कोरोना महामारीच्या संघर्षमय काळात जिज्ञासूंसाठी संजीवनी ठरलेला सनातन संस्थेचा ‘ऑनलाईन साधना सत्संग’ !
सध्याच्या काळात समाज भौतिक सुखप्राप्तीमध्ये रममाण झालेला दिसतो. हा समाज आत्मिक आनंदापासून वंचित आहे. आध्यात्मिक साधनेच्या अभावामुळे बहुतेकांना जीवनातील तणावाच्या प्रसंगांना सामोरे जातांना मनोबळ आणि आत्मबळ अल्प पडते. ताण-तणाव, निराशा, नकारात्मकता, चिडचिड, अशी अनेकांची स्थिती होते. या सर्वांतून समाजाची सात्त्विकता पुष्कळ घसरल्याचे दिसून येते. सर्वत्र आजारपणे, कौटुंबिक वाद-विवाद, अनाचार, स्वैराचार, पापाचार, फसवणूक, शोषण, भ्रष्टाचार, हत्या, धर्मावरील आघात आदींनी परिसीमा गाठली आहे. यावर उपाय म्हणून समाजाची सात्त्विकता वाढवण्यासाठी सहस्रो साधक आज सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तन, मन आणि धन यांचा त्याग करून समाजामध्ये अध्यात्मशास्त्राचा प्रसार करत आहेत.
संकलक : श्री. चैतन्य तागडे, पुणे आणि सौ. अर्पिता पाठक, पनवेल
कोरोना महामारीमुळे अनेक जण साधनेकडे वळणे !
वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी लागू झाली. अचानक आलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रसिद्धीमाध्यमे, इंटरनेट आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमातून अनेक जण या परिस्थितीशी लढण्याचे अन् मनोबल वाढवण्याचे प्रोत्साहनपर कार्यक्रम घेत होते. असे असले, तरी जसे मनाला वाटेल, तसे प्रयत्न करूनही जीवन स्थिर, सकारात्मक आणि आनंदी बनवण्यात यश मिळत नसल्याचे बहुतांश लोक अनुभवत होते. त्यातच अनेक प्रकारची काळजी घेऊनही कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने समाजमन अस्वस्थ होते. जेव्हा विज्ञानाचे नियम पाळूनही विषाणूजन्य आजार होतात, तेव्हा तरी विज्ञानाच्या पलीकडचे अध्यात्मशास्त्र समजून घेणे आवश्यक ठरते; कारण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे अनुभवण्यासाठी आवश्यक शास्त्र म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र’ !
जसे आजार होण्यामागे किंवा अन्य संकटे येण्यामागे आपण बुद्धीने कारणे शोधतो, वैज्ञानिक कारणे शोधतो, तशी आध्यात्मिक कारणेदेखील असतात. आपल्याला सर्व अडचणी आणि संकटे यांना समर्थपणे सामोरे जायला शिकवून जीवन आनंदी बनवण्याचे एकमेव असे अध्यात्मशास्त्र अन् त्याचे सिद्धांत कुठेही शिकवले जात नाहीत. आपत्काळाविषयी जागृती करण्याचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अनेक वर्षांपासून आरंभले आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वच स्तरांवर शारीरिक, मानसिक, आर्थिक, अशा सर्व प्रकारच्या अस्थिरता होत्या. त्यामुळे अनेकांना सनातन संस्था सांगत असलेल्या आपत्काळावर श्रद्धा बसली आणि साधना करण्याची आवश्यकता लक्षात आली.
समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने बालसंस्कारवर्ग, युवा सत्संग, साधना सत्संग, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, यांद्वारे तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म, आनंदी जीवनासाठी अध्यात्म आदी विषयांवर विनामूल्य प्रवचने प्रत्यक्ष आयोजित केली जातात. संतांना समाजाची काळजी असते. कोरोना महामारीतील समाजाची स्थिती लक्षात घेऊन सर्वांना आधार देण्यासाठी दळणवळण बंदी काळात; म्हणजे वर्ष २०२० पासून सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन साधना सत्संग’ या उपक्रमाला आरंभ करण्यात आला. या सत्संगांचे वैशिष्ट्य; म्हणजे समाजात ज्यांच्याकडे ‘स्मार्ट फोन’ उपलब्ध आहे, ‘इंटरनेट’ उपलब्ध आहे आणि ज्यांना जीवन आनंदी बनण्यासाठी योग्य साधना शिकण्याची जिज्ञासा आहे, अशा सर्व जिज्ञासूंना या सत्संगांत नियमित सहभागी होण्याची संधी विनामूल्य लाभली.
