्कळ अव्यवस्थितपणा आणि वक्तशीरपणाचा अभाव होता. यामुळे घरी नेहमी वाद होत असे. मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी समजल्यापासून मी त्याच दिवसापासून प्रयत्न चालू केले. तेव्हा माझी पत्नी मला म्हणाली, ‘‘एकाच दिवसात तुमच्यात इतके पालट कसे झाले ? मी अनेक वर्षांपासून तुम्हाला सांगूनही जे घडले नाही, ते आता एका दिवसात कसे झाले ? मलाही तुमच्या समवेत सत्संगाला न्या.’’
७. अधिवक्ता कृष्णमूर्ती, (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४५ वर्षे), कोडगु, कर्नाटक
७ अ. मन शांत होणे आणि आनंद जाणवू लागणे अन् स्वतःतील पालट इतरांच्याही लक्षात येणे : ‘मी सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी मला पुष्कळ राग येत असे. माझे कर्मचारी माझ्याशी बोलत नसत. माझ्या पत्नीलाही माझी भीती वाटत असे. मला साधनेचे महत्त्व समजल्यावर माझे मन शांत झाले. मला आनंद जाणवू लागला. मी कर्मचार्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वागवू लागलो. माझ्यातील पालट सर्वांच्या लक्षात येऊ लागला.’
८. श्री. जयराम (उद्योजक, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक
८ अ. परिस्थिती स्वीकारणे आणि अल्प घंटे काम करूनही समाधानी असणे : ‘मी उद्योजक आहे. मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर साधना करू लागलो. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यानंतर मला परिस्थिती स्वीकारणे शक्य झाले. पूर्वी मला १२ घंटे काम करूनही समाधान मिळत नव्हते. आता मी ६ घंटे काम करूनही समाधानी आहे.’
९. श्री. सतीशचंद्र (सनदी लेखापाल, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६६ वर्षे) मंगळुरू, कर्नाटक
९ अ. मनातील मायेचे विचार न्यून होणे आणि वैयक्तिक अन् व्यावसायिक जीवनात सकारात्मक आणि उत्तम पालट होणे : ‘मी चार्टर्ड अकाऊंटंट (सनदी लेखापाल) आहे. मी सत्संगाला जाऊ लागल्यावर नियमित नामजप केला आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली. त्यामुळे माझे मन शुद्ध झाले. मी प्रत्येक सप्ताहात सत्संगाला गेल्यामुळे माझ्यात सकारात्मकता वाढली. माझ्या मनातील मायेचे विचार न्यून झाले. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक अन् उत्तम पालट झाले. माझी आध्यात्मिक उन्नती झाली.’
(पू.) रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था (२७.२.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |