नाशिकमध्ये रस्त्यावर मॅफेड्रॉन विकणार्‍याला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – रस्त्यावर भाजीप्रमाणे मॅफेड्रॉन (एम्.डी.) विकणार्‍याला पोलिसांनी येथे अटक केली आहे. हा विक्रेता अमली पदार्थ विकण्यासाठी सामनगाव रोड परिसरात रस्त्यालगत ग्राहक शोधत होता. केवळ २३ वर्षांच्या किरण चव्हाण याच्याकडून पोलिसांनी ५८ सहस्र रुपयांचे १९.३९ ग्रॅम एम्.डी. वजनकाट्यासह जप्त केले. परिसरातील शासकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरही हा अमली पदार्थ तो विकत असे.

गुजरातमार्गे एम्.डी. नाशिकमध्ये येत असल्याची माहिती पोलिसांना आहे. किरण याला हे पदार्थ पुरवणारे संशयित राहुल आणि रोहित पसार झाल्याचे समजते. या परिसरात अमली पदार्थ विकण्याचे दायित्व संबंधित टोळीने किरणवर दिले होते.

ऑक्टोबर २०२३ मध्ये सामनगाव येथे एम्.डी. निर्माण होणारा कारखाना आणि गोदाम पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर ‘बडी भाभी’ची टोळी आणि माफिया ललित पानपाटील याच्याशी संबंधित टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

संपादकीय भूमिका

अमली पदार्थांची बजबजपुरी होईपर्यंत पोलीस काय करत होते ? प्रत्येक शहरात कित्येक वर्षे गल्लोगल्ली दिसणार्‍या गर्दुल्ल्यांकडे पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते, तर आजसारखी भयानक अवस्था झाली नसती !