दिव्य, अलौकिक आणि एकमेवाद्वितीय सनातन संस्था !
मानवकल्याणासाठी सनातन संस्थेची स्थापना करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी वर्ष १९९९ मध्ये ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. इंदूर (मध्यप्रदेश) येथील त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज हे संस्थेचे श्रद्धास्थान आहेत. ‘जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय परिभाषेत ओळख करून देणे’ आणि ‘साधकांना वैयक्तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून आनंदप्राप्तीपर्यंतचा मार्ग दाखवणे’, या उद्देशाने त्यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रारंभीच्या काळात त्यांनी अभ्यासवर्ग आणि नंतर सत्संग चालू केले. सध्या सनातन संस्था व्यापक स्तरावर अध्यात्म आणि धर्म यांच्या प्रसाराचे कार्य विविध माध्यमांतून करत आहे. ‘अध्यात्म’ हेच मानवी जीवनाचे सार असते. विश्वातील मानवाचे जीवन आनंदी होण्यासाठी सनातन संस्थेने देवतांची कृपा आणि संतांचे आशीर्वाद यांमुळे गेल्या २५ वर्षांत अध्यात्मक्षेत्रात एका अर्थाने मूलभूत, परिपूर्ण अन् उत्तुंग कार्य केले आहे ! |
समाज आणि राष्ट्र यांचे हित करणारे सनातन संस्थेचे व्यापक कार्य !जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून साक्षात् महर्षींनी ज्यांचे अवतारत्व जगासमोर आणले, ते विश्वगुरु, राष्ट्रगुरु आणि मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी वर्ष १९९९ मध्ये सनातन संस्थेची स्थापना केली. सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आता संस्थेच्या कार्याकडे पहातांना हे एक दिव्य आणि अलौकिक कार्य असल्याची प्रचीती आल्याविना रहात नाही. सनातनचे अध्यात्म आणि धर्म यांच्या प्रसाराचे कार्य व्यापक स्तरावर विश्वातील मानव, समाज अन् राष्ट्र यांचे हित करणारे कसे ठरले आहे, हे लक्षात आल्यावर मन कृतज्ञताभावाने भरून जाते. समाजाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणार्या सनातन संस्थेच्या या दैवी धर्म आणि राष्ट्र कार्याचा संक्षिप्त परिचय येथे सादर करीत आहोत. संकलक : श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था |
‘आनंद (ईश्वर)प्राप्तीसाठी साधना’ शिकवणारी सनातन संस्था !
अध्यात्माचे ज्ञान अगाध आणि अनंत आहे. सामान्यांना ते कठीण वाटू शकते किंवा ‘यांतील नेमकी कोणती उपासना करायची ?’, असा प्रश्न पडतो. ‘पूजा, देवळात जाणे, उपवास, तीर्थयात्रा, पोथीवाचन, कथा-कीर्तन, व्रतवैकल्ये; म्हणजे देवाचे काहीतरी करणे’, असे सर्वसामान्यांना ठाऊक असते; परंतु आनंद (ईश्वर)प्राप्तीसाठी ‘काळानुसार प्रतिदिन कृतीच्या स्तरावर नियोजनबद्ध साधना कोणती आणि ती कशी करायला हवी ?’, हे सनातन संस्थेने सर्वप्रथम सांगितले. आनंदप्राप्ती हा प्राणीमात्राच्या जीवनाचा एकमेव हेतू असतो. आपण जे सगळे काही करतो, ते आनंद मिळावा म्हणून करतो. आनंद कसा मिळवायचा ? हे केवळ अध्यात्मशास्त्रच शिकवू शकते. हेच सनातन संस्थेने समाजावर बिंबवले.
भावी भीषण आपत्काळ लक्षात घेऊन त्या दृष्टीने पूर्वसिद्धता सांगणारी एकमेव संस्था !
सर्वांनी कोरोना महामारीचा भीषण आपत्काळ अनुभवला. येणार्या काळातही तिसरे भीषण महायुद्ध होणार असल्याचे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. ‘या काळात जगण्यासाठी किंवा तरून जाण्यासाठी कुठल्या उपाययोजना करायला हव्यात ?’, ते ग्रंथ, नियतकालिके, संकेतस्थळे, सामाजिक माध्यमे आदी माध्यमांतून सनातन संस्था सविस्तरपणे सांगत आहे. यात अत्यावश्यक साहित्य जवळ बाळगण्यापासून कुठले अन्नपदार्थ बनवून ठेवायला पाहिजेत ?, धान्याची साठवणूक, औषधी वनस्पतींची लागवड, पाणी आणि वीज यांच्या सुविधा, अग्निहोत्र करणे आदी अनेक विषयांवर सविस्तर माहिती दिली आहे.
सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनेची वैशिष्ट्ये
१. वैज्ञानिक; परंतु सोप्या भाषेत अध्यात्म आणि साधना सांगणे : मानवी जीवनाचा उद्देश काय ? आनंद मिळवण्यासाठी साधना करणे का आवश्यक आहे ? कलियुगात सर्वश्रेष्ठ साधना कुठली ? साधनेची मूलभूत तत्त्वे कुठली ? व्यष्टी आणि समष्टी साधना म्हणजे काय ? आदी सर्व माहिती वैज्ञानिक परिभाषेत; परंतु सोप्या भाषेत आणि सूत्रबद्धरित्या सनातन संस्थेने सर्वप्रथम प्रवचने, सत्संग, ग्रंथ, ध्वनीचकत्या, नियतकालिके आदी विविध माध्यमांतून समाजातील जिज्ञासूंपर्यंत पोचवली.
२. जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकृपायोगाची निर्मिती ! : साधना किंवा ईश्वरप्राप्ती यांचे अनेक मार्ग असले, तरी प्रत्येक मार्गात ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममंगलम्’; म्हणजे ‘केवळ गुरुकृपेनेच शिष्याची प्रगती होऊ शकते’, हे अध्यात्मातील तत्त्व लागू होत असल्यामुळे काळानुसार जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग इत्यादी योगमार्गांचा संगम असलेल्या ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केली. स्वभावदोष निर्मूलन, अहंनिर्मूलन, भावजागृती, नामजप, सत्संग, सेवा, त्याग, प्रीती, हे टप्पे या योगाच्या अंतर्गत सांगितले आहेत. या सर्व टप्प्यांच्या माध्यमातून एकाच वेळी साधना करण्याचा प्रयत्न केल्याने जलद आध्यात्मिक उन्नती होते.
३. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार साधनेला प्राधान्य देणे : सनातन संस्थेच्या साधनेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या अध्यात्माच्या तत्त्वानुसार साधना सांगितली जाते. त्यामुळे ‘सनातन संस्था’ सांप्रदायिक नाही.
४. प्रत्यक्ष साधनेच्या कृती करवून घेणे ! : ‘अध्यात्म हे केवळ २ टक्के शाब्दिक आणि ९८ टक्के कृतीचे शास्त्र आहे’, हे तत्त्व प्रथमतः जगाला सांगणारी सनातन संस्थाच आहे. साधनेतील तात्त्विक सूत्रे प्रत्यक्ष जीवन जगतांना कृतीत आणण्याचे प्रयत्न जिज्ञासूंकडून करवून घेणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत अनेक संतांनी ईश्वरप्राप्तीसाठी षड्रिपू निर्मूलन किंवा अंतःकरणशुद्धीची प्रक्रिया सांगितली आहे; परंतु सनातनच्या साधनेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मनाशी निगडित ही प्रक्रिया शास्त्रशुद्धरित्या कशी करायची ?’, हे ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ या प्रक्रियेद्वारे प्रत्यक्षात शिकवले जाते. त्याचप्रमाणे साधक, शिष्य आणि पुढे भक्त बनण्यासाठी ‘भावजागृतीसाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हेही शिकवले जाते.
५. साधकांना संत घडवणारी सनातन संस्था ! : वरीलप्रमाणे सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊन सनातन संस्थेत संतांची मांदियाळी निर्माण झाली आहे. गुरुकृपायोगानुसार २० मार्च २०२४ पर्यंत १२७ साधक संत झाले आहेत, तर १,०५३ जण संत होण्याच्या मार्गावर आहेत. ज्याला साधना करून ईश्वरप्राप्ती करायची खरोखरच प्रामाणिक इच्छा आहे, त्याच्यासाठी साधनेचा एक ‘आदर्श अभ्यासक्रम’ आणि त्याची ‘फलनिष्पत्ती’ हे सनातन संस्थेने समाजासमोर ठेवले आहे.
सनातनचे चैतन्यप्रसाराचे समाजाभिमुख अध्यात्मकार्य
१. सनातनच्या संतांनी सांगितलेल्या नामजपाचा झालेला लाभ ! : कोरोना महामारीच्या काळात सनातनच्या संतांनी समाजासाठी नामजप दिला. अनेक जणांना हा नामजप केल्यामुळे या महामारीतून लवकर बरे झाल्याच्या किंवा कोरोनाचा संसर्ग न झाल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्या. सनातनच्या संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने अनेकांना त्यांच्या अडचणी सुटल्याच्या अनुभूती आल्या असून सनातनच्या साधकांनाही कार्यातील अडचणी दूर झाल्याच्या अनुभूती आल्या आहेत.
२. वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक उपायांचे संशोधन ! : कुठल्याही शारीरिक, मानसिक किंवा कौटुंबिक त्रासांमध्ये; किंबहुना कुठल्याही समस्यांमध्ये ८० टक्के कारण हे आध्यात्मिक स्वरूपाचे असल्याने त्याच्या निवारणार्थ नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्याने त्रास लवकर न्यून होतो. अशा विविध प्रकारच्या त्रासांवर प्राणशक्ती (चेतना)वहन उपाय पद्धतीच्या माध्यमातून नामजप शोधणे, रिकाम्या खोक्यांचा वापर करणे, भीमसेनी कापूर किंवा नैसर्गिक अत्तर, मोरपिसे आदी सात्त्विक गोष्टींचा वापर करणे, मिठाच्या पाण्याचा वापर करणे, दृष्ट काढणे, अमावास्या-पौर्णिमा या तिथींच्या २ दिवस आधी आणि २ दिवस नंतर वाईट शक्तींचे त्रास वाढतात, हे सांगून अधिकाधिक नामजप करण्यास सुचवणे; वास्तूशुद्धीसाठी वास्तूच्या छताला नामपट्ट्यांचे मंडल घालणे, वाहनशुद्धी आदी विविध प्रकार सुचवले असून हे साधे आणि सोपे उपाय करून अनेक जिज्ञासूंनी वैयक्तिक अडचणी दूर झाल्याच्या अनुभूती घेतल्या आहेत.
३. देवतेचे ३० टक्के तत्त्व कार्यरत असणार्या देवतांच्या चित्रांची निर्मिती ! : साधना करणार्या व्यक्तीला ईश्वराशी अनुसंधान साधणे सोपे जावे, उपासकाला किंवा साधकाला देवतांची उपासना करतांना त्या त्या देवतेचे चैतन्य, शक्ती यांचा अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिव, श्रीकृष्ण, श्रीराम, हनुमान, गणपति, दत्त, महालक्ष्मी आणि दुर्गादेवी या अष्टदेवतांची चित्रे सिद्ध केली आहेत. धर्मशास्त्रातील देवतांच्या वर्णनानुसार, देवतांची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करणारी ही चित्रे कलेच्या माध्यमातून साधना करणार्या सनातनच्या साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध केली आहेत. या देवतांच्या चित्रांकडे पाहून नामजप केल्याने आतापर्यंत अनेकांना ‘भावजागृती होणे, प्रत्यक्ष देवतेचे अस्तित्व जाणवणे, देवतेशी अनुसंधान वाढणे’, अशा अनुभूती आल्या आहेत. देवतांच्या चित्रांत त्या त्या देवतेचे अधिकाधिक तत्त्व येण्यासाठी आजही स्पंदनशास्त्र अन् संतांचे मार्गदर्शन यांनुसार संशोधन केले जात आहे.
४. सात्त्विक अक्षरांच्या नामपट्ट्या : वास्तूशुद्धी, वाहनशुद्धी, तसेच नामजप चांगला होण्यासाठी अक्षरयोगानुसार सात्त्विक अक्षरांच्या आधारे विविध देवतांच्या नामजपांच्या सात्त्विक नामपट्ट्या सनातन संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत.
५. देवतांचे नामजप, आरत्या आणि स्तोत्रे योग्य रितीने म्हणण्यामागील शास्त्र सांगणे ! : उपासना करतांना कोणतीही कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक असते; कारण अशा कृतीचेच परिपूर्ण फळ मिळते. एखाद्या गोष्टीमागील शास्त्र सांगितल्यास तिचे महत्त्व लवकर पटते आणि ती गोष्ट आपल्याकडून अंतःकरणपूर्वक म्हणजेच भावपूर्ण होते. हे लक्षात घेऊन सनातन संस्था देवतांचे नामजप, आरत्या आणि स्तोत्रे आदी योग्यरित्या कसे म्हणायचे ? हेही सांगते.
विविध माध्यमांतून समाजाला अध्यात्माची शिकवण देणारी सनातन संस्था !
चैतन्यदायी आश्रमांची निर्मिती !
ज्यांना आनंदप्राप्तीसाठी निवृत्ती मार्गाने पूर्णवेळ साधना करायची आहे, त्यांच्यासाठी सनातन संस्थेने गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती केली. अनेक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक स्तरावरील पालट झालेल्या चैतन्यदायी अशा सनातनच्या आश्रमांमध्ये साधक आदर्श व्यवस्थापन, आदर्श कार्यपद्धत, आदर्श नियोजन करायला शिकतात. आश्रमांतील चैतन्यामुळे आजूबाजूच्या परिसरांतही चांगले वाटत असल्याचे समाजातील लोक सांगतात.
कल्याण येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन एकदा म्हणाले होते, ‘‘सनातनच्या साधकांना काशी, प्रयाग अशा तीर्थक्षेत्री जाण्याची आवश्यकता नाही; कारण त्यांना आश्रमातच सर्व प्रकारचे चैतन्य मिळत आहे.’’
(सनातनच्या आश्रमांविषयीचा सविस्तर लेख याच विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. – संपादक)
सनातन संस्थेचे धर्म आणि ज्ञान दानाचे कार्य
१. धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र सांगणारी एकमेव ‘सनातन संस्था’ ! : हिंदूंच्या अनेकविध धार्मिक कृतींमागे नेमके काय ‘शास्त्र’ आहे ? सण, व्रते, विधी, धार्मिक कृती या वेळी ईश्वराचे चैतन्य प्रत्यक्ष कशामुळे कार्यरत होऊ शकते ? याविषयीचे दैवी ज्ञान सर्वप्रथम सनातन संस्थेने समाजासमोर मांडले आहे, उदा. गणपतीला लाल फूल वहातात; कारण त्यात श्री गणेशाचे तत्त्व आकर्षित आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असल्याने त्याचा लाभ भाविकाला होतो. ‘नमस्कार कसा करावा ?’, ‘देवघराची मांडणी’, ‘कुंकू लावणे’, ‘औक्षण’ आदी अनेक धार्मिक कृतींमागील शास्त्र सांगण्यापासून ते ‘होळी’ किंवा ‘गणेशोत्सव’ आदी सार्वजनिक उत्सवही धर्मशास्त्रानुसार ‘आदर्श कसे साजरे करावेत ?’ हे सनातन संस्था समाजाला सांगत आहे.
२. धर्मशास्त्र सांगून धर्माभिमान जागृत करणारी ‘सनातन संस्था’ ! : सनातन संस्था १६ संस्कार, पूजा, तसेच सणांच्या वेळी करावयाच्या आणि इतर वेळच्या धार्मिक कृती यांमागील शास्त्र समाजाला सांगते. शास्त्र समजून कृती केल्याने अनेकांना त्या कृतींतून चैतन्य अनुभवता येते. अशा प्रकारे धार्मिक कृतींचे महत्त्व लक्षात आल्याने सनातन संस्कृतीची महानताही आपोआपच प्रत्ययास येते. त्यामुळे अनेक हिंदूंमध्ये स्वअस्मिता, म्हणजेच धर्माभिमान निर्माण होण्यास साहाय्य होते. हे धर्मशास्त्र सत्संग, प्रवचने, फलक, भित्तीपत्रके, संकेतस्थळे, सामाजिक माध्यमांवरील ‘पोस्ट’, व्हिडिओ, नियतकालिके, पंचांग आणि ग्रंथ आदी व्यापक माध्यमांतून समाजापर्यंत विविध भाषांतून पोचवण्याचा अधिकाधिक प्रयत्न संस्था करते.
३. जीवनाचे अध्यात्मीकरण करण्यास शिकवणारी ‘सनातन संस्था’ ! : आहार, विहार, पोषाख, केशभूषा, अलंकार, वास्तू, वाहने आदी सर्व गोष्टी सात्त्विक कशा कराव्यात ? त्यामागील आध्यात्मिक कारणे सांगून ‘जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करावे ?’, याविषयी सनातन संस्था प्रबोधन करत आहे. ‘रांगोळी किंवा मेंदी काढणे, तसेच स्वयंपाक करणे, भोजन करणे आदी कृतीही सात्त्विक कशा कराव्यात ? त्यामागील आयुर्वेदाची, तसेच धार्मिक किंवा आध्यात्मिक कारणे सांगून त्यातून चैतन्याचा लाभ घेतल्याने आपल्यातील देवत्व जागृत होण्यास कसे साहाय्य होऊ शकते ?’, हे आज अत्यंत सहज, सुलभ भाषेत ‘सनातन संस्था’ शिकवत आहे.
