Bhojshala Survey : २२ मार्चपासून धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे होणार वैज्ञानिक सर्वेक्षण !
२९ एप्रिलपर्यंत सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार !
धार (मध्यप्रदेश) – येथे असलेल्या भोजशाळेचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्याचा आदेश मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर उद्या, २२ मार्चपासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे पथक भोजशाळेचे सर्वेक्षण चालू करणार आहे. पुरातत्व विभागाने धार प्रशासन आणि पोलीस अधीक्षक यांना सर्वेक्षणापूर्वी पुरेसे संरक्षण देण्यास सांगितले आहे, जेणेकरून सर्वेक्षणाचे काम थांबू नये. हिंदु संघटनांच्या मते, भोजशाळेत असलेली कमल मौलाना मशीद श्री सरस्वतीदेवीचे मंदिर आहे. राजा भोजने ही भोजशाळा वर्ष १०३४ मध्ये संस्कृतच्या अभ्यासासाठी बांधली होती. मोगलांनी नंतर आक्रमण करून त्याची तोडफोड करून तेथे मशीद बांधली.
१. सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांच्या ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’ने भोजशाळेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी उच्च न्यायालयात अर्ज प्रविष्ट (दाखल) केला होता. त्यावर उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय दिला होता.
२. न्यायालयाने आदेशात म्हटले होते की, ‘कार्बन डेटिंग’ पद्धतीने परिसराची सविस्तर वैज्ञानिक तपासणी करण्यात यावी, जेणेकरून भूमीच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही संरचना किती जुन्या आहेत आणि त्या किती प्राचीन आहेत, हे निश्चित करता येईल.
तसेच दोन्ही पक्षांच्या दोन प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्वेक्षणाची कार्यवाही व्हावी आणि त्याचे चित्रीकरण करण्यात यावे, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल या दिवशी होणार असून त्यापूर्वी सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
भोजशाळेचा इतिहास१. एक सहस्र वर्षांपूर्वी धार येथे परमार वंशाचे राज्य होते. राजा भोजने वर्ष १००० ते १०५५ पर्यंत राज्य केले. राजा भोज हे श्री सरस्वतीदेवीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी वर्ष १०३४ मध्ये येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे नंतर ‘भोजशाळा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदूंनीही याला सरस्वती मंदिर मानले. २. वर्ष १३०५ मध्ये अलाऊद्दीन खिलजीने भोजशाळा उद्ध्वस्त केली. नंतर वर्ष १४०१ मध्ये दिलावर खान घोरी याने भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. वर्ष १५१४ मध्ये महमूद शाह खिलजीने दुसर्या भागातही मशीद बांधली. ३. वर्ष १८७५ मध्ये येथे उत्खनन करण्यात आले. या उत्खननात श्री सरस्वतीदेवीची मूर्ती सापडली. मेजर किनकेड नावाच्या इंग्रजाने ही मूर्ती लंडनला नेली. सध्या ही मूर्ती लंडनच्या संग्रहालयात आहे. उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेत ही मूर्ती लंडनमधून परत आणण्याची मागणीही करण्यात आली आहे. |
संपादकीय भूमिकादेशात ज्या ठिकाणी मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या आहेत, त्या सर्व ठिकाणांचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा आदेशच केंद्र सरकारने दिला पाहिजे, असेच आता हिंदूंना वाटते ! |