Budaun Children Murder Case : बदायू (उत्तरप्रदेश) येथील २ हिंदु मुलांच्या हत्येच्या प्रकरणातील दुसरा आरोपी जावेद याला अटक !
बदायू (उत्तरप्रदेश) – येथील २ हिंदु मुलांच्या हत्याकांडाच्या प्रकरणातील पसार असलेला दुसरा आरोपी जावेद याला पोलिसांनी बरेली येथून अटक केली आहे. १९ मार्चला सायंकाळी बदायूमधील बाबा कॉलनीत साजिद आणि जावेद यांनी दोन सख्ख्या हिंदु भावांची गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर घटनास्थळावरून पळून गेलेला साजिद हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला, तर त्याचा भाऊ जावेद हा पसार झाला होता. या हत्याकांडानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी साजिद याच्या दुकानाची तोडफोड करून त्याला आग लावली होती. या हत्याकांडानंतर एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यामध्ये जावेद म्हणतो, ‘या हत्येशी माझा काहीही संबंध नाही. जे काही केले आहे ते माझ्या भावाने केले आहे.’
१. जावेद आणि साजिद हे सख्खे भाऊ आहेत. पोलिसांनी साजिद याला चकमकीत मारल्यानंतर त्याच्या मृतदेहाच्या खिशातून बंदूक जप्त केली होती. या बंदुकीतून साजिद याने पोलिसांवर गोळीबार केला होता.
२. पशूंची हत्या करण्यासाठी जो मोठा चाकू वापरला जातो, तो मुलांची हत्या करण्यासाठी वापरला होता. हा मोठा चाकू आणि ४ काडतुसेही साजिद याच्या मृतदेहाच्या जवळ सापडली होती. ती जप्त करण्यात आली आहेत.
३. मुलांच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आरोपींचे वडील आणि काका यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
४. हत्या करण्यात आलेल्या मुलांची आई संगीता यांनी सांगितले,‘जावेद खोटे विधान करत आहे. त्याला सर्व काही ठाऊक होते, त्यानेच माझ्या मुलांचा खून केला.’ मृत मुलांची आजी मुन्नीदेवी म्हणाल्या, ‘जावेदने माझ्या दोन्ही नातवांना मारले आहे. त्याची चौकशी करा. तो खोटे बोलत आहे.’