४. ग्रंथांद्वारे ज्ञानयोगाचे कार्य ! : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेल्या विविध विषयांवरील फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३६५ हून अधिक ग्रंथांच्या १३ भाषांत ९५ लाख ९६ सहस्र प्रती सनातन संस्थेने प्रकाशित केल्या आहेत. ‘वेद-गीता-ज्ञानेश्वरी’, यांद्वारे त्या त्या काळानुसार धर्मज्ञान सांगितले गेले. सध्या सामान्यांना हे ज्ञान आकलन होणे कठीण असल्याने ते धर्मज्ञान सनातनच्या ग्रंथांतून सोप्या भाषेत आणि वैज्ञानिक परिभाषेत सांगण्यात आले आहे. (सनातनच्या ग्रंथविषयक कार्याची सविस्तर माहिती देणारे लेख ‘सनातन प्रभात’च्या अंकांत वेगळे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. – संपादक)
५. संकेतस्थळाच्या माध्यमातून धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार ! : ‘सनातन डॉट ओआर्जी’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून अध्यात्म सोप्या भाषेत समजावून सांगणे, धर्मशास्त्र शिकवणे, अनेक धर्मविषयक शंकांचे निरसन आणि टीकांचे खंडण करणे, हे कार्य चालू आहे. विविध धार्मिक कृती कशा कराव्यात ? याचे व्हिडिओ, नामजप, स्तोत्रे, आरत्या आदींचे ‘ऑडिओ’ या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहेत. अध्यात्म, साधना, धर्म यांविषयीच्या संकेतस्थळांमध्ये हे संकेतस्थळ अग्रगण्य आहे.
६. सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसार कार्यात ‘सनातन प्रभात’ नियकालिकांचा मोठा वाटा : सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना साधकांना आलेल्या अनुभूती, संतांचे मार्गदर्शन, सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून संतपद गाठलेल्या साधकांचा साधना प्रवास; सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अध्यात्म, साधना, धर्म, राष्ट्र यांविषयीचे तेजस्वी विचार आदी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून प्रसिद्ध केले जाते. याचा सनातनच्या साधकांसह समाजालाही लाभ होतो.
सनातन संस्थेचे सूक्ष्मातील कार्य !
महाभारताचे युद्ध चालू होण्यापूवी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, ‘तुला केवळ स्थुलातून कृती करायची आहे. प्रत्यक्षात युद्ध मी पूर्वीच (सूक्ष्मातून) केले आहे.’ प्रत्येक काळात धर्म-अधर्माच्या युद्धात भगवंत सूक्ष्मातून आधी युद्ध करत असतो आणि नंतर स्थुलातून युद्ध होते. येणार्या तिसर्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर होणार्या धर्मसंस्थापनेच्या कार्यातही तशीच प्रक्रिया आहे. भगवंतच सूक्ष्मातून ही प्रक्रिया आधी घडवून आणील आणि नंतर ती स्थुलातून होणार आहे. पृथ्वीवरील अनेक संत-महात्मे, अवतारी जीव हे धर्मयुद्धात सूक्ष्मातून सहभागी होत असतात. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील अवतारी कार्यही हिमालयातील अनेक ऋषितुल्य संत-महात्म्यांप्रमाणेच आहे.
दैवी कणांच्या माध्यमातून ईश्वराने त्याच्या अस्तित्वाची साक्ष देणे !
चैतन्याचे घनीकरण होऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हातावर ५ जुलै २०१५ या दिवशी प्रथम ‘दैवी कण’ (‘डिव्हाईन पार्टिकल्स’) दिसून आले. त्यानंतर सनातनच्या आश्रमांमध्ये, साधकांच्या घरी, साधकांच्या अंगावर, त्यांच्या वस्तूंवर, सात्त्विक वस्तूंवर अशा अनेक ठिकाणी सनातनच्या साधकांना अनेक मास दैवी कण आढळत होते आणि अजूनही आढळतात. सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. ‘आय.आय.टी. मुंबई’ येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. तेथे हे कण धातूचे नसल्याचे सांगण्यात आले. दैवी कणांच्या चाचणीतून मिळालेली ही सूत्रे (फॉर्म्युला) सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या सूत्रांशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे आम्ही ज्याला ‘दैवी कण’ म्हणत आहोत, ते नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते.
सनातन संस्थेने दैवी बालक ओळखणे आणि हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी घडवणे !
दैवी बालक ओळखणारी सनातन संस्था !
