Krishna Janmabhoomi Case : हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या कृष्णकूपची पूजा करण्याची मिळाली अनुमती !

हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्‍वर भृगुवंशी आशुतोष पांडेय

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह मशिदीजवळील कृष्णकूपची (विहिरीची) पूजा करण्याची अनुमती हिंदूंना मिळाली आहे. याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्‍वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.

९ मार्च या दिवशी पांडेय यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मागणी केली होती की, परंपरागत पद्धतीने शीतला अष्टमीच्या दिवशी तेथील कृष्णकूपची पूजा करण्याची हिंदु महिलांना अनुमती मिळावी, तसेच तेथे मुसलमानांकडून कोणताही विरोध होऊ नये, याची व्यवस्था करावी. यानंतर मुख्य सचिवांनी वरिष्ठ पोलीस आयुक्तांना संबंधित विषयाचे परीक्षण करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्तांनी हिंदूंना पूजा करता येण्यासाठी व्यवस्था केली असून पूजा करण्याची अनुमती दिली आहे.