एम्.ए.च्या प्रथम वर्षाच्या शिक्षणशास्त्र विषयातील एका पेपरचा निकाल १ वर्षानंतरही नाही !
मुंबई विद्यापिठाच्या ऑनलाईन शिक्षण केंद्राचा भोंगळ कारभार !
मुंबई – मुंबई विद्यापिठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राने म्हणजेच ‘सीडीओई’ने तब्बल एक वर्षाचा कालावधी लोटूनही ‘एम्.ए.च्या (कला शाखेची पदव्युत्तर पदवी) शिक्षणशास्त्र’च्या काही विद्यार्थ्यांचा प्रथम सत्र परीक्षेचा निकाल घोषित केलेला नाही. गतवर्षी ‘शिक्षणशास्त्र’ या विषयातील ‘ॲडव्हान्स फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन’ या विषयाची प्रश्नपत्रिका ७५ ऐवजी ६० गुणांची विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देण्यात आली होती. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांच्या तात्काळ लक्षातही आणून दिली होती; परंतु विद्यापिठाकडून ६० गुणांचीच प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेनुसार परीक्षा द्यावी लागली होती. अनेक दिवस निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांनी ‘सीडीओई’चे तत्कालीन संचालक आणि अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला, तसेच कलिना संकुलातील परीक्षा भवनातही संपर्क साधला.
मुंबई विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे व्यवस्थापन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विद्यापीठ प्रशासन कुठलेही पूर्वनियोजन करत नाही. आम्ही नोकरी सांभाळून शिक्षण घेत आहोत; परंतु ऐन वेळी वेळापत्रक सांगणे, प्रश्नपत्रिकेतील त्रुटी, निकालास विलंब आणि निकालांतील त्रुटी यांमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
संपादकीय भूमिका :शिक्षण विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना काढेल का ? |