भारतात आद्यशंकराचार्य, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्यासारख्या लहानपणीच संत असलेल्यांची, अनेक चमत्कार करण्याची क्षमता असणार्यांची आणि जगाला मार्गदर्शन करणार्यांची कितीतरी उदाहरणे आहेत. अशांना ‘आध्यात्मिकदृष्ट्या असामान्य बालक’, म्हणजे ‘स्पिरिच्युअल चाईल्ड प्रॉडिजी’, असे म्हणावे लागेल. सनातन संस्थेने स्वर्ग, महर्, जन आदी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या १ सहस्रांहून अधिक बालकांना सूक्ष्म परीक्षणाद्वारे ओळखले आहे. त्यांना ‘दैवी बालक’, असे म्हटले आहे. ही बालके येणार्या काळात हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी सक्षम बनतील. अशा अनेक बालकांना सनातन संस्थेने ओळखून त्यांची वैशिष्ट्ये ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये छापून समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंदु राष्ट्र चालवणारी पिढीही निर्माण करणे !
लक्षावधी वर्षे सनातन संस्कृती ही धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेमुळे टिकून राहिली आहे. ‘काळगतीनुसार पुन्हा एकदा धर्मसंस्थापना होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. इथे राजकीय नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावर एक आदर्श राज्य चालवण्यासाठी प्रजाही तेवढीच नीतीमान, गुणसंपन्न आणि त्यागी असणे आवश्यक असते. साधनारत आणि धर्माधिष्ठित प्रजा अन् राजा, हेच आदर्श राज्य चालवू शकतात. अशी साधनारत आणि धर्माधिष्ठित प्रजा निर्माण होण्यासाठी समाजाला योग्य साधना सांगून धर्माचरण करण्यास प्रवृत्त करणे, धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगणे आदी माध्यमांतून धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार सनातन संस्था करत आहे. त्यामुळे एक प्रकारे येत्या काळातील रामराज्य चालवणारी पिढी घडवण्यात सनातन संस्थेचे हे अतुलनीय योगदान आहे.
सनातन संस्थेने समाजात संपादन केलेला विश्वास !
१. सनातनचे साधक त्यांच्या सत्त्वगुणामुळे लगेच ओळखू येणे : नम्रता, प्रामाणिकपणा, प्रेमभाव, तत्त्वनिष्ठता, समाजाला साधना सांगण्याची तळमळ, सात्त्वितकतेची आवड आदी सनातनच्या साधकांची काही गुणवैशिष्ट्ये आहेत. योग्य साधना करत असल्यामुळे साधकांचा सत्त्वगुण वाढतो. सात्त्विकतेमुळे, त्यांच्या व्यक्तीमत्त्वात झालेल्या पालटांमुळे सनातनचे साधक समाजातील लोकांना लगेच लक्षात येतात. समाजातील दुकानदार, भाजीवाले, सामान्य व्यक्ती, पोलीस, प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सनातन संस्थेच्या साधकांनी मोठ्या प्रमाणात विश्वास संपादन केला आहे.
२. पोलीस प्रशासन आणि अन्य यांच्याकडून गौरवोद्गार ! : ‘सनातनची नामदिंडी, म्हणजे आम्हाला चिंताच नाही’, असे उद्गार अनेक ठिकाणचे पोलीस नेहमी काढतात. समाज किंवा राष्ट्र-धर्मविषयक काही निवेदने देण्यासाठी सनातनचे साधक गेल्यास मुख्याध्यापक, पोलीस किंवा लोकप्रतिनिधी ‘तुमचे उपक्रम पुष्कळ चांगले असतात’, असे आवर्जून सांगतात आणि त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी प्रवचन घेण्याचे निमंत्रणही देतात. समाजाने दाखवलेला हा विश्वासच सनातनची शक्ती आहे.
सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मान !
राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती अन् संघटना यांना ‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाऊंडेशन’ यांच्याकडून ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ आणि ‘देवभूमी रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. उल्लेखनीय अध्यात्मप्रसाराकरता ‘सनातन संस्थे’ला ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ हा पुरस्कार देण्यात आला. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. १४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी डेहराडून येथील सांस्कृतिक विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज, राज्याचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, श्री हरि चैतन्य पुरी महाराज, डॉ. उमाकानंद सरस्वती महाराज, पुरस्कार संमेलनाच्या आयोजिका ‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाऊंडेशन’च्या अध्यक्षा डॉ. वैदेही ताम्हण आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते.
संकलक : श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात. |