सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पत्रकारांसमवेत ‘मुक्त संवाद’
वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहेत. सनातन संस्थेची २५ वर्षे, म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची २५ वर्षे आहेत. समाजाला आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणार्या सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात समाजाला आनंदी बनवण्याचे संस्थेने ठरवले आहे. उत्तरप्रदेश राज्यामध्ये ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म’ आदी विषयांवरील प्रवचने, कार्यशाळा, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग आदी माध्यमांतून संस्था समाजाभिमुख कार्य करणार आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त येथील जैयपुरा येथे पत्रकारांसाठी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. राजहंस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर याही उपस्थित होत्या.
या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा परिचय आणि सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश विस्ताराने सांगितला. त्यानंतर पत्रकारांनी संस्थेचे उपक्रम, उद्देश, विचार आदी विषयांवरील प्रश्नांचे शंकानिरसन करून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या सौ. सानिका सिंह यांनी केले.