सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री.विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास
२०.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘श्री. विश्वास लोटलीकर यांनी त्यांच्या साधनाप्रवासात अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा’ याविषयी पाहिले. आज उर्वरित भाग पाहू. (भाग ४)
भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा:https://sanatanprabhat.org/marathi/775518.html
एकदा आम्ही २ साधक प.पू. गुरुदेवांना भेटायला मुंबई सेवाकेंद्रात गेलो होतो. प.पू. गुरुदेवांनी आम्हाला बसायला सांगितले. आम्ही खाली बसल्यावर प.पू. गुरुदेवांनी आम्हाला आसंदीवर बसायला सांगितले. पुष्कळ वेळ सत्संग झाल्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘आता जेवून जायचे.’’ २ साधकांच्या समोर मध्ये बसून प.पू. गुरुदेव आम्हाला जेवायला वाढत होते. तेव्हा ‘साक्षात् भगवंत आपल्या भक्तांना अमृतमय घास देत आहे’, असे मला वाटत होते. तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर तरळतो. त्यानंतर आयुष्यात मला कधीच काही अल्प पडले नाही. गुरूंनी मला आयुष्यभर पुरण्यासाठी भगवंताचा अमृतमय प्रसाद दिला.
८ इ. प.पू. गुरुदेवांनी कुंभमेळ्याच्या दाटीमध्ये साधकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेणे : देवाने प्रत्येक सेवेतून आनंद अनुभवायला दिला. मी एकदा कुंभमेळ्यामध्ये पत्रकाराची सेवा करत होतो. तेव्हा कुंभमेळ्यामध्ये पुष्कळ दाटी होऊन चेंगराचेंगरी झाली. आम्ही २ साधक छायाचित्रे काढत असतांना एकदम आरडाओरडा चालू झाला आणि माणसे ओरडू लागली. महिला किंचाळू लागल्या. तो लोंढा आमच्या अंगावर येणार एवढ्यात आम्ही धावत मंदिराच्या पोवळीवर (देवळाच्या भोवतालच्या भिंतीवर) चढलो आणि छायाचित्रे काढली. आम्ही त्या दाटीमध्ये मिसळलो असतो, तर आम्हीही चेंगराचेंगरीमध्ये सापडलो असतो; परंतु ‘आपल्या साधकांची प.पू. गुरुदेव कशी काळजी घेतात’, ते अनुभवता आले.
८ ई. विज्ञापने आणण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
८ ई १. एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’साठी वृत्त देण्यास नकार देणे आणि त्यांना याचा जाब विचारल्यावर त्यांनी वृत्त देण्यास सांगणे : दैनिक ‘सनातन प्रभात’चालू झाल्यावर आपल्याला ‘वृत्त कुठे मिळतात आणि कशी मिळवायची ?’, हे ठाऊक नव्हते. तेव्हा ‘महानगरपालिका आणि पोलीस ठाणे येथे वृत्तांचा स्रोत असतो’, असे कळल्यावर मी एका पोलीस ठाण्यात तेथील पोलीस अधिकार्यांना भेटण्यासाठी गेलो. ‘मी ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर आहे’, असे सांगितल्यावर त्यांनी मला एकदम हलकेपणाची वागणूक दिली. त्यांनी मला ‘केबिन’मधून बाहेर बसा’, असे सांगितले. याचे मला वाईट वाटले आणि मी बाहेर येऊन थोडा वेळ बाजूला जाऊन थांबलो. तेवढ्यात अन्य एका वृत्तपत्राचा पत्रकार तेथे आलेला मी पाहिला. तो सरळ ‘केबिन’मध्ये जाऊन सिगारेट पित बसला. तेव्हा त्या पोलीस अधिकार्याने त्याच्यासाठी चहा मागवला आणि त्याला वृत्तही दिले. तो पत्रकार बाहेर गेल्यावर मी त्यांच्या ‘केबिन’मध्ये गेलो आणि त्यांना जाब विचारला, ‘‘साहेब, अयोग्य वागणार्या माणसांना आपण चांगली वागणूक देता आणि मला अयोग्य वागणूक देता, असे का ? तो पत्रकार आपल्या कार्यालयामध्ये आपल्यासमोर बसून सिगारेट पितो, तुम्ही त्याला चहा पाजता आणि वृत्तही देता. आम्हाला आपण वृत्त का देत नाही ?’’ त्यावर ते क्षणभर थांबले आणि म्हणाले, ‘‘ठीक आहे. तुम्हालाही देतो.’’ त्यांनी त्यांच्या माणसाला बोलावले आणि माझी ओळख करून दिली अन् ‘उद्यापासून यांना वृत्त देत चला’, असे सांगितले. त्यानंतर मला प्रतिदिन वृत्त मिळू लागले.
८ ई २. महाबळेश्वर येथे गेल्यावर ‘ड्रिमलँड हॉटेल’च्या मालकाने साधकांना भोजन देऊन विज्ञापनही देणे : एकदा आम्ही सर्व साधक विज्ञापने आणण्यासाठी मोहीम राबवत होतो. त्यासाठी आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. तिथे विज्ञापनाच्या सेवेसाठी आम्ही पुष्कळ फिरलो; परंतु विज्ञापन मिळाले नाही. महाबळेश्वरला ‘ड्रिमलँड हॉटेल’ आहे. ते आपल्याला नेहमी विज्ञापन देतात. त्यांच्याकडे गेलो असता मालक नव्हते. ‘मॅनेजर’ने सांगितले की, ‘थोड्या वेळाने मालक येतील. तेव्हा या.’
