(म्हणे) ‘आज आमच्याकडे खर्च करण्यासाठी २ रुपयेही नाहीत !’ – राहुल गांधी यांचा दावा

आयकर विभागाने काँग्रेसची बँक खाती गोठवल्याचे प्रकरण

पत्रकार परिषदेत बोलताना उजवीकडे राहुल गांधी

नवी देहली – जर एखाद्या कुटुंबाचे बँक खाते गोठवले गेले, तर त्या कुटुंबासमोर अडचणींचा डोंगर उभा राहील, त्यांना उपाशी मरावे लागेल. हेच काँग्रेस पक्षासमवेत  करण्यात येत आहे. आमच्या पक्षाची खाती एक महिन्यापूर्वी गोठवल्यानंतरही या देशातील न्यायालय अथवा निवडणूक आयोग काहीही बोलायला सिद्ध नाही. सर्व जण शांतपणे हा तमाशा पहात आहेत. आम्ही २० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. आज आम्ही रेल्वे तिकीट विकत घेऊ शकत नाही. आमच्या नेत्यांना प्रचारासाठी एका शहरातून दुसर्‍या शहरात पाठवू शकत नाही. आम्ही विज्ञापन करू शकत नाही. आज आमच्याकडे २ रुपयेही नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला. आयकर विभागाने गेल्या महिन्यात काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. त्यावरून काँग्रेसने ही पत्रकार परिषद घेतली. या वेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी याही उपस्थित होत्या.

सौजन्य TIMES NOW

आता लोकशाही उरली नाही !

राहुल गांधी पुढे म्हणाले, ७ वर्षांपूर्वी १४ लाख रुपयांचा कर भरण्यात काही समस्या आली. त्यावरून २०० कोटी रुपये असलेली आमची बँक खाती गोठवण्यात आली. आयकर कायद्याच्या तरतुदीनुसार अशा प्रकारे कर भरण्यात उशीर झाला, तर अधिकाधिक १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो; मात्र तरीही बळजबरीने आणि गुन्हेगारी पद्धतीने आमच्या विरोधात कारवाई केली जात आहे. भारताचे पंतप्रधान आमचे घटनात्मक अधिकार गुन्हेगारी पद्धतीने हिरावून घेत आहेत. माझे भारतीय स्वायत्त संस्थांना आवाहन आहे की, त्यांनी या विषयात काहीतरी करावे. भारतात लोकशाही आहे, हे सर्वांत मोठे असत्य आहे. आता लोकशाही उरली नाही.

संपादकीय भूमिका 

बँक खाती गोठवून १ महिना उलटला आहे. या काळात काँग्रेसने पक्षाच्या कार्यक्रमासाठी, भारत न्याय यात्रेसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत, हे पैसे काँग्रेसने कुठून आणले, याचा हिशेब राहुल गांधी यांनी आधी दिला पाहिजे !