ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा देवाप्रती असलेला भोळा भाव आणि भक्ती !
‘देव भावाचा भुकेला’, हे पू. नरुटेआबांनी (पू. राजाराम भाऊ नरुटे यांनी) गाठलेल्या संतपदावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. लौकिकार्थाने फारसे शिक्षण नसूनही केवळ लहानपणापासून देवाची आवड असल्यामुळे ते देवाविषयी पुष्कळ काही बोलतात. हा देवाचा ध्यास, अनुसंधानच त्यांना संतपदापर्यंत घेऊन गेले. देवाला पैसा-अडका किंवा श्रीमंती सोहळे यापेक्षा व्यक्तीच्या मनातील भक्तीभावच आवडतो; म्हणून ‘देवापर्यंत पोचण्यासाठी मनापासून देवभक्ती करायला हवी, अखंड देवाच्या अनुसंधानात रहायला हवे’, हे पू. नरुटेआबांच्या उदाहरणावरून शिकता येते. पू. नरुटेआबा कलंकेशव (कलंकीकेशव), म्हणजे पद्मनाभ संप्रदायानुसार साधना करतात.
१.५.२०२२ या दिवशी श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी त्यांचे वडील पू. राजाराम भाऊ नरुटे यांची मुलाखत घेतली. ती सारांशरूपाने येथे दिली आहे.
१. ‘देवपूजेसाठी इतरांना साहाय्य केले, तरी देवपूजा केल्याएवढा आध्यात्मिक लाभ होतो’, असे पू. नरुटेआबांनी सांगणे
श्री. शंकर नरुटे : पू. आबा, तुम्ही कुठला नामजप करता ?
पू. नरुटेआबा : ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय । परमात्मा प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ।
श्री. शंकर नरुटे : ठीक आहे. तुम्ही कुठलाही नामजप करा; पण ‘आता पूजा इत्यादी पुष्कळ काही करायला हवे’, असे नाही. इतरांना देवपूजेसाठी फुले देण्यासाठी वेळ दिला नाही, तरी चालेल. नुसता नामजप केला, तरी चालेल.
पू. नरुटेआबा : पूजा ही केलीच पाहिजे. देवपूजा चुकवून कसे चालेल ? देवपूजा आणि देवभक्ती दोन्ही श्रेष्ठ आहेत. ‘देवपूजेसाठी कुणी आपल्याला फुले दिली किंवा आपण त्यांना फुले दिली’, तरी या दोन्ही गोष्टीत आध्यात्मिक दृष्ट्या तेवढाच लाभ आहे.
श्री. शंकर नरुटे : हो, ते चांगलेच आहे. त्याविषयी आम्ही काही म्हणत नाही; पण आता तुमचा तो टप्पा झाला आहे. आता तुम्ही संत झाला आहात. तुम्ही आता अधिकाधिक समष्टीसाठी नामजप करा. मध्येमध्ये नुसता ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, एवढा नामजप केला, तरी बस झाले.
पू. नरुटेआबा : हो, करीन !
२. ‘देवावरील श्रद्धेमुळे देवच सर्व करून घेत आहे’, असा भाव असलेले पू. राजाराम नरुटे !
श्री. शंकर नरुटे : तुम्हाला कधी विठ्ठलाचे दर्शन होते का ?
पू. नरुटेआबा : कधी विठ्ठल दिसतो, कधी केशव दिसतो. त्यांना डोळ्यांपुढे आणले म्हणजे, ते येतातच. तोच विठ्ठल, तोच राम ! तोच दहा अवतार घेणारा हरि ! श्री हरिरूपी राम, हरिरूपी कृष्ण, हरिरूपी विठ्ठल, हरिरूपी कलंकेश्वर (पू. आबांच्या संप्रदायाचा देव) ! ही सर्व त्या हरिचीच रूपे आहेत.
श्री. शंकर नरुटे : तुम्हाला हरि दिसतो का ? तुम्ही त्याच्याशी बोलता का ?
पू. नरुटेआबा : हो. मनातून बोलणे होते. त्यांनी सुचवल्याविना आपल्याला कसे बोलता येईल ? प्रत्येक शब्द कुठून येतो ? देवाविना आपल्या मनात विचार येईल का ? तोच सुचवतो आणि तोच सर्व करतो. मी काहीच करत नाही. या वयात (वय ९० वर्षे) त्याच्याचमुळे मी चालता-फिरता आहे. ‘मी फिरतो’, असे नसून भगवंतच मला फिरवतो. तो मला ‘ऊठ, चल फिरायला !’, असे म्हणतो आणि घेऊन जातो. अशा उन्हातही तो मला बाहेर घेऊन जातो; पण मला त्याचा काहीच त्रास होत नाही; कारण तोच मला सर्व प्रकारे सांभाळतो.
