Panjim SmartCity Pollution : पणजीतील ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे धुळीचे प्रदूषण : उच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट !
पणजी, २० मार्च (वार्ता.) : पणजी शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे धुळीचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात २ जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’च्या कामांतील नियोजनशून्यतेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. गोवा सरकार, ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन’ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असून त्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी २६ मार्च या दिवशी सुनावणी होणार आहे.
(सौजन्य : Prime Media Goa)
याचिकेत म्हटले आहे की,
पणजी शहरात मोठ्या प्रमाणात धूळीचे प्रदूषण होत आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमध्ये सध्या नियोजनशून्यता दिसून येते. हा पणजीवासियांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळही प्रदूषणाची नोंद घेण्यास अपयशी ठरले आहे. यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करून पणजीवासियांना दिलासा द्यावा. धुळीमुळे होणार्या प्रदूषणाचे प्रमाण किती आहे ? ते मोजण्यासाठी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी ‘रिअल टाईम बेसिस एअर अँम्बीट क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन’ कार्यान्वित करण्यात यावीत.