स्त्रीचे सौंदर्य !
‘स्त्री आणि सौंदर्य’, हे जवळचे नाते आहे. प्रत्येक स्त्रीलाही वाटते आपण सुंदर असावे. बहुतांश वेळा या सौंदर्यामध्ये बाह्य सौंदर्याचाच विचार केला जातो. त्यामुळे ‘बर्याच स्त्रियांना शारीरिक सौंदर्याचा न्यूनगंड असतो’, असे खासदार सौ. सुधा मूर्ती यांच्या लक्षात आले. त्यासाठी सौ. सुधा मूर्ती यांनी ‘स्त्रियांचा सौंदर्याविषयी दृष्टीकोन कसा असायला हवा ?’, याविषयी अमूल्य संदेश दिला आहे. अप्रत्यक्षरित्या त्यांनी सौंदर्याच्या दृष्टीने स्त्रिया विचार करण्यात कुठे चुकतात ? आणि त्यांनी कसे विचार करायला हवेत ? हेच सांगितलेले आहे. यातून ‘सौंदर्य हे व्यक्तीच्या विचारांमध्ये आहे’, हेच सौ. सुधा मूर्ती यांनी अधोरेखित केले आहे.
सौ. सुधा मूर्ती म्हणतात, ‘‘पुरुषी नजरेतून स्वतःचे सौंदर्य तोलणे, म्हणजे स्वतःमधील स्त्रीत्वाचे अधःपतन करवून घेणे आहे. सौंदर्य कपड्यात नाही, तर कार्यात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, तर विचारांमध्ये आहे. सौंदर्य भपक्यात नाही, तर साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशातच नाही, तर मनात आहे ! सकाळी उठून सडासंमार्जन झाल्यावर स्वतःच्या हाताने काढलेली रेशीम-रेषांची रेखीव रांगोळी पाहिली, तर तुम्हाला तुमच्या बोटातील सुंदरता दिसेल. स्वच्छ-सुंदर आवरलेले, स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचे सौंदर्य सांगेल. आपण करत असलेले प्रत्येक काम, म्हणजे सौंदर्याचेच सादरीकरण असते. आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे. ‘आपण जशा जन्माला आलो आहोत, तशा सुंदरच आहोत’, ही खूणगाठ मनाशी बांधून टाकली की, सौंदर्यासाठी दुसर्या कुणाच्या पावतीची आवश्यकता पडत नाही आणि अवघे विश्व सुंदर भासते.’’ याप्रमाणे अनेक विचार त्यांनी मांडले आहेत.
त्यांचे हे विचार वाचल्यानंतर स्त्रियांना त्यांचे सौंदर्याविषयीचे विचार ‘योग्य’ करण्यास साहाय्य होईल. आजकाल अनेक महिला ‘आपण शारीरिकदृष्ट्या सुंदर दिसावे’, यासाठी पुष्कळ प्रयत्न करतात. प्रसंगी वेळ आणि पैसाही खर्च करतात. आजकाल तर पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्याने भारतीय स्त्रीची वेशभूषाही पालटत चाललेली आहे. यातून स्त्रीचे खरे सौंदर्यच लुप्त होत चाललेले आहे, तसेच त्याचा पुरुषांवर होणारा दुष्परिणाम स्त्रियांनाच भोगावा लागत आहे. त्यामुळे बलात्कार, लैंगिक अत्याचार, असुरक्षितता याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
‘सौंदर्य हे केवळ नाशवंत शरिरात नसून प्रत्येकाच्या मनामध्ये आणि संस्कारांमध्ये आहे’, हेच सौ. सुधा मूर्ती यांनी सांगितलेले आहे. त्यांनी केवळ सांगितलेले नाही, तर त्या स्वतःही तसेच आचरण करतात. प्रत्येक स्त्रीने सौ. सुधा मूर्ती यांच्या सौंदर्याच्या विचारांचा आदर्श घेऊन स्वतःतील सौंदर्य खुलवावे एवढेच !
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, देवद, पनवेल.
महिलांनी पुरुषी नजरेतून स्वतःचे सौंदर्य खुलवण्यापेक्षा विचारांमधून आणि कृतीतून खरे सौंदर्य निर्माण करायला हवे ! |