शहराबाहेर ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’चे डेपो उभारणीच्या प्रस्तावांवर कोणताही निर्णय नाही !
|
पुणे – ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’चे (पी.एम्.पी.एम्.एल्.चे) सर्वाधिक प्रवासी हे उपनगर आणि शहराच्या हद्दीबाहेरून येतात. या सर्वांचा विचार करता पी.एम्.पी.एम्.एल्.चे शहराच्या हद्दीबाहेर ‘बस डेपो’ (गाड्यांचे मोठे बसस्थानक) उभारणी करण्याचा विचार करत असून त्याकरता जागांची आवश्यकता आहे. त्याकरता पी.एम्.पी.एम्.एल्.ने ‘पुणे महानगर विकास प्राधिकरणा’कडे (पी.एम्.आर्.डी.ए.कडे) यापूर्वीच ९ जागांची मागणी करण्याचे प्रस्ताव दिले आहेत; मात्र त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने हे प्रस्ताव तसेच पडून आहेत. (निर्णय घेण्यास विलंब का होत आहे ? याचे कारण जनतेला कळले पाहिजे ! – संपादक)
सध्या शहरांमध्ये पी.एम्.पी.एम्.एल्.चे १५ डेपो असून काही नव्या डेपोंची आवश्यकता आहे. या बससेवेचा लाभ घेणारे बहुतांश प्रवासी शहराच्या हद्दीबाहेरचे आहेत. हे डेपो शहरांमध्ये असल्याने सकाळी प्रवाशांना आणण्यासाठी बस रिकाम्या जातात, तसेच रात्री प्रवाशांना सोडल्यानंतर येतांना बस रिकामी येते. त्यामुळे पी.एम्.पी.एम्.एल्.ची आर्थिक हानी होत आहे. नवीन बस डेपो हे शहरांबाहेर उभारले असता रिकामी बस चालवण्याचा प्रश्न संपून जाईल. हे डेपो उभारणीकरता ९ ठिकाणी किमान ५ एकरची जागा, असावी जेणेकरून त्या ठिकाणी डेपो उभारणे शक्य होईल अशी पी.एम्.पी.एम्.एल्.ची मागणी आहे. (समयमर्यादेत निर्णय न घेणार्या संबंधित अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे जनतेच्या मनात आले तर काय चुकीचे आहे ! – संपादक)