इतरांना साहाय्य करणारे आणि धर्माभिमान्यांशी जवळीक साधणारे देहली सेवाकेंद्रातील श्री. कार्तिक साळुंके (वय ३९ वर्षे) !

‘फाल्गुन शुक्ल एकादशी (२०.३.२०२४) या दिवशी श्री. कार्तिक साळुंके यांचा ३९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. कार्तिक साळुंके

श्री. कार्तिक साळुंके यांना ३९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. शिकण्याची वृत्ती

‘श्री. कार्तिकदादा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या समवेत अध्यात्मप्रचाराची सेवा करतात. दादा सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितलेली सूत्रे कृतीत आणतात. एकदा मी दादांच्या समवेत राजस्थान येथे सेवेनिमित्त गेले होते. दादांनी तेथील धर्माभिमान्यांशी प्रथम भेटीतच जवळीक साधली.

२. प्रांजळपणा

एकदा आम्ही चारचाकी गाडीने प्रवास करत होतो. दादा गाडी चालवत होते. तेव्हा पुष्कळ पाऊस पडत होता. मार्गातील खड्ड्यांत पाणी साचले होते. त्या वेळी दादांनी सद्गुरु पिंगळेकाकांना सांगितले, ‘‘मला झोप येत आहे. तुम्ही आम्हाला साधनेविषयी सांगता का ?’’

३. दादांचे मन निर्मळ आहे. त्यांच्या मनात कुणाविषयी राग किंवा द्वेष नाही.

४. साधिकेच्या कुटुंबियांना आधार देणे

सुश्री कु. पूनम चौधरी

माझे आई-बाबा राजस्थान येथे रहातात. दादा माझ्या आई-बाबांना भेटायला गेल्यावर त्यांना स्वतःचा मुलगा घरी आल्याप्रमाणे वाटते. आमच्या घरी येणार्‍या पंडितांना दादांविषयी आदर आहे. काही दिवसांपूर्वी माझी प्रकृती ठीक नव्हती. तेव्हा आई-बाबांना माझी काळजी वाटत होती. त्या वेळी दादांनी माझ्या आई-बाबांना भेटून माझ्या प्रकृतीविषयी सांगितले. तेव्हा आई-बाबांना दादांचा आधार वाटला. माझी बहीणही दादांशी मोकळेपणाने बोलते आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेते.

५. दादांकडून चूक झाल्यास ते चूक स्वीकारून क्षमायाचना करतात.

६. जिज्ञासूंना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे

जिज्ञासू कार्तिकदादांना विचारतात, ‘‘तुम्ही इतक्या अल्प वयात साधनेला आरंभ कसा केला ?’ त्या वेळी दादा जिज्ञासूंना साधनेमुळे स्वतःला आलेल्या अनुभूती आणि अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी कृतज्ञताभावाने सांगतात. त्यामुळे जिज्ञासूंना साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

७. धर्माभिमान्यांशी जवळीक साधणे

दादा अध्यात्मप्रचार करण्यासाठी हरियाणा येथे जातात. तेथील एका धर्माभिमानी महिलेच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कार्तिकदादा आणि श्री. नरेंद्र सुर्वे त्या महिलेला भेटल्यावर तिला दादांचा आधार वाटला. ती महिला दादांना राखीपौर्णिमेच्या दिवशी घरी बोलावते.

‘गुरुदेवांच्या कृपेने अनेक दैवी गुण असलेल्या कार्तिकदादांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या श्री चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) पूनम चौधरी, देहली (२९.२.२०२४)