आळंदी (जिल्हा पुणे) येथे ‘श्री वारकरी आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने पार पडलेले ‘अग्नी आणि विद्ध कर्म चिकित्सा २०२४’ !
‘अग्नीकर्म’ म्हणजे अग्नीकर्म या चिकित्सेत सोन्याच्या काडीने विशिष्ट जागेवर त्वचेला जखम न करता शेक दिला जातो. ही ३ सहस्र वर्षांपूर्वीची शास्त्रीय आयुर्वेद पद्धत आहे. ही पद्धत सर्व प्रकारचे वाताचे आजार, नस दबणे, वेदना, संधी विकार, मणक्याचे विकार यांवर उपयोगी आहे.
‘विद्धकर्म’ म्हणजे रक्तप्रवाह सुरळीत करण्याची आयुर्वेदाची चिकित्सा ! शरिराच्या विशिष्ट जागी सुई टोचून रक्तप्रवाह सुरळीत केला जातो आणि आजार बरा केला जातो.
आळंदी (जिल्हा पुणे) येथे नुकतेच आयुर्वेदाचे ‘अग्नीकर्म’ आणि ‘विद्धकर्म’ म्हणजे काय ? या विषयावर २ दिवसांचे संमेलन झाले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला या संमेलनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या संमेलनातून आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ‘अग्नीकर्म’ आणि ‘विद्धकर्म’ या चिकित्सेविषयीची माहिती तर मिळालीच, त्यासह साधनेच्या अनुषंगानेही अनेक सूत्रे संबंधित वैद्यांकडून शिकायला मिळाली. गुरुदेवांच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे त्यांच्या चरणी कृतज्ञतेच्या भावाने अर्पण करते. आयोजकांच्या सर्व कृतींमधून त्यांनी हे संमेलन आध्यात्मिक स्तरावर करण्याचा प्रयत्न केला होता, हा भाग प्रकर्षाने जाणवत होता. त्यामुळे त्या सर्व वैद्यांच्या चरणीही कृतज्ञता ! पुणे येथील वैद्य रामचंद्र बल्लाळ गोगटे यांचा ४ फेब्रुवारी या दिवशी स्मृतीदिन असतो. वैद्य रा.ब. गोगटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हे संमेलन आळंदी येथे आयोजित केले होते. वैद्य रा.ब. गोगटे यांनी ‘विद्धकर्म’ आणि ‘अग्नीकर्म’ यांविषयी अतुलनीय कार्य केले आहे. ‘आयुर्वेदातील ही संजीवनी चिकित्सापद्धत अनेक रुग्ण आणि वैद्य यांच्यापर्यंत पोचावी’, या उदात्त हेतूने वैद्य रा.ब. गोगटे हे वयाच्या ९० वर्षांपर्यंत अविरतपणे कार्यरत राहिले. त्यांनी याचे ज्ञान शेकडो वैद्यांना दिले. त्यापैकी त्यांचे एक शिष्य वैद्य चंद्रकुमार देशमुख यांनी वैद्य रा.ब. गोगटे यांची ‘विद्धकर्म’ आणि ‘अग्नीकर्म’ या चिकित्सापद्धतीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. ते आजही अनेक वैद्य शिष्य सिद्ध करत आहेत. |
१. संमेलनासाठी आळंदी क्षेत्र निवडण्याचे कारण
आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. आयुर्वेदाची रचना विष्णूचा अवतार भगवान धन्वन्तरि यांनी केली आहे. ‘आयुर्वेदाचा प्रारंभ ब्रह्मदेवापासून झाला’, असे मानतात. अशा या ‘आयुर्वेदातील सूत्रांचा अभ्यासही आध्यात्मिकदृष्ट्या सात्त्विक स्थळी झाल्यास त्याचा लाभ सर्वांनाच होईल’, या उद्देशाने आयोजकांनी या संमेलनासाठी आळंदी हे ठिकाण निवडले होते. आळंदी हे ठिकाण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधीचे क्षेत्र आहे, येथे सात्त्विक इंद्रायणी नदी असून अनेक ऋषीतुल्य व्यक्तींनी अनेक वर्षे साधना केलेली आहे. हे श्री सिद्धेश्वरदेवाचे स्थान आहे. पंचभौतिक चिकित्सेचे जनक वैद्य दातार शास्त्री यांनीही आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थानी दीड वर्ष राहून ‘ज्ञानेश्वरी’ची पारायणे केली आणि त्यानंतर त्यांनी पंचभौतिक चिकित्सापद्धतीचे लिखाण केले. सध्याचे ‘धन्वन्तरि पुरस्कार’कर्ते वैद्य समीर जमदग्नी हेही माऊलींचे भक्त आहेत.
अशा प्रकारे आळंदीला आध्यात्मिक परंपरा आहे. आयोजकांचा संमेलनाचे स्थान निश्चित करतांना असलेला आध्यात्मिक दृष्टीकोन शिकायला मिळाला. प्रत्यक्षात आळंदी येथे उच्च दर्जाच्या निवासाच्या दृष्टीने आणि संमेलन आयोजित करण्याच्या दृष्टीने शहराप्रमाणे सुविधा नाहीत. असे असतांनाही याचा विचार न करता आयोजकांचा हा उद्देश उद्दात्त होता. यातून बाह्य गोष्टींना महत्त्व न देता ‘ज्ञानार्जनासाठी जे योग्य आहे’, असा विचार होता. आयोजनातील वैद्य वारकरी संप्रदायानुसार साधना करतात. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी वारकरी संप्रदायाची शिकवण कृतीतून दाखवली.
२. संमेलनाचा उद्देश
मागील २ वर्षांपासून ‘आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट’ हे ‘अग्नीकर्म’ आणि ‘विद्धकर्म’ या विषयावर ऑनलाईन संमेलनांचे विनामूल्य आयोजन करत होते. मूल्य नसल्यामुळे जोडलेले सर्वजण विषय गांभीर्याने समजून घेतात कि नाही ? हे कळत नसल्यामुळे या वर्षी प्रथमच ‘ऑफलाईन’ (प्रत्यक्ष) संमेलनाचे आयोजन केले. आयुर्वेदातील ‘अग्नीकर्म’ आणि ‘विद्धकर्म’ या उपचारपद्धतींची विस्तृत माहिती वैद्यांना व्हावी अन् त्यांनी त्याचा रुग्णांच्या उपचारांमध्ये वापर करावा, हा उद्देश होता.
३. संमेलनाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
अ. संमेलनाचा प्रारंभ धन्वन्तरि स्तवनाने झाला.
आ. त्यानंतर कार्यक्रमात आळंदी दर्शनाची ध्वनीचित्रफीत दुपारचे सत्र चालू होण्यापूर्वी दाखवली जात होती.
इ. वैद्यांचा सत्कार गांधी टोपी, उपरणे, नारळ, हार आणि भेटवस्तू देऊन केला जात होता.
ई. सर्व वैद्य विषयाच्या अंती तो विषय गुरूंच्या चरणी अर्पण करत होते.
उ. प्रसाद आणि महाप्रसादातील सर्व पदार्थ सात्त्विक होते. आहाराची व्यवस्था भारतीय बैठकीप्रमाणे केली होती. ज्यांना शारीरिक आजार आहेत, त्यांच्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे बहुतांश सर्वजण भारतीय बैठकीनुसार बसूनच महाप्रसाद ग्रहण करत होते.
ऊ. संमेलनामध्ये उपस्थित असणार्या वैद्यांना आयोजनातील वैद्यही महाप्रसाद वाढत होते. त्यांना ही कृती करतांना कुठेही कमीपणा वाटत नव्हता.
ए. महाप्रसादाचा प्रारंभ सामूहिकरित्या श्लोक म्हणून केला जात असे.
४. आयोजनातील वैद्य
‘श्री आयुर्वेद वारकरी चिकित्सालया’चे संस्थापक अध्यक्ष वैद्य योगेश मारलापल्ले, वैद्य गणेश घ्यार, वैद्य विष्णु कार्हाळे, वैद्य प्रवीण वाकडे, वैद्य सौरभ टेकले आणि अन्य वैद्य यांनी संमेलनाच्या आयोजनात सहभाग घेतला.
४ अ. साधेपणा असलेले वारकरी संप्रदायाशी जोडलेले वैद्य योगेश मारलापल्ले ! : या संमेलनाचे आयोजन ‘श्री आयुर्वेद वारकरी चिकित्सालया’चे संस्थापक अध्यक्ष वैद्य योगेश मारलापल्ले यांच्या समवेत अन्य वैद्यांनी केले होते. त्यांच्या वर्तनातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
१. वैद्य योगेश मारलापल्ले यांनी स्वतःची वेशभूषा वारकरी संप्रदायाप्रमाणे केली होती. त्यांना या वेशभूषेविषयी काही जणांनी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘या वेशभूषेमध्ये वाईट काय आहे ? ही वेशभूषा वारकरी संप्रदायाची आहे. वेशभूषेला पाहून समोर आलेल्यांचे हात जोडले जातात. आपल्याला अजून काय हवे ?’’