थोड्या वेळाने आम्ही परत ‘ड्रिमलँड हॉटेल’मध्ये गेलो. तेव्हा मालक आलेले होते. ते भेटले आणि आम्ही काही सांगण्यापूर्वीच ते म्हणाले, ‘‘मी तुमच्याशी नंतर बोलतो. प्रथम सर्वांनी जेवून घ्या.’’ आम्ही नको म्हणत असतांना त्यांनी आम्हाला जेवायला वाढायला सांगितले. त्यांनी सर्वांना भोजन दिले. ‘गुरुसेवा करतांना गुरु आपल्या साधकांना कसे भुकेलेले ठेवतील ? त्यांनाच आपली काळजी असते. देवा, साधकांची किती काळजी घेशील !’, असा विचार माझ्या मनात आला.
आमचे जेवण पूर्ण झाल्यावर मालक स्वतः आमच्याजवळ आले आणि त्यांनी आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे विज्ञापनही दिले. साधकांना या प्रसंगामुळे ‘प.पू. गुरुदेव आपल्या साधकांची किती काळजी घेतात !’, याची प्रचीती आली.
८ उ. ‘फिरता ग्रंथ वितरणकक्ष’ लावणे आणि पुष्कळ ग्रंथांचे वितरण होणे
१. गुढीपाडव्याला डोंबिवलीमध्ये सर्व संप्रदायांची ‘प्रभात फेरी’ निघते. त्या वेळी आम्ही ‘फिरता ग्रंथ वितरणकक्ष’ लावत होतो. त्या वेळी ग्रंथांचे वितरण चांगले व्हायचे आणि सर्वांना आनंदही मिळायचा.
२. एकदा गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा होता. तेव्हा डोंबिवली पश्चिमेकडून पूर्वेला जायचे होते. तेव्हा उत्तरदायी साधकांनी ग्रंथ वितरण कक्ष लावायला सांगितला. मी फिरते ग्रंथ प्रदर्शन लावल्यामुळे पालखीच्या समवेत पूर्वेच्या सभागृहापर्यंत जात असतांना ग्रंथ वितरण चांगले होत होते. नंतर सभागृहाबाहेर प्रदर्शन लावले. त्या वेळी सर्वच्या सर्व ग्रंथ संपले. पुन्हा मागवले, तेही सर्व ग्रंथ संपले. मी अत्यानंदात डुंबत होतो; कारण त्या दिवशी गुरूंच्या कार्याची महती समाजापर्यंत जात होती.
८ ऊ. नातवाला जन्माच्या वेळी पुष्कळ त्रास होऊनही गुरुदेवांच्या कृपेने तो वाचणे : ७.३.२०१४ या दिवशी माझ्या नातवाचा (उत्कर्ष अभिनय लोटलीकर (उच्च स्वर्गलोक, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के) जन्म झाला. त्या वेळी त्याला पुष्कळ त्रास झाला. तो बेशुद्धावस्थेत होता. त्याला ‘इन्क्यूबेटर’मध्ये (नवजात बालकाला सुरक्षित ठेवण्यासाठी उबदार वातावरणात असलेल्या काचेच्या पेटीत) ठेवले होते. ते पाहून आम्ही सर्व घाबरून गेलो. आम्ही प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करत होतो. प.पू. गुरुदेवांना दूरभाषवरून सर्व परिस्थिती सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘बाळ उच्च लोकांतील असल्याने त्याला २ दिवस त्रास होईल. घाबरू नका.’’ २ दिवसांनी बाळ शुद्धीवर आले. तेव्हा प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘त्याची २ दिवस लढाई चालू होती. शेवटी विजय आपलाच आहे.’’
आपले गुरु एवढे महान आहेत की, त्यांना साधकांना कोणताही त्रास झालेला आवडत नाही. गुरूंना साधक फार प्रिय आहेत. आपत्काळ चालू झाला आहे. त्याची झळ साधकांना होऊ नये; म्हणून ते सतत प्रयत्नरत असतात. त्यामुळेच साधकांना त्या त्रासाची तीव्रता जाणवत नाही. गुरूंनी सांगितलेली प्रत्येक कृती आपण व्यवस्थित करणे, हे गुरूंना अपेक्षित आहे; म्हणून साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून प.पू. गुरुदेवांनी सांगितलेली व्यष्टी अन् समष्टी साधना व्यवस्थित करावी, तसेच सर्व आध्यात्मिक उपाय पूर्ण करावेत.
आपली अनेक जन्मांची पुण्याई आहे; म्हणून आपण सनातन संस्थेमध्ये आलो आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आपल्या आयुष्यात आपल्या कल्याणासाठी आले आहेत.
गुरु माझी माय, गुरु माझा पिता ।
गुरु माझा सखा, गुरु पाठीराखा ।।
‘परात्पर गुरु डॉक्टर, या लेकराला जन्मोजन्मी आपल्या चरणांचा दास रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’(समाप्त)
– श्री. विश्वास लोटलीकर, म्हार्दाेळ, फोंडा, गोवा. (२६.४.२०२३)