शारीरिक त्रासातही तळमळीने सेवा करणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. पूनम चौधरी (वय ३८ वर्षे) !
फाल्गुन शुक्ल द्वादशी (२१.३.२०२४) या दिवशी कु. पूनम चौधरी यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. पूनम चौधरी यांना ३८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. कु. मनीषा माहुर, मथुरा सेवाकेंद्र
१ अ. प्रेमभाव : ‘नवीन साधक सेवाकेंद्रात आल्यावर पूनमताई त्यांच्याशी प्रेमाने बोलते. ती त्या साधकांना साहाय्य करते आणि हवे-नको ते विचारते.
१ आ. कार्यपद्धतीचे पालन करणे : पूनमताई कार्यपद्धतीनुसार सेवा करते. एखाद्या साधकाकडून कार्यपद्धतीचे पालन केले जात नसल्यास ताई त्याला त्याची जाणीव करून देऊन त्याला साहाय्य करते आणि गुरुसेवा चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रयत्न करते.
१ इ. सेवा करण्याची तळमळ : ताईला शारीरिक त्रास अधिक प्रमाणात होतात, तरीही तिने दिवसभरात जेवढी सेवा करण्याचे ध्येय घेतलेले असते, ते ध्येय (सेवा) ताई पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तिला थोडेसे जरी बरे वाटले, तरीही ती लगेच सेवा करते.
१ ई. श्रद्धा आणि भाव : तिची गुरुदेवांवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) नितांत श्रद्धा आहे आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे. पूर्वी तिला साधना करण्यासाठी घरून विरोध होता, तरीही ती सेवाकेंद्रात रहात होती. तिच्यातील तळमळ, भाव आणि गुरुदेवांवरील अढळ श्रद्धा यांमुळेच आता तिच्या कुटुंबातील व्यक्ती तिला साधना करण्यास साहाय्य करतात. सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितलेली सेवा ताई तत्परतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.’
२. श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४४ वर्षे), मथुरा सेवाकेंद्र
२ अ. आनंदी : ‘पूनमताईला मागील एक ते दीड वर्षांपासून अनेक शारीरिक त्रास होत आहेत. तिला काही वेळा श्वास घ्यायलाही त्रास होतो. अशा स्थितीतही ती सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने स्थिर असते. तिच्या मुखावर नेहमी आनंद असतो.
२ आ. साधनेची तळमळ
१. पूनमताई एका अधिकोषात व्यवस्थापक या पदावर नोकरी करत होती. तिला ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ असल्याने ती नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करत आहे.
२. सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितल्यानुसार ती प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करते. ती दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मार्गदर्शक लेखातील सूत्रे आचरणात आणण्याचे प्रयत्न करते.
३. ताईला कशाचीही आसक्ती नाही. तिचा ‘मला केवळ कृष्ण आणि गुरुदेव हवेत’, असा भाव असतो.
२ इ. सेवाभाव
१. ताई सेवेचे पूर्वनियोजन करते. ती सेवेच्या संदर्भात परिपूर्ण चिंतन करते. ती नियोजनानुसार सेवा समयमर्यादेत पूर्ण करते.
२. ताईला एखाद्या सेवेचे दायित्व दिल्यास ती सेवा पूर्ण होईपर्यंत तळमळीने प्रयत्न करते. तिचा कधीही पाठपुरावा घ्यावा लागत नाही.
३. साधकांनी तिच्याकडे साहाय्य मागितल्यास ती स्वतःला होत असलेले शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास यांचा विचार न करता सेवा करण्यासाठी सिद्ध असते.
२ ई. समष्टी भाव : पूनमताईने प्रचारसेवा करतांना अनेक संतांची मने जिंकली. ती एखाद्या संतांकडे गेल्यास ते संत ‘‘तुम्ही आमच्याच आश्रमात रहा. आमच्या येथील सर्व कार्य सांभाळा’’, असे सांगतात.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १२.३.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |