गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या ७ पवित्र नद्यांचे महत्त्व !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
१. नर्मदा
‘नर्मदेची महती अपार आहे.
गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु।। – नारदपुराण, पूर्वखण्ड, अध्याय २७, श्लोक ३३
अर्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधु आणि कावेरी तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.
असा श्लोक स्नान करतांना म्हटला जातो. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या भारताच्या ७ पावन नद्या आहेत.
२. गंगा
पुण्या कनखले गङ्गा कुरुक्षेत्रे सरस्वती।
ग्रामे वा यदि वाऽरण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा।। – मत्स्यपुराण, अध्याय १८६, श्लोक १०
अर्थ : कनखल येथे गंगा आणि कुरुक्षेत्र येथे सरस्वती पवित्र आहे. (मात्र) गाव असो वा अरण्य, नर्मदा नदी सर्वत्र पवित्र (पुण्यदायिनी) आहे.
गंगा ही (कनखळ) हरिद्वारपर्यंतच पुण्यपावन आहे. हरिद्वार येथेच गंगेला प्रचंड कालवे काढले आहेत. तिचे सगळे पाणी कालव्यांद्वारे घेता येईल, इतके प्रचंड कालवे आहेत. तिला अडवलीच आहे. सगळे पाणी येथेच अडवता येते आणि येईलही. हरिद्वारनंतर गंगेची मूळधारा यायचीच नाही. पावसाळा सोडला, तर आठही मास ९० टक्क्यांहून अधिक गंगा येथेच संपते.
कानपूर, प्रयाग, काशी, पाटणा आणि कोलकाता अशी प्रचंड शहरे गंगातीरावर वसलेली आहेत. या शहरातील घाण पाणी गंगेतच आणून सोडले आहे. कानपूरला चामड्याचे प्रचंड कारखाने आहेत. चामड्याचे पाणी गंगेत मिसळले जाते. त्यामुळे ती भीषण दुर्गंधी येते. हरिद्वारनंतर गंगा जवळजवळ दुर्लभ झाली आहे आणि होत आहे. पावित्र्यही आटले आहे.
रेवापुराणात म्हटले आहे, ‘कलियुगाची ५ सहस्र वर्षे झाली की, गंगेची महती न्यून होईल. कलियुगाच्या ५ सहस्र वर्षांनंतर म्हणजे वर्ष १८९५ च्या आसपासच गंगेची ही अवस्था होईल.’
३. यमुना
यमुनेत अनेक कालवे काढल्यामुळे आगरा शहराच्या दृष्टीने यमुनेचे पाणी संपल्यासारखे आहे. देहली, आगरा आणि इरावा येथील घाण त्यात येते. पावसाळा सोडला, तर नदीमध्ये कमरेइतके पाणीही नसते. यमुना नाही अर्थात् पवित्रताही नाहीच.
४. गोदावरी
गोदावरीची अवस्था तर नाशिकजवळ पुष्कळच शोचनीय झाली आहे. उगमापासून म्हणजे त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या ३० किलोमीटरवर नाशिक येथे गोदावरीचे पावित्र्य संपते. नाशिक शहर अफाट वाढले आहे. तेथे अनेक उद्योगधंदे आहेत. औद्योगिक क्षेत्र प्रचंड वाढले आहे. सगळी घाण गोदावरीला मिळते. हे घाण पाणी गोदावरीपेक्षाही अधिक आहे. उगमापासून अवघ्या ३० किलोमीटरवरच गोदावरीची पवित्रता आटवली आहे. पैठणला तर ‘नाथसागर’मुळे ‘गोदावरी होती कि नव्हती ?’, अशी अवस्था झाली आहे.
५. कावेरी
कावेरी नदीवर वीज निर्माण करण्याचे प्रचंड प्रकल्प उभे आहेत. तिरावर ‘त्रिपतापल्ली’सारखी मोठी शहरे आहेत. तेथील घाण येते. तिची मूळ धारा आणि पावित्र्य हे प्रकल्प अन् घाण यांनी मिटवून टाकले आहे.
६. सिंधू नदीचीही दयनीय कथा आहे. कलियुगी सरस्वतीनदीचा लोप झालेला आहे.
७. नर्मदा नदीचे महत्त्व
नर्मदा अमरकंटकातून निघते आणि भृगुक्षेत्री (भडोचला) सागराला मिळते. ती पहाडातून पहाड फोडून वहाते. दोन्ही तिरांवर पर्वतांची रांग आहे. त्यामुळे कालवे नाहीत. देहली, आगरा, पाटणा, कोलकाता, नाशिक, मैसुरू (श्रीरंगम्) यांसारखी प्रचंड शहरेही नाहीत. त्यामुळे घाण नाही. पाणी विपुल ! तसेच पावित्र्यही विपुल !
