सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी घेत असलेल्या दादर, मुंबई येथील अभ्यासवर्गात आणि मुंबई सेवाकेंद्र येथे असतांना श्री. अशोक जाधव यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 १. परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या अध्यात्मावरील अभ्यासवर्गाची गोडी लागल्यामुळे साधना करायची ठरवणे

श्री. अशोक जाधव

‘वर्ष १९९० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले (गुरुदेव) यांचे श्री ज्ञानेश्वर मंदिर, दादर (मुंबई) येथे अध्यात्मावर अभ्यासवर्ग असायचे. तिथे मला गुरुदेवांचे प्रथम दर्शन झाले. त्यांचा चेहरा नेहमी हसरा आणि आनंदी असायचा. ते अभ्यासवर्गात देवतांविषयी शास्त्रीय भाषेत माहिती सांगत असत, उदा. ‘गणपतीला दुर्वा, श्री विष्णूला तुळस आणि शिवाला बेल का वहातात ? इत्यादी.’ त्यामुळे मला अभ्यासवर्गाची गोडी लागली. मी घरातील देवतांची प्रतिदिन पूजा करत असे. वरील माहिती ठाऊक झाल्यावर मला पूजा करतांना वेगळाच आनंद मिळू लागला आणि माझे मन हळूहळू निर्विचार होऊ लागले. त्यामुळे मी ‘साधना करायची’, असे ठरवले.

२. अभ्यासवर्ग संपल्यावर मुंबई सेवाकेंद्रात सेवेसाठी जाऊ लागणे

गुरुदेवांच्या अभ्यासवर्गाला श्री. सत्यवानदादा (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) आणि श्री. दिनेश शिंदे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे) गुरुदेवांच्या समवेत येत असत. एकदा सद्गुरु सत्यवानदादांनी मला विचारले, ‘‘मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी येणार का ?’’ मी त्वरित ‘‘हो’’, म्हणालो. त्यांनी मला मुंबई सेवाकेंद्रात बोलावून गुरुदेवांचे निवासस्थान आणि चिकित्सालय दाखवले. तेव्हा प्रथम माझ्या मनात आले, ‘मी येथे काय करणार ?’; परंतु तरीही प्रत्येक अभ्यासवर्ग संपल्यावर मी शनिवार-रविवार आणि नंतर नियमितपणे मुंबई सेवाकेंद्रात सेवेसाठी जाऊ लागलो.

२ अ. भाजी विकत घेतांना ‘आठवड्याचे भाजीचे नियोजन कसे करायचे ?’, ते शिकता येणे : एकदा अभ्यासवर्ग संपल्यावर सद्गुरु सत्यवानदादा मला दादर येथील भाजीच्या बाजारात घेऊन गेले. ‘कुठली भाजी किती दिवस टिकणार ? ताज्या भाज्या कुठल्या ? आठवड्यातील पुढच्या पुढच्या दिवसांसाठी कुठल्या भाज्या घ्यायच्या ?’, हे सर्व गुरुदेवांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदा आठवले या सांगत असत. त्याप्रमाणे मी भाज्या घेत असे. त्यामुळे ‘आठवडाभरासाठी कुठल्या भाज्या आणायच्या ?’, हे मला शिकता आले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मुंबई सेवाकेंद्रात येणार्‍या संतांच्या दर्शनासाठी साधकांना बोलावणे आणि नंतर ‘संतांच्या दर्शनामुळे काय जाणवले ?’, हे विचारून त्याचे अभ्यासवर्गात विश्लेषण करणे

मुंबई सेवाकेंद्रात अनेक संतांचे सतत येणे-जाणे असायचे. तेव्हा गुरुदेव आम्हाला त्या संतांच्या दर्शनासाठी बोलवायचे आणि अभ्यासवर्गात आम्हाला विचारायचे, ‘‘संतांच्या दर्शनाने किती जणांना चांगले वाटले ?, कुणाला चांगले वाटले नाही किंवा त्रासदायक वाटले ?’’ त्यानंतर आम्हाला असे जाणवण्यामागचे कारण गुरुदेव स्पष्ट करून सांगायचे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनुभवलेले द्रष्टेपण !

इंदूर येथे होणार्‍या प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृतमहोत्सवासाठी २० फूट व्यासाचे डफलीच्या आकाराचे प्रवेशद्वार करायचे होते. गुरुदेवांनी ती डफली मुंबईतील सेवाकेंद्रात ‘फोल्डिंग’च्या (दुमडून लहान आकारात ठेवता येईल, अशा स्वरूपात) रूपात बनवली होती. त्यांनी आम्हाला ती आगाशीत घेऊन जाऊन त्याची ३० मिनिटांत जोडणी करायला सांगितली. आम्ही ती घेऊन आगाशीत गेलो; पण आम्हाला जोडणी करायला ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला आणि तेव्हा पावसाचे दिवस नसतांनाही अकस्मात् ५ मिनिटे पाऊस पडला. त्यामुळे डफली भिजली. तेव्हा ‘गुरुदेवांनी डफलीची जोडणी ३० मिनिटांतच का करायला सांगितली ?’, ते आमच्या लक्षात आले.

