इतरांचा विचार करणार्या आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सतत स्मरण करणार्या सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) !
‘२४.१२.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी देहत्याग केला. २१.३.२०२४ या दिवशी त्यांचे त्रैमासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांच्या मुलीला त्यांच्या रुग्णाईत स्थितीत जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. इतरांचा विचार करणे
‘पू. काळेआजींनी देहत्याग करण्यापूर्वी काही मासांपासून त्यांना विस्मरण, डोळ्यांनी अल्प दिसणे आणि अशक्तपणा असणे, असे शारीरिक त्रास होत होते, तरीही त्या नेहमी आनंदी आणि उत्साही असत. त्या मला सतत ‘मी काय साहाय्य करू ? तुला जेवायला वाढू का ? मला काहीतरी काम सांग’, असे सांगत असत. तेव्हा आम्ही त्यांना ‘तुम्ही काही करू नका. तुमच्यासाठी काय करू ?’, असे विचारल्यावर त्या ‘काहीच नको’, असे म्हणत. त्या काहीही खातांना किंवा कॉफी पितांना प्रत्येक वेळी ‘तुम्ही सगळ्यांनी घेतले का ? आधी तुम्ही घ्या. मग मी घेते’, असे म्हणून थांबून रहात असत. त्यांना ‘आम्ही घेतले’, असे सांगितल्यानंतर त्या अन्न ग्रहण करत असत.
२. प्रेमभाव
पू. आजींना कुणी भेटायला आल्यास पू. आजी त्यांना ‘आता इथेच रहा. रहायला या’, असे सांगत असत. पू. आजींना ‘सभोवती माणसे असावीत आणि त्यांचा पाहुणचार करावा’, असे नेहमी वाटत असे. त्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी खाऊ देत असत.
३. शांत, उत्साही आणि हसतमुख
पू. आजींना डोळ्यांनी नीट दिसत नव्हते. त्या कुणाला ओळखत नसत, तरीही त्या शांत होत्या. त्या सतत आनंदी आणि उत्साही असत.
४. स्वावलंबी आणि नीटनेटकेपणा
पू. आजींना एक वर्षापासून अल्प दिसत असतांनाही त्या हाताने चाचपून आणि काठीच्या साहाय्याने घरात न अडखळता फिरत असत. त्या त्यांच्या शेवटच्या आजारपणापर्यंत शौचालयात जाणे, वेणी घालणे, अंथरूण, पांघरूण यांच्या घड्या करणे इत्यादी नित्यकर्मे करत असत. त्यांचे कपडे नेहमी व्यवस्थित असत. त्या डोक्याला रुमाल बांधणे, न सांडता जेवणे, हात-पाय आणि तोंड व्यवस्थित धुणे, काठी, चप्पल जागेवर ठेवणे, अशा कृती अत्यंत नीटनेटकेपणाने करत. त्यांनी हे करण्यात कधीही कंटाळा केला नाही किंवा इतरांचे साहाय्य घेतले नाही.
५. पू. काळेआजींमध्ये जाणवलेले दैवी पालट
५ अ. स्नान न करताही चेहरा प्रसन्न आणि तेजस्वी दिसणे अन् देहाला मंद सुगंध येणे : त्या देहत्याग करण्याच्या ६ मास आधी प्रतिदिन स्नान करत असत. त्यानंतर त्यांना अतिशय थकवा असल्याने त्या आरंभी त्या एक-आड-एक दिवस स्नान करत. त्या देहत्याग करण्याच्या २ मास आधी आठवड्यातून २ दिवस स्नान करत, तरीही त्यांचा चेहरा प्रसन्न आणि तेजस्वी दिसत होता. त्यांच्या देहाला मंद सुगंध येत असे. तेव्हा ‘त्या अंतरंगी शुद्ध असल्यामुळे त्यांना बाह्य स्वच्छतेची आवश्यकता नव्हती’, असे मला वाटत होते.
५ आ. प्रतिदिन वास्तुदेवता आणि सर्व दिशा यांना दिवसातून अनेक वेळा नमस्कार अन् प्रार्थना करणे, स्तोत्र म्हणणे अन् त्यांना भक्तीगीत ऐकायला आवडणे : पू. आजी सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते…’ म्हणणे, तसेच वास्तुदेवता आणि सर्व दिशा यांना वेळोवेळी हात जोडून प्रार्थना करणे, नित्य नामजप करणे, संध्याकाळी श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणणे, असे नियमित करत असत. त्यांना अधूनमधून भजने म्हणायला आणि ऐकायला आवडत असे. मी काही वेळा भक्तीगीत गात असतांना त्या ‘छान वाटते. आणखी एखादे म्हण’, असे सांगत असत.
५ इ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण असणे : पू. आजींना शेवटच्या १५ दिवसांत खोकला झाला होता. आधुनिक वैद्यांनी पू. आजींना ‘दोन्ही हात वर करून मोठा श्वास घेणे आणि सोडणे’, असा व्यायाम करायला सांगितला होता. आम्ही पू. आजींना हात वर करून ‘प.पू. भक्तराज महाराजांचा विजय असो’, असा जयघोष करायला सांगितला की, त्या सहजतेने आणि आनंदाने जयघोष करत असत. एकदा मी सहजच पू. आजींना विचारले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची आठवण येते का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी त्यांना विसरू शकत नाही.’’
‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेने संतांच्या पोटी माझा जन्म झाला, मला त्यांचे सान्निध्य लाभले आणि त्यांची सेवा करण्याची अनमोल संधी लाभली’, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– आधुनिक वैद्या ज्योती काळे (पू. काळेआजींची मुलगी), सिंहगड रस्ता, पुणे. (२९.२.२०२४)
पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. पू. काळेआजी रुग्णालयात असतांना त्यांच्या देहातून चैतन्य प्रक्षेपित होत असणे : ‘पू. विजयालक्ष्मी काळेआजी रुग्णालयात अतीदक्षता विभागात असतांना मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा मला त्यांची कांती अतिशय तेजस्वी दिसत होती. त्यांच्या ‘अनाहतचक्रातून प्रकाशकिरण बाहेर पडत आहेत’, असे मला दिसत होते. पू. आजींना शारीरिक त्रास होत होते, तरीही त्यांच्या देहातून चैतन्य प्रक्षेपित होत होते.
२. पू. काळेआजींच्या पार्थिवाच्या ठिकाणी प्रकाशाचा गोळा दिसणे : पू. आजींनी देहत्याग केल्यानंतर आम्ही (मी आणि त्यांची मुलगी आधुनिक वैद्या ज्योती काळे) रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव घरी आणत असतांना त्यांच्या पार्थिवाला स्पर्श करून बसलो होतो. त्या वेळी मला पू. आजींच्या ठिकाणी एक मोठा प्रकाशाचा गोळा दिसत होता.
३. ‘पू. आजी गुरुचरणांशी विलीन झाल्या आहेत’, असे जाणवणे : पू. आजींच्या देहत्यागानंतर त्यांना पुष्पहार अर्पण करतांना मला त्यांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले. तेव्हा ‘प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) पू. आजींच्या हृदयमंदिरात विराजमान झाले आहेत’, असे मला दिसले. ‘पू. आजी गुरुचरणांशी विलीन झाल्या आहेत’, असे मला जाणवले.’
नम्र, प्रेमळ आणि भावपूर्ण नामजप करणार्या आधुनिक वैद्या ज्योती काळे !
१. नम्रता
‘पू. विजयालक्ष्मी काळेआजी रुग्णाईत असतांना त्यांची मुलगी आधुनिक वैद्या ज्योती काळे त्यांच्या समवेत होत्या. ज्योतीताई नवले रुग्णालयात एका विभागाच्या मुख्य पदावर कार्यरत आहेत. त्या रुग्णालयात वावरत असतांना त्यांच्यात कर्तेपणा जाणवला नाही. त्या अतिशय साधेपणाने आणि नम्रतेने अतीदक्षता विभागात वावरत होत्या.
२. प्रेमभाव
ज्योतीताईतील प्रेमभावामुळे त्यांनी रुग्णालयातील अन्य आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना जोडून ठेवले आहे. रुग्णालयातील सर्व जण पू. आजींची सेवा अतिशय मनापासून करत होते. ते सर्व जण ज्योतीताईंशी आपलेपणाने वागत होते.
३. पू. आजींनी देहत्याग केल्यानंतर ज्योतीताई स्थिर होत्या.
४. पू. आजींनी देहत्याग केल्यानंतर ज्योतीताई भावपूर्ण नामजप आणि प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करत होत्या. त्या अंत्यविधी करण्यासाठी लागणारी सिद्धता भावपूर्णपणे करत होत्या.’
– (पू.) सौ. मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४२ वर्षे), पुणे (२९.२.२०२४)
पू. (कै.) श्रीमती काळेआजी यांचे अंत्यदर्शन घेतांना साधकांना जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती
१. श्री. निखिल महाबळेश्वरकर, सिंहगड रस्ता, पुणे.
अ. ‘पू. काळेआजींचा चेहरा पुष्कळ शांत होता.
आ. मी इतरांच्या अंत्यविधीसाठी गेल्यावर मला डोकेदुखीचा त्रास होतो; मात्र पू. आजींचे अंत्यविधी होत असतांना मला कोणताही त्रास झाला नाही. मला दिवसभर शांत आणि स्थिर वाटत होते.
इ. पू. आजींच्या अंतिम संस्काराच्या संदर्भातील सेवा करतांना माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप होत होता. मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रयत्नपूर्वक करावा लागत होता.
ई. एखाद्या यज्ञस्थळी जसा ज्वालांचा गंध येतो, तसा गंध पू. आजींचे अंतिम संस्कार होत असतांना मला येत होता. पू. आजींच्या पार्थिवावर अग्निसंस्कार होत असतांना ‘ज्वाला पुष्कळ स्थिर आणि वरच्या दिशेने जात आहेत’, असे मला जाणवत होते.’
२. श्री. चंद्रहास म्हसकर, सिंहगड रस्ता, पुणे
अ. ‘पू. आजींचे अंतिम दर्शन घेतांना मला तेथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या चेहर्यावर पिवळा प्रकाश दिसला आणि ‘सर्वांचे चेहरे पुष्कळ गुळगुळीत झाले आहेत’, असे मला जाणवले.
आ. मला वातावरणात हलकेपणा जाणवला.
इ. ‘मी पृथ्वीवर नसून अन्य लोकात आहे’, असे मला वाटले.
ई. ‘पू. आजींनी आम्हाला आशीर्वाद देऊन चैतन्यात चिंब भिजवले आहे’, असे मला जाणवले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २९.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |