मेफेड्रोन तस्करीच्या प्रकरणात गुन्हे शाखेकडून पुणे आणि देहली येथे धाडी !
पुणे – मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पसार झालेला आरोपी महंमद उपाख्य पप्पू कुरेशी याला कर्नाटकातील यादगीर भागातून नुकतीच अटक करण्यात आली. कुरेशी याने साथीदार हैदर शेख, अशोक मंडल, संदीप धुनिया आणि शोएब शेख यांच्याशी संगमनत करून पुणे आणि देहली येथील गोदामात मेफेड्रोन ठेवले होते. याविषयीची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने देहली आणि पुणे परिसरांतील गोदामांत धाडी टाकून १६ लाख ४३ सहस्र रुपये किमतीचे ८२ ग्रॅम १५० मिलिग्रॅम मेफेड्रोन (एम्.डी.) जप्त केले.
कुरेशी याच्या पोलीस कोठडीची मुदत १९ मार्चला संपली. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. ‘कुरेशी याने अमली पदार्थांचा साठा अन्य ठिकाणी ठेवला का ?’, ‘कुरेशी सराईत गुन्हेगार असून, त्याचे अमली पदार्थ विक्री करणार्या तस्करांशी संबंध आहेत का ?’, ‘कुरेशी पसार झाल्यानंतर तो कुणाकडे वास्तव्यास होता ?’, ‘या काळात त्याने कुणाला अमली पदार्थांची विक्री केली का ?’, यादृष्टीने अन्वेषण करायचे आहे. कुरेशी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात मेफेड्रोन बनवण्यासाठी कच्चा माल पुरवत होता. त्याच्याकडे सांगली आणि देहली येथे मेफेड्रोन वितरित करण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते, असे सरकारी अधिवक्त्या नीलिमा इथापे-यादव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अन्वेषणासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती त्यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांनी कुरेशीच्या पोलीस कोठडीत ६ दिवसांनी वाढ केली आहे.