आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक आदींचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश !
पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ते आदींना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. शहरातील ११० जणांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले होते, त्यांपैकी ८५ जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त कायम रहाणार असून ज्या ठिकाणी बंदोबस्ताची आवश्यकता नव्हती, अशा २५ ठिकाणांचा बंदोबस्तही काढून घेतला आहे. शस्त्र परवाना असलेल्या नागरिकांकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, बंदूक अशी शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे.