ज्ञानियांचा सहजभाव
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
‘श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘जो कर्मफलाचा आसरा न घेता कर्म करतो तो खरा योगी ! करणीय कर्म करणार्यापेक्षा महान, श्रेष्ठ कुणीही नाही. तोच संन्यासी, तोच योगी. केवळ निरग्नी वा अक्रिय हा संन्यासी वा योगी नाही. वरील व्याख्येप्रमाणे जीवन व्यतित केलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !
ज्ञानियांची क्रिया कशी सहज घडते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे होते. एके दिवशी ते जेवायला बसले. त्या दिवशी पत्नी राधाबाई जेवणात मीठ टाकायलाच विसरल्या होत्या. तरीही शास्त्रीबुवा नेहमीसारखेच जेवले. त्यांच्या जेवणाच्या नंतर राधाबाई जेवायला बसल्या. त्यांच्या लक्षात आले की, भाज्या आणि वरण अळणी होते. त्यात मीठ अजिबात नव्हते. राधाबाईंनी बाळशास्त्रींना विचारले, ‘‘मीठ का नाही आपण विचारले ?’’ ते उद्गारले, ‘‘मला कळलेच नाही ! असा हा ज्ञानियांचा सहजभाव !’’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०१८)
अवताराचे महत्त्व
‘मानवाचा देव करायचा, देवत्वापर्यंत विकास करायचा; म्हणून तर अवतार आहे. अवतार माणसाचा असला की, माणसे ते जीवन पहातात आणि मग ते वळण गिरवण्याचा प्रयत्न करतात. धैर्याने स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन विकास घडवतात.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२३)