Omar Abdullah Maharashtra Bhavan : (म्हणे) ‘आमची सत्ता आल्यावर जम्मू-काश्मीरमधील महाराष्ट्र भवन बंद करू !’ – ओमर अब्दुल्ला
ओमर अब्दुल्ला यांची धमकी !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील बडगाम येथे अडीच एकर भूमीवर ‘महाराष्ट्र भवन’ बांधण्याला संमती देण्यात आली आहे. श्रीनगर विमानतळाच्या जवळ ही जागा आहे. येथे राज्याचे भवन बांधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असणार आहेत. महाराष्ट्र भवनाला जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी विरोध केला आहे. ‘येत्या ऑक्टोबर महिन्यात आमचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर हे भवन बंद करू’ अशी धमकी त्यांनी दिली आहे. ‘महाराष्ट्र भवनामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जाईल’, असा दावा त्यांनी केला आहे. कुलगाम येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
JKNC VP @OmarAbdullah on the construction of Maharashtra Bhavan in Kashmir-pic.twitter.com/7rcd8rCV1E
— JKNC (@JKNC_) March 18, 2024
ओमर अब्दुला म्हणाले की, महाराष्ट्र भवनाचा वापर पर्यटकांसाठी केला जाणार आहे. हे ते पर्यटक असतील जे सध्या राज्यातील हॉटेल्समध्ये रहातात. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांची उपजीविका याद्वारे हिरावून घेतली जाईल.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू-काश्मीरला भेट दिल्यानंतर याठिकाणी भूमी खरेदी आणि पर्यटकांसाठी सुविधा देण्याची प्रक्रिया चालू झाली. ओमर अब्दुल्ला यांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जे भक्त अमरनाथ यात्रेला जातात त्या यात्रेकरूंसाठी मी स्वत: जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांकडे महाराष्ट्र भवन उभारण्याची विनंती केली. त्यांनी ही मागणी मान्य केली. ओमर अब्दुल्ला म्हणतात, ‘मी महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही.’ हा द्वेष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मान्य आहे का ? जे लोक ‘महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही’ असे बोलतात त्यांच्या मांडीला मांडी लावून हा गट बसतो, हे किती लांच्छनास्पद आहे. दुर्दैवी आहे.
संपादकीय भूमिका
|