पुणे महापालिका नाल्यातील पाणी शुद्धीकरणाचा विचार करत आहे ! – महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले
पुणे – ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा’च्या (एन्.टी.पी.) आदेशानुसार सांडपाणी प्रक्रिया करून ते पाणी नदीमध्ये सोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची अधिकाधिक क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे, तसेच शहरातील वेगवेगळ्या भागांतील नाल्यांच्या पाण्यावरही प्रक्रिया करण्याचा विचार चालू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी १९ मार्च या दिवशी दिली. भोसले पुढे म्हणाले की, सध्या महापालिकेच्या प्रकल्पांमधून ४७७ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होते. नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांमधून ९६ एम्.एल्.डी. सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. ‘जायका’ प्रकल्पांतर्गत ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे चालू आहेत.