पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर प्लास्टिक बंदी !
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांची माहिती !
पुणे – ‘जागतिक वनदिना’चे औचित्य साधत शिवनेरीवर प्लास्टिक बंदीची संकल्पना राबवण्यात येणार आहे. शिवनेरीवरील जैवविविधता अबाधित रहावी आणि पर्यटकांना शिवनेरीवर येण्यासाठी भुरळ पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २१ मार्च पासून गडावर पाण्याची बाटली सोडून कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक, तसेच तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट आणि काडेपेटी घेऊन जाण्यास मनाई करण्यात येत आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. (स्तुत्य निर्णय ! परंतु त्याची कार्यवाहीही तशीच काटेकोरपणे व्हायला हवी ! – संपादक)
वाढत्या उन्हामुळे केवळ पाण्याची बाटली गडावर घेऊन जाण्याची अनुमती असेल; परंतु ती बाटली गडावर इतरत्र कोठेही न टाकता पर्यटकांनी आपल्यासह पुन्हा खाली घेऊन येणे अनिवार्य केले आहे; मात्र येत्या ५ जूनपासून पुढे कायमस्वरूपी गडावर प्लास्टिकची पाण्याची बाटली घेऊन जाण्यावर मनाई असेल. गडावर ठिकठिकाणी जुन्नर वनविभाग आणि पुरातत्व विभाग यांकडून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध असेल. ‘वनविभागाकडून शिवनेरीवरील पर्यवरणाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ही ठोस पावले उचलली जात असून पर्यटकांनी पडताळणीसाठी साहाय्य करावे’, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी केले आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड, हे पर्यटनासाठी नसून ते शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा यांची प्रतिके आहेत, हे पर्यटकांनी लक्षात ठेवले पाहिजे ! – संपादक)