२. ‘विद्धकर्म चिकित्सेचे रहस्य’ हा विषय मांडतांना त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या सांगून विषय आध्यात्मिक स्तरावर मांडला.
३. ‘विद्धकर्म करतांना विश्वास आणि सातत्य आवश्यक आहे. आपण जोपर्यंत अनुभव घेत नाही, तोपर्यंत आपला शास्त्रावर विश्वास बसणार नाही’, हे सांगतांना त्यांनी वैद्य चंद्रकुमार देशमुख यांचे उदाहरण सांगितले. वैद्य चंद्रकुमार देशमुख एका रुग्णावर विद्धकर्म करत असतांना आठवड्यातून ३ वेळा असे काही आठवडे विद्धकर्म केल्यानंतर त्या रुग्णाला अपेक्षित फरक न पडल्याने तो घाई करत होता. त्या वेळी वैद्य देशमुख यांनी ‘मला अजून १५ दिवस द्या आणि नंतर बघा’, असे आत्मविश्वासपूर्वक सांगितले. परिणामी खरोखरच १५ दिवसांनी त्या रुग्णाला पुष्कळ फरक पडला. रग्ण घाई करतो म्हणून वैद्य देशमुख यांनी उपचारपद्धतीमध्ये पालट केला नाही. या प्रसंगातून त्या वेळी वैद्य चंद्रकुमार देशमुख यांचा विद्धकर्मावरील विश्वास शिकायला मिळाला.
४. शास्त्रावर आपली श्रद्धा असेल, तरच शास्त्राची आपल्यावर कृपा होणार. आयुर्वेद हे सोने आहे. त्याचा वापर करायला हवा.
५. ‘अहंकाररहित स्थिती असेल, तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होते’, हे सांगतांना त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवींचा संदर्भ दिला.
६. ‘वैद्य आणि रुग्ण यांच्यामध्ये उपचारासाठीचे सातत्य हवे’, हे सूत्र सांगतांना त्यांनी दोघांची आताची स्थिती सांगितली. त्यावर वैद्यांनी आळस सोडून आयुर्वेदाचे ज्ञान घेऊन त्याचा प्रसार करणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी सांगितले.
४ आ. विषय मांडतांना वैद्यांची असणारी अहंशून्यता ! : अनेक वैद्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. बहुतांश वैद्य हे तरुण होते. काहींनी ‘विद्धकर्म’ आणि ‘अग्नीकर्म’ यांचा वापर केल्यानंतर रुग्णांना कसा लाभ झाला, याविषयी रुग्णांची प्रकरणे (केसेस) संगणकीय प्रणालीद्वारे सर्वांना दाखवल्या, तर काहींनी ‘विद्धकर्म’ आणि ‘अग्नीकर्म’ शरिरात कसे काय करते ? अशा पद्धतीने विषय सांगितले. यामध्ये विषय मांडून झाल्यानंतर ‘हे ज्ञान किंवा कर्तृत्व माझे नसून शास्त्रातील आहे. हे शास्त्र सांगण्यामध्ये कुठेही चूक झालेली असेल, तर ती माझी असेल; परंतु शास्त्र हे परिपूर्ण आहे’, असे सांगितले. कुणाच्याच सांगण्यामध्ये कर्तेपणा नव्हता. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून अल्प कालावधीमध्ये ‘विद्धकर्म’ आणि ‘अग्नीकर्म’ यांचे ज्ञान आत्मसात् केलेले वैद्य हे आयुर्वेदाविषयी कृतज्ञता व्यक्त करत होते.
५. कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळेच शिबिराला जायला मिळाले आणि अनेक सूत्रे शिकायला मिळाली, याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०२४)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘आयुर्वेद चिकित्से’विषयीचा संकल्प फलद्रूप होत असल्याचे जाणवणे !सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘पुढे हिंदु राष्ट्रात आयुर्वेद चिकित्साच असेल’, असे काही वर्षांपूर्वी सांगितले हाेते. गेल्या मासामध्ये ठाणे येथे ‘आरोग्य फेअर २०२४’ आणि आळंदी येथे ‘अग्नी आणि विद्ध कर्म चिकित्सा २०२४’ या दोन संमेलनामध्ये गेल्यानंतर ‘काही वर्षांतच आयुर्वेद चिकित्सा प्रधान चिकित्सा होईल’, असे पुढील सूत्रांवरून वाटले. १. पूर्वी आयुर्वेदानुसार उपचारपद्धत करणारे वैद्य अल्प होते. आता आयुर्वेदानुसार उपचार करणार्या वैद्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाजामध्येही आयुर्वेदाचे उपचार करून घेण्याविषयी जागरूकता वाढत आहे. २. सध्याचे आणि पूर्वीचे वैद्य आयुर्वेदानुसार उपचार करून त्यामुळे रुग्णांना झालेल्या लाभाची कागदपत्रे संग्रही करून ठेवत आहेत. त्यामुळे नवीन पिढीला सर्व कागदपत्रे दाखवून चिकित्सा करण्यातील आत्मविश्वास देत आहेत. ३. ‘आयुर्वेद उपचारपद्धतीमुळे जलद बरे वाटत नाही’, असा अपसमज दूर करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. वेदना लवकर न्यून होण्यासाठी अग्नी आणि विद्ध कर्म यांचे महत्त्व वैद्यांनी विद्यार्थ्यांना दाखवले. ४. कोरोना महामारीनंतर अनेकांना आयुर्वेदाच्या औषधांचा वापर करायला हवा, याविषयीचे महत्त्व पटले. संतांचा संकल्प कसा फलद्रूप होतो, हे पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी कृतज्ञता वाटली. – वैद्या सुश्री (कु.) माया पाटील |
‘विद्ध’ आणि ‘अग्नी’ कर्मामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन केलेले आणि सर्व वैद्यांसाठी गुरुतुल्य असणारे वैद्य चंद्रकुमार देशमुख !वैद्य रा.ब. गोगटे यांच्याकडून विद्ध आणि अग्नी कर्माचे ज्ञान घेऊन त्याचा रुग्णांमध्ये वापर करणारे, तसेच नवीन पिढीला याचा वापर कसा करायचा ? हे शिकवणारे वैद्य चंद्रकुमार देशमुख हे आजच्या पिढीसाठी गुरुतुल्य आहेत. नुकताच नेपाळ सरकारने त्यांचा ‘विश्व व्याख्याता’ हा पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. प्रसिद्धीचा हव्यास नसणारे, आयुर्वेदाचे ज्ञान जगभर व्हावे, ही तळमळ असणारे आणि आजच्या पिढीने आयुर्वेदाचे ज्ञान खर्या अर्थाने समजून घेऊन त्यानुसार रुग्णांवर उपचार करावेत, याची प्रचंड तळमळ असणारे तरुण आयुर्वेदाचार्य चंद्रकुमार देशमुख हे सर्व वैद्यांसाठी अनुकरणीय अन् मार्गदर्शक आहेत. त्यांचे अमूल्य मार्गदर्शन प्रत्यक्षात ऐकायला मिळणे, हे सर्व आयुर्वेदाचार्यांसाठी पर्वणीच असते, हे त्यांच्या पुढील गुणवैशिष्ट्यांमुळे लक्षात येते. १. वैद्य चंद्रकुमार देशमुख यांनी ‘विद्ध’ आणि ‘अग्नी’ कर्म यांचा सखोल अभ्यास केलेला आहे. ते या माध्यमातून रुग्णांवर नियमितपणे उपचार करत आहेत. यामुळे त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या रुग्णांमध्ये याचा कसा उपयोग होतो, याच्या ज्ञानाचे भांडार आहे. २. लहान मुलांमध्ये मेंदूची वाढ अल्प झालेले, मणक्यांचे सर्व प्रकारचे आजार, कोणत्याही प्रकारच्या वेदना, तसेच कोणतेही कठीण वाटणारे आजार आयुर्वेदाच्या उपचारांनी बरे करू शकतो, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. ३. आयुर्वेद चिकित्सा ‘अपुनर्भव चिकित्सा’ (आजार परत होऊ नये; म्हणून करावयाची चिकित्सा) आहे. आयुर्वेद उपचारपद्धतीचा वापर करून बरे केलेल्या रुग्णांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. यातून त्यांनी सर्व वैद्यांमध्ये आयुर्वेद उपचारपद्धतीचा वापर करण्याविषयी आत्मविश्वास निर्माण केला. ४. ‘अग्नी’ आणि ‘विद्ध’ कर्म यांसारखा विषय त्यांनी ३ घंटे अखंडपणे सर्वांसमोर मांडला. तो विषय ऐकतांना कुणालाही कंटाळा आला नाही. त्यांनी स्वतः सर्व अनुभवलेले असल्यामुळे वाणीमध्ये चैतन्य जाणवत होते. त्यांच्याकडे बोलतांना प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला आहे, असे लक्षात आले. ५. ते प्रसिद्धीपराङ्मुख आहेत. ‘आपण आपले कर्म करत रहायचे. फळ मिळणारच आहे; कारण आपण शास्त्रानुसार सर्व करतो, तर फळ मिळतेच’, अशी त्यांची श्रद्धा आहे, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा जाणवले. |