स्त्रियांकडून मद्यविक्री !
दारूच्या व्यसनाने आजतागायत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अनेकांना कर्जबाजारी केले आहे, तर अनेकांना रस्त्यावर आणले आहे. व्यसनाच्या अधीन झालेल्यांना पत्नी, लेकरे तुच्छ मानायला लावणारी दारू सुखी संसारात विष पेरण्याचे कार्य करते. दारू केवळ तिचे सेवन करणार्याचाच र्हास करत नाही, तर त्या घरातील कुटुंबियांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागतो, घरातील लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. दारू पिणार्याकडून नशेत अनेकदा धिंगाणा घातला जात असल्याने त्याचा त्रास शेजार्यांनाही सहन करावा लागतो. मद्यविक्रीतून प्रतिवर्षी राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने कोणतेही राज्य राज्यात दारूबंदी करण्यास अनुकूल नसते. तरीही दारूमुळे होणारी सामाजिक हानी लक्षात घेऊन बिहार, गुजरात, मिझोराम, नागालँड, मणीपूर आदी राज्यांत, तर काही राज्यांतील गावांत आणि तालुक्यांत संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे. ही दारूबंदी लागू करण्यात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. आजही अनेक गावांत दारूबंदी करण्यासाठी स्त्रियांनी मोर्चे काढल्याच्या, आंदोलने केल्याच्या बातम्या वाचनात येतात.
उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरीमध्ये मात्र परिस्थिती अगदी उलट आहे. लक्ष्मणपुरी शहरात दारूविक्रीचे व्यवसाय चालवण्यात स्त्रिया अग्रेसर आहेत. नवीन आर्थिक वर्षांमध्ये शहरातील १ सहस्र ४६ दारूच्या दुकानांपैकी ३७० दुकाने महिलांना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. येत्या १ एप्रिलपासून शहरातील एक तृतीयांश दारूच्या दुकानांवर दारू विकण्यासाठी महिला दिसून येतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्त्रियांनी दारूची दुकाने चालवण्यास घेण्यामध्ये यंदा ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारने उपलब्ध केलेल्या मद्यविक्रीच्या एकूण परवान्यांपैकी ३५ टक्के परवाने स्त्रियांनी मिळवले आहेत. कोणतीही विशेष सवलत दिली गेली नसतांना गेल्या ५ वर्षांत दारूच्या दुकानांचे परवाने मिळवण्यात स्त्रिया अग्रेसर बनल्या आहेत. केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया’च्या माध्यमातून तरुणांना व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या संधीचा लाभ घेत अनेकांनी आपल्या गलेलठ्ठ वेतनाच्या नोकर्या सोडून नवीनतम व्यवसायात जम बसवला आहे. असे असतांना दारूच्या व्यवसायात स्त्रियांना अधिक रुची का ? दारूचा व्यवसाय हा अल्प श्रमात अधिक उत्पन्न मिळवून देणारा असला, तरी दारूमुळे होणारी हानी लक्ष्मणपुरीमधील स्त्रिया केव्हा लक्षात घेणार ? दारूच्या व्यवसायात रुची दाखवण्यामध्ये आज लक्ष्मणपुरीच्या स्त्रिया आघाडीवर आहेत. उद्या हेच लोण अन्य राज्यांत पसरू लागेल. दारूच्या व्यवसायातील स्त्रियांचे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणे भारतीय संस्कृतीला शोभणारे नाही !
– श्री. जगन घाणेकर, मुंबई