५. मुंबई सेवाकेंद्र गुरुकुलाप्रमाणे वाटून तिथे सेवा करणार्‍या साधकांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण होणे

मुंबई सेवाकेंद्रात सेवा करणार्‍या साधकांचे ‘एक कुटुंबच आहे’, असे वाटत असे. पूर्वी गुरुकुल असायचे, तसेच तिथे वातावरण होते. आता मला ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हा ‘विश्वची माझे घर’, म्हणजे ‘हे विश्व माझे घर आहे’, असा जाणवतो. ‘येथील प्रत्येक साधकाला मी कुठे तरी पाहिले आहे’, असे मला जाणवते. त्याची प्रचीतीही मला अधूनमधून येते.

६. मुंबई सेवाकेंद्रात सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

६ अ. प्रेमभाव : मी प्रथमच काही दिवसांसाठी मुंबई सेवाकेंद्रात सेवेसाठी रहायला गेलो होतो. माझे साहित्य खोलीत ठेवल्यावर मी गुरुदेवांना भेटायला गेलो. तेव्हा गुरुदेव मला स्वयंपाकघरात घेऊन गेले. तेथे त्यांनी मला ‘गोड-तिखट खाऊचे डबे आणि चहाची भांडी इत्यादी कुठे ठेवले आहे ?’, ते दाखवले. ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही कार्यालयातून इकडे आल्यावर चहा-अल्पाहार घेऊनच सेवेला आरंभ करा.’’

६ आ. साधकांचा वेळ वाचवणे : एखादा साधक सेवेसाठी सेवाकेंद्रात येणार असेल, तर तो साधक येण्यापूर्वीच गुरुदेव त्याला द्यायच्या सेवेचे नियोजन करून ठेवत. त्यामुळे साधकांचा वेळ वाया जात नसे.

६ इ. कुठलीही वस्तू वाया न घालवणे : एकदा सकाळी शीव सेवाकेंद्रात मी केर काढत होतो. केरात ‘यु पिन’ आणि ‘रबर बँड’ पडले होते. ते न उचलताच मी ते केराच्या समवेत पुढे सरकवत होतो. अकस्मात् गुरुदेव तिथे आले. त्यांनी ते पाहिले आणि केरातून त्या दोन्ही वस्तू उचलून ते घेऊन गेले. यातून ‘वस्तू कितीही छोटी असली, तरी ती वाया घालवायची नाही. आपण ती पुन्हा वापरू शकतो’, हे मला शिकता आले.

६ ई. ‘संघभावाने अल्प वेळेत कशी सेवा करायची ?’, ते शिकता येणे : एकदा मुंबई सेवाकेंद्रात प.पू. भक्तराज महाराज आले होते. तेव्हा मला त्यांच्या भक्तांची महाप्रसाद घेतलेली ताटे उचलण्याची सेवा मिळाली. तिथे उपस्थित असलेल्या काही साधकांनी साखळी पद्धतीने ताटे धुतली.(म्हणजे एकाने ताटे उचलून द्यायची, दुसर्‍याने त्यातील खरकटे काढून ती ताटे घासणार्‍याकडे द्यायची) त्यामुळे अल्प वेळेत ती सेवा झाली.

६ उ. इतरांचा विचार करणे : कार्यालय सुटल्यावर मी सेवेसाठी थेट मुंबई सेवाकेंद्रात जात असे. तिथे सेवा करतांना मला वेळेचे भान रहात नसे. तेव्हा गुरुदेव ‘तुमची घरी जाण्याची वेळ झाली आहे’, अशी मला आठवण करून देत असत. दादर येथून विरारला जाण्यासाठी लोकल (रेल्वे) होती. गुरुदेव मला ‘सेवाकेंद्रातून निघण्यापूर्वी काहीतरी खाऊन जा’, असे सांगत किंवा स्वतः खाऊ आणून देत असत. घरी जायला निघण्यापूर्वी मला त्यांच्या चरणांकडे बघून ‘जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन झालें आता ।’, ही ओळ आठवत असे.

७. कृतज्ञता

माझ्या कुटुंबियांनी माझ्या साधनेला विरोध केला नाही. गुरुदेवांच्या कृपेमुळे माझा लहान भाऊही (श्री. रमेश जाधव (वय ६२ वर्षे)) साधनेत आला आणि तो सेवाही करत आहे. गुरुदेवांनीच आतापर्यंत आम्हाला साधनेत टिकवून ठेवले आहे. ‘त्यांच्या कृपेनेच आमची साधना चालू आहे’, यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– श्री. अशोक चंद्रकांत जाधव (वय ६३ वर्षे), कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. (पूर्वी रहाण्याचे ठिकाण – नालासोपारा, मुंबई.), (२४.२.२०२४)