शतकाआधीची नर्मदा आजही तशीच आहे, पावन आणि विपुल ! तशीच ती पुढेही राहील. ‘पुण्या सर्वत्र नर्मदा।’ (मत्स्यपुराण, अध्याय १८६, श्लोक १०) म्हणजे ‘नर्मदा नदी सर्वत्र पवित्र (पुण्यदायिनी) आहे.’
नर्मदा, नर्म-सुख देते ती नर्मदा ! विंध्याचलाच्या अमरकंटकातून निघते. पूर्वेकडून पश्चिमेकडे वहाते. ती पश्चिमवाहिनी आहे. ती उधळत उधळत जाते; म्हणून तिला ‘रेवा’ म्हणतात. रेवा याचा अर्थ उड्या मारणे. उधामत, उधळत उड्या मारत जाते. लहान मुलीसारखी अवखळपणे निर्थकपणे वहाते. भृगुक्षेत्री (भडोचजवळ) सागराला मिळते.
७ अ. पुराणांनी वर्णन केलेली नर्मदा !
पुराणांनी नर्मदेची महती मुक्त कंठाने गायली आहे. तिचे स्मरण, दर्शन आणि स्नान यांनी मानव विकसित, समृद्ध अन् पावन होतो. पाप, घाण आणि मनोमल दूर होतात. जशी श्रद्धा तशी अनुभूती ! जशी उत्कटता, आर्तता आणि अविचल श्रद्धा असेल, तशी साक्षात् अनुभूतीही येते. शिवशंकर तप करतात. उग्र तप आचरतात. घाम फुटतो. त्या घामाची नदी बनते. तीच नर्मदा. ती शंकराची म्हणून ‘शांकरी’ !
स्कंद आणि वायु पुराणांत नर्मदेची अपार महती सांगितली आहे. रेवाखंड स्वतंत्र भाग आहे. मत्स्य, कूर्म, शिव इत्यादी पुराणांत नर्मदेचा महिमा आहे. नर्मदेच्या अपूर्वतेने ऋषिमुनी स्तिमित झाले. येथेच राहिले. येथेच त्यांनी तप केले, व्रत आचरले आणि तिचा महिमा गायिला. यशोगाथा गायिली, तेच ‘नर्मदा पुराण’ स्वतंत्र पुराण आहे (ऋषींनी रचलेले). विंध्यप्रदेशातील अमरकंटकातून निघाली, कुंडातून निघाली, मैकल पर्वतावरच हे कुंड, म्हणून ती ‘मैकलासुता.’ विंध्याचल आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या मध्ये मैकल पर्वत आहे. या पर्वतावरच मैकल, व्यास, भृगु, कपिल इत्यादींनी तप केले. शिवशंकरांनीही तप केले. येथील कुंडातूनच नर्मदा प्रगटली. येथे जे गाव आहे ते अमरकंटक ! ते समुद्रसपाटीपासून ३ सहस्र फूट उंच आहे. अमरकंटक हे तीर्थ आहे; कारण येथे नर्मदा प्रगटली आहे. अमरकंटक २५ ते ३० घरांचे लहानसे गाव आहे. तेथे अहिल्याबाईंची धर्मशाळा आहे, तसेच येथे दाट जंगल आहे. पश्चिम वायू वेगाने येतो. उन्हाळ्यातही येथे थंडी असते. येथे कुंड-११ कोनांचा, चारही बाजूला शिड्या, २६० हाताचे परीघ (वर्तुळ) आहे. कुंडात १३ फूट खोल पाणी आहे. कोटी तीर्थ ! येथे मार्कंडेय आश्रम आहे, तसेच ज्वालेश्वर, कपिलधारा, दूधधारा (पर्वतावरून उतरणारी नर्मदा), कपिलधारा ते दमगट घाट जंगली रस्ता आहे.
७ आ. नर्मदा परिक्रमा : नर्मदा परिक्रमा करण्याची परंपरा आहे. जालेश्वर, कपिलधारा, दूधधारा, दमगट घाट, करागंगर संगम, हराई टोल, करनिया, कण्वासंगम, बुधीसंगम, तुडारसंगम, भीमकुंडी, सुरसवा, दम्हेडी, देवरी (पर्वताची वाट) नंतर लोटी टोला, शोभापूर, कंचतपुर गाडासराई, रेटी संगम, कुल्हार संगम (पाच मैल), नीदर (गाव) कंडकापा असा मार्ग आहे.
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२१)