९ भाषांत २५० हून अधिक सत्संग चालू !सामाजिक दृष्टीकोनातून पाहिले, तर दळणवळण बंदीच्या काळामध्ये समाजाला अत्यंत प्रेमाने, निरपेक्षपणे, विनामूल्य अन् शास्त्रशुद्ध अध्यात्मशास्त्र शिकवणारे असे ‘ऑनलाईन साधना सत्संग’ मिळणे; म्हणजे संकटकाळात नवसंजीवनी मिळाल्यासारखे सिद्ध झाले. त्यामुळे सर्वांकडून या सत्संगांना पुष्कळ प्रतिसाद लाभल्याने हा उपक्रम पुढे चालूच राहिला आहे. आता ठिकठिकाणी या सत्संगांना मागणी असल्याने ‘ऑनलाईन’ समवेतच प्रत्यक्ष सत्संग चालू झाले आहेत. सनातन संस्थेच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग स्वतःच्या प्रकृतीनुसार प्रत्येक व्यक्तीला कृतीत आणण्यासाठी सहज, सोपा आणि आनंददायी आहे, हे अनेकांनी अनुभवले आहे. सत्संगांत सांगितल्याप्रमाणे काळानुसार योग्य साधना केली, तर प्रारब्धाधीन संकटांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असे आत्मबळ मिळते, हेच या सत्संगांच्या माध्यमातून अनेकांना अनुभवता आले. आतापर्यंत ऑनलाईन, तसेच प्रत्यक्ष सत्संग यांच्या माध्यमातून ९ भाषांत २५० हून अधिक साप्ताहिक सत्संग चालू आहेत, तर या सर्व सत्संगांत मिळून ९ सहस्र ३०० हून अधिक जिज्ञासू सहभागी होत आहेत. ४०० हून अधिक जिज्ञासू साधक बनून नियमित व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना करत आहेत. |
साधना सत्संगानंतर काही जिज्ञासूंनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट !
१. श्रीमती वासंती पारिपेल्ली (वय ७० वर्षे), छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
भगवंताच्या कृपेने जानेवारी २०२१ पासून मी ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडले गेले. ऑनलाईन सत्संगाला जोडल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले ‘गुरुमाऊली’ म्हणून लाभले आणि माझ्या जीवनात आमूलाग्र पालट झाला. यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता ! गुरुकृपेने सत्संगाला जोडल्यावर मला ‘मनुष्यजन्म का मिळाला ?’, हे समजले. त्यामुळे साधना सत्संगात सांगितलेली सूत्रे आचरणात आणण्याचे पुढीलप्रमाणे प्रयत्न परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने होत आहेत.
१. प्रतिदिन नामजप होतो. भगवंताच्या अनुसंधानात रहाण्यासाठी प्रार्थना, कृतज्ञता, मानसपूजा होते. स्वभावदोष निर्मूलनासाठी स्वयंसूचना सत्रे होतात. चुकांच्या परिमार्जनासाठी गुरुमाऊली क्षमायाचना करवून घेते.
२. ‘प्रत्येक कृती भगवंताने दिलेली सेवा आहे’, असा आणि ‘सर्वांमध्ये भगवंत आहे’, असा भाव ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सण-उत्सव कसे साजरे करायचे ? हे आणि त्यांचे महत्त्व समजल्यामुळे सण-उत्सव भावपूर्ण अन् आनंदाने साजरे होतात.
३. ‘माझे प्रारब्ध न्यून होण्याकरिता गुरुमाऊली माझ्या क्षमतेनुसार सेवेची संधी उपलब्ध करून देत आहे’, असा भाव मनात असतो.
४. गुरुकृपेमुळे साधनेत आल्याने माझ्या वागण्यात, बोलण्यात पालट झाला. माझा कर्तेपणा अल्प झाला. रागाच्या प्रसंगांत संयम ठेवणे, तसेच स्थिर आणि शांत रहाणे असे प्रयत्न होऊ लागले. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, यासाठी मृदू आणि सकारात्मक बोलण्याचे प्रयत्न होत आहेत. चुका घडण्यापूर्वीच मन सतर्क होत आहे.
२. सौ. हेमांगी पाटील, कोथरूड, पुणे
गेल्या एक वर्षापासून मी ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडली गेले आहे. सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ राबवत आहे. त्यामुळे माझ्यात बरेच सकारात्मक पालट झाले आहेत. पूर्वी मी सासूबाई आणि नणंद यांचे बोलणे मनात ठेवून त्याविषयी यजमानांकडे तक्रारीच्या सुरात बोलत असे. आता मी ‘प्रत्येकाचा बोलण्यामागील दृष्टीकोन वेगळा असतो’, हे लक्षात घेऊन माझ्या साधनेकडे लक्ष देते. एखादी गोष्ट मनात धरून ठेवणे अल्प झाले. त्यामुळे मन सकारात्मक रहाण्यास साहाय्य झाले. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला हे करता आले. यासाठी त्यांच्या चरणी मी कृतज्ञ आहे.
३. सौ. नयना कुळकर्णी, पुणे
सनातनच्या सत्संगात सहभागी व्हायला लागल्यापासून मला पुष्कळ लाभ झाला.
१. गुरुदेवांनी सत्संगाच्या माध्यमातून गुणवर्धन करण्यास आणि दोष अल्प करण्यास शिकवले.
२. माझ्याकडून कधी अयोग्य वर्तन झाले, मला प्रतिक्रिया आली किंवा मनात कुणाबद्दल विचार आला की, गुरुदेव त्याची जाणीव करून देतात. हा पालट केवळ सत्संगामुळे होऊ शकला.
३. तक्रार करण्यापेक्षा सतत कृतज्ञताभावात कसे रहायचे ? भावजागृतीचे प्रयत्न कसे करायचे ? शरणागतीने नामजप कसा करायचा ? हे सर्व सत्संगांत शिकून आत्मसात करता आले.
४. मला घरात कधी कुणी बोलले की, राग यायचा. ‘मला समजून घेत नाहीत’, असे वाटायचे. सत्संगातून प्रसंगाकडे साक्षीभावाने कसे बघायचे ? हे समजले. आता कोणत्याही प्रसंगात मन स्थिर राहून आत्मचिंतन केले जाते. राग येत नाही. गुरुदेवांना यातून काय शिकवायचे आहे ? असा विचार येऊन मनाची स्थिती पालटते.
‘ऑनलाईन साधना सत्संगां’ची वैशिष्ट्ये !
१. हे सत्संग ऑनलाईन स्वरूपाचे असल्याने ज्या भागात सनातन संस्थेचे कार्य नाही; पण इंटरनेट आहे, अशा भागांमधून जिज्ञासू सत्संगाला जोडले जाऊ शकतात.
२. काही जिज्ञासू विदेशातूनपण सत्संगाला जोडले जात आहेत. त्यांची वेळ भारतातील वेळेप्रमाणे नसते. त्यामुळे भारतातील वेळेनुसार सत्संगांचे नियोजन केले, तर विदेशातील जिज्ञासूंना पहाटे लवकर किंवा रात्री उशिरा जोडावे लागते. साधनेची गोडी लागल्याने त्यांची कधीही जोडण्याची सिद्धता असते.
३. या साधना सत्संगांमध्ये साधना शिकण्यासमवेतच सूक्ष्म दृष्टी विकसित होण्यासाठी सूक्ष्मातील प्रयोग घेतले जातात.
४. सणांविषयी आध्यात्मिक माहिती मिळून सण भावपूर्ण साजरे केले जावेत आणि सणांचा आध्यात्मिक लाभ घेता यावा, यासाठी सण, उत्सव, आचारधर्म यांचीही माहिती सत्संगात दिली जाते.
५. सत्संगांमध्ये टप्प्याटप्प्याने जिज्ञासूंना गुरुकृपायोगानुसार साधना शिकवली जाते. एकूण ४ श्रेणींमध्ये गुरुकृपायोगानुसार साधनेचे सर्व प्रशिक्षण पूर्ण होते. दुसर्या श्रेणीपासून साधनेचे प्रायोगिक प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून एक प्रकारे गुरुकृपायोगाचा शास्त्रशुद्ध आध्यात्मिक अभ्यासक्रमच सिद्ध झाला आहे.
अशा प्रकारे साधना-सत्संग उपक्रमांच्या माध्यमातून साधकांमुळे जोडल्या गेलेल्या प्रत्येक जिज्ञासूपर्यंत सर्व जण श्रीगुरूंची संकल्पशक्ती अनुभवत आहोत. साधना-सत्संगाची सेवा म्हणजे केवळ कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञताच आहे. ‘गुरुमाऊली’ या व्यतिरिक्त आमच्याकडे शब्दच नाहीत. समाजातील अधिकाधिक जिवांना आपल्या या दिव्य कार्याचा, आध्यात्मिक प्रेमाचा लाभ होण्यासाठी अधिकाधिक जिवांना स्वत: साधना करून जीवन आनंदी करण्याची प्रेरणा मिळो, ही साधना सत्संगांची सेवा आम्हा सर्वांकडून आपल्याला अपेक्षित अशी करवून घ्यावी’, हीच आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’