महिलांची फसवणूक करणार्‍या आरोपीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

१. पत्नीने गुन्हा नोंदवल्यामुळे जामिनासाठी पतीची उच्च न्यायालयात याचिका

‘पतीने नीट वागवले नाही, धाकधपटशहा दाखवला, सोने-नाणे गहाण ठेवून पत्नीच्या नावावर कर्ज उचलले इत्यादी कारणांनी एका महिलेने रसायनी पोलीस ठाणे, रायगड येथे  तक्रार करून पोलिसांनी ७.८.२०२२ या दिवशी फौजदारी गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे जामीन मिळवण्यासाठी शांतीलाल खरात याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यात त्याच्या पत्नीने खोटी तक्रार केली असून त्याने ‘तिची कुठल्याही प्रकारे फसवणूक केली नाही’, असे म्हटले होते.

२. जामिनाच्या विरोधात पत्नीची हस्तक्षेप याचिका !

या जामिनाच्या विरुद्ध खरात याच्या पत्नीने हस्तक्षेप याचिका प्रविष्ट केली. या याचिकेत तिने म्हटले की, वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून त्यांचे जून २०२२ मध्ये लग्न झाले. त्यानंतर पतीने (शांतीलाल खरात याने) तिच्याकडून वेळोवेळी ७ लाख रुपये उसने घेतले. यासमवेतच तिचे दागिने इत्यादी गहाण ठेवून ३२ लाखांचे कर्ज उचलले. हे सर्व चालू असतांनाच तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे तिच्या लक्षात आले. तिची फसवणूक झाली असल्याने खरात याला जामीन देण्यात येऊ नये.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

३. शांतीलाल खरात याने ४ महिलांची फसवणूक केल्याचे पोलीस अन्वेषणात उघड  

तक्रारीविषयी पोलिसांनी जे अन्वेषण केले, त्याविषयी सरकारच्या बाजूने न्यायालयासमोर कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्यानुसार खरात याने वर्ष २००८ ते २०२२ या कालावधीत किमान ४ महिलांशी लग्न करून त्यांना फसवले. सरकारच्या वतीने मुले जन्माला आल्याविषयीचे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रविष्ट केले. त्यानुसार १५.४.२००९ या दिवशी त्याला एक मुलगी झाली. त्यात पित्याचे नाव खरात असून आईचे नाव वेगळे दाखवले आहे. त्यानंतर ३.५.२००९ या दिवशी त्याला दुसरी मुलगी झाली. त्यातही मुलीच्या नावामागे खरात याचे नाव होते; पण आईचे नाव वेगळेच होते. त्यानंतर लक्षात आले की, वर्ष २००८ मध्ये एका तिसर्‍याच महिलेने त्याच्या विरुद्ध घटस्फोट मिळावा, यासाठी तक्रार प्रविष्ट केली होती आणि त्यानुसार तिला घटस्फोट मिळाला होता.

४. शांतीलाल खरातचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला ! 

पोलिसांनी वर्ष २०१८ मधील एक पुरावा सादर केला. त्यात आणखी एका महिलेने त्याच्याविरुद्ध घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका केलेली आहे. याचा अर्थ त्याने पहिले लग्न केलेले असतांना पुन्हा ३ महिलांशी लग्न केले आणि त्याला अपत्येही आहेत. अशा प्रकारे त्याने सर्वांची फसवणूक केली. या सर्वांचा विचार करून उच्च न्यायालयाने खरात याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

५. समाजाला धर्मशिक्षण आणि साधना शिकवणे आवश्यक ! 

अशा पद्धतीने महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी खरात याला न्यायालय कठोर शिक्षा करीलच; पण ‘वधू-वर सूचक मंडळे’ किंवा अन्य सामाजिक माध्यमे यांच्या माध्यमातून महिलांची अन्य पुरुषांशी अल्पावधीत ओळख होते आणि ते लग्नही करतात. कित्येक प्रकरणांमध्ये केवळ पुरुषांचेच नाही, तर महिलांचेही विवाहबाह्य संबंध असल्याचे आढळून येते. काही महिला पुरुषांच्या भूलथापांना भुलून त्यांना लक्षवधी रुपये देऊ करतात. अशा प्रकारच्या अनेक घटना माध्यमांतून वाचायला मिळतात. अनेक होतकरू मुलांचे पालक गरीब असल्याने त्यांना शिक्षण मिळत नाही. अनेक वृद्ध महिला-पुरुष यांच्याकडे त्यांची मुले दुर्लक्ष करत असल्याने त्यांना वृद्धाश्रमात रहावे लागते. या सर्व गोष्टींच्या मागे धर्मशिक्षणाचा अभाव आणि साधना न करणे, हीच कारणे लक्षात येतात. साधना केल्यावर मनुष्याला कर्मफलन्याय सिद्धांत समजतो. पाप-पुण्याच्या कल्पना स्पष्ट झाल्याने तो चुकीच्या कृत्यापासून लांब रहातो आणि सत्शील आचरण करतो. त्यामुळे शालेय शिक्षणापासूनच मुलांना धर्मशिक्षण देणे नितांत आवश्यक आहे.’ (१९.२.२०२४)

श्रीकृष्णार्पणमस्तु।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय