ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमात तब्बल २८ वर्षांनी पालट !
पुणे – राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या अभ्यासक्रमात तब्बल २८ वर्षांनी पालट केला आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात नवीन कार्यपद्धतीही लागू केली असून त्याची कार्यवाही वर्ष २०२५ पासून करण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. ग्रंथालय संचालनायलयाच्या वतीने ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा मान्यताप्राप्त विभागीय जिल्हा ग्रंथालयांच्या वतीने घेतली जाते. ग्रंथालय संचालकांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यांची नियुक्ती केली होती. या समितीने सादर केलेल्या सूचना स्वीकारून परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेची कार्यपद्धत पालटण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुधारित अभ्यासक्रम आणि सुधारित कार्यपद्धती वर्ष २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. नव्या अभ्यासक्रमात ग्रंथालय आणि समाज, ग्रंथालय व्यवस्थापन, वर्गीकरण आणि तालिकीकरण, माहिती साधने आणि सेवा, ग्रंथालय तंत्रज्ञान, कार्यानुभव आणि प्रकल्प या घटकांचा अंतर्भाव आहे. नवीन कार्यपद्धती अन्वये परीक्षेचा कालावधी २१ ते ३० जून केला असून अनुत्तीर्ण उमेदवारांना ३ संधी दिल्या जाणार आहेत.