श्री. शंकर नरुटे : आता उन्हात जायचे नाही.
पू. नरुटेआबा : हो, मी नाही जात. तो भगवंत मला नेतो.
३. भक्तीतेजामुळे प्रतिभा जागृत होऊन ओव्या सुचणे !
श्री. शंकर नरुटे : तुम्ही गुरे फिरायला घेऊन जातांना ओव्या रचायचा ना !
पू. नरुटेआबा : हो !
या वेळी पू. नरुटेआबांनी ते गुरे फिरायला घेऊन जातांना स्वतः रचलेल्या ओव्या म्हणून दाखवल्या.
श्री. शंकर नरुटे : देवाविषयीच्या काही ओव्या किंवा अभंग आहेत का ?
पू. नरुटेआबा : आहेत की अभंग.
केशवा माधवा लीला नाटकिया (टीप १)।
रक्षी देव प्रजा दिनरात दिनरात ।।
देव दत्तवारू राघवाचा थोर ।
फेरी वारो वर तिन्ही लोकी, तिन्ही लोकी (टीप २)।। १ ।।
तिन्ही लोकांत देव दत्तवारू फिरतो ।
कमलायुगाचा (टीप ३) सखा कारभारी ।
धर्मदरबारी न्याय सांगतो ।
तो न्याय देतो ।। २ ।।
टीप १ – नटखट, खोडकर
टीप २ – स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही ठिकाणी देवाचा घोडा फिरतो आणि त्या ठिकाणी न्याय देतो
टीप ३ – कलियुग
ही देवाची गाणी किंवा अभंग ! मी हे अभंग जुळवले आहेत. ‘जसे प.पू. डॉक्टर आपल्याला आपली आध्यात्मिक पातळी सांगून आपण साधनेत कुठल्या टप्प्याला आहोत’, हे सांगतात, तसे कलंकीकेशव संप्रदायात कलंकीकेशव सर्वांना न्याय देतो, म्हणजे सर्वांना त्यांच्या त्यांच्या साधनेप्रमाणे फळ देतो.’
पू. आबांनी असे काही अभंग म्हणून दाखवले. अभंग म्हणतांना पू. आबांचा भाव जागृत होत होता. ते एकाग्रतेने अभंग म्हणत होते. त्यांना वयाच्या मानाने त्यांना काही शब्द आठवत नव्हते, तरी ते शब्द आठवून आठवून अभंग म्हणत होते.
पू. नरुटेआबा : आपण पंढरपूरला जातो आणि ‘विठ्ठल’ म्हणतो. विठ्ठलाचा अभंग गातो, तसे हे कलंकेश्वराचे अभंग आहेत.
४. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘तुम्ही संत आहात’, असे सांगितल्यावर पू. नरुटेआबा साधनेविषयी पुष्कळ बोलू लागणे
श्री. शंकर नरुटे : परम पूज्य सगळेकाही सांगतात. ‘तुम्ही संत आहात’, असे परम पूज्यांनीच सांगितले ना ! ते केवळ सनातन संस्थेतील साधकांनाच नाही, तर इतर कुठल्याही मार्गाने साधना करणारे असले, तरी त्यांची आध्यात्मिक पातळी सांगतात. ते देव आहेत ना !
पू. नरुटेआबा : ते (प.पू. डॉक्टर) मला म्हणाले, ‘तुम्ही संत आहात.’ हे ओळखू शकणारे परम पूज्य देवच आहेत.
श्री. शंकर नरुटे : प.पू. डॉक्टरांकडे बघून तुम्हाला काय वाटले ?
पू. नरुटेआबा : मला आनंद झाला. आता मला मागचे काही आठवत नाही, सगळे विसरल्यासारखे होते. ईश्वराशी एकरूप झाल्यासारखे झाले आहे. परम पूज्य कोण आणि मी तरी कोण ? ते आणि मी एकच आहोत. आत्मा हाच परमेश्वर आहे.
श्री. शंकर नरुटे : परम पूज्यांशी भेट झाल्यापासून तुम्ही पुष्कळ बोलायला लागला. पूर्वी एवढे बोलत नव्हता.
पू. नरुटेआबा : हो, बोलत नव्हतो. आता मी पुष्कळ बोलतो. ‘प.पू. डॉक्टरांनी जादू केली’, असे मला वाटते. प.पू. डॉक्टरांना प्रथमच भेटलो आहे. (क्रमशः)
– श्री. शंकर राजाराम नरुटे (पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.५.२०२२)