दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राज ठाकरे यांनी घेतली अमित शहा यांची भेट !; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या खासदारांसमवेत बैठक !…
राज ठाकरे यांनी घेतली अमित शहा यांची भेट !
मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्च या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची देहली येथे भेट घेतली. त्यांच्यासमवेत पुत्र अमित ठाकरे हेही होते. अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती राज ठाकरे यांनी छायाचित्रासह ट्वीट केली आहे. या भेटीत नेमके काय बोलणे झाले याची माहिती राज ठाकरे किंवा भाजप यांच्याकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. साहजिकच ही भेट लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर असणार; मात्र राज ठाकरे महायुतीमध्ये जाणार कि बाहेरून पाठिंबा देणार याविषयीची माहिती पुढे आलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या खासदारांसमवेत बैठक !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ मार्च या दिवशी वर्षा बंगल्यावर लोकसभेच्या जागावाटपाविषयी शिवसेनेच्या सर्व खासदारांसमवेत बैठक घेतली. बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे भूमिका स्पष्ट केली.
या वेळी राहुल शेवाळे यांनी म्हटले की, शिवसेनेच्या सर्व खासदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. प्रसारमाध्यमातून महायुतीविषयी वेगळे वातावरण निर्माण होत आहे. असे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना देण्यात याव्यात. महायुतीचे जागावाटप घोषित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही नेत्याने जागावाटपाविषयी वक्तव्य करू नये.