Allahabad HC On Temple : मंदिरांना त्यांची थकबाकी मिळण्यासाठी न्यायालयात जावे लागते, हे खेदजनक ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
वाराणसी – उत्तरप्रदेशातील मंदिरे आणि ट्रस्ट यांना त्यांची थकबाकी मिळण्यासाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडले जात आहे, हे ऐकून दु:ख झाले, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने ‘ठाकूर रंगजी महाराज विराजमान मंदिरा’च्या वतीने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी ही खंत व्यक्त केली. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी याविषयीचे निरीक्षण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवले आहे.
उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश महसूल मंडळाच्या सचिवांना गेल्या ४ वर्षांपासून वृंदावनमधील किमान ९ मंदिरांच्या वार्षिक थकबाकीविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावले आहे. मंदिरांचा निधी राज्याच्या तिजोरीतून मंदिराच्या खात्यात आपोआप जमा व्हायला हवा होता. याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, ९ मंदिरांना ९ लाख १२ सहस्र ५०७ रुपयांची वार्षिक रक्कम देण्यात आली नाही. खंडपिठाने सांगितले की, गेल्या ४ वर्षांपासून मंदिरांना वार्षिक भरपाई हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आवश्यक कारवाईसाठी हे प्रकरण राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवले आहे.