सनातन संस्थेची हिंदु राष्ट्राची संकल्पना काय आहे ?
सध्या हिंदु राष्ट्राची चर्चा समाजात होते, ती प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात होते. ‘हिंदूंचे हित साध्य करणारी राज्यव्यवस्था’, असा एक विचार सध्या लोकप्रिय होत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आध्यात्मिक राष्ट्ररचनेला हिंदु राष्ट्र’ म्हटले आहे. वर्ष १९९८ मध्ये त्यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ संकलित केला होता. त्यात समाजाला सत्त्वगुणी बनवणे, अध्यात्मकेंद्रीत राज्यव्यवस्था स्थापन करणे आणि त्यायोगे विश्वकल्याण साध्य करणे, ही हिंदु राष्ट्राची संकल्पना सांगितली होती. पुढे हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा पुस्तकात त्यांनी ‘विश्वकल्याणासाठी कार्यरत सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र’, अशी हिंदु राष्ट्राची व्याख्या केली होती. थोडक्यात हिंदूंचे हितच नव्हे, तर विश्वकल्याण साध्य करणे आणि त्यासाठी सत्त्वगुणी समाज निर्माण करणे, हा सनातन संस्थेचा विचार आहे.
सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेत अशी व्यवस्था निर्माण करणे, म्हणजे एक प्रकारे धर्मसंस्थापनेचे कार्य आहे. हे कठीण असले, तरी कालमहिम्यानुसार होणारच आहे, याची निश्चिती बाळगा. याची एक प्रचीती म्हणजे धर्मसंस्थापना जेव्हा होते, तेव्हा देवता स्वतः प्रकट होऊन कार्य करतात. ज्ञानवापीच्या ३ दिवसांच्या सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला वजूखान्यात भव्य शिवलिंग दिसले. देवता स्वतः प्रकट होत आहेत, याचे हे लक्षण आहे. सध्या ‘जी-२०’पासून ‘वन वर्ल्ड, वन फॅमिली’ (एक जग एक कुटुंब) या ब्रीदवाक्याचा प्रचार भारत सरकार करत आहे. यावरून विश्वकल्याणकारी व्यवस्थेचे बीजारोपण आता होऊ लागले आहे, हे लक्षात येते.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त पुणे येथे पत्रकारांसमवेत झालेल्या‘मुक्त संवाद’ कार्यक्रमात दिलेले उत्तर)