EX-Muslims movement : पाश्चात्त्य देशांत मोठ्या प्रमाणात चालू आहे ‘एक्स मुस्लिम्स’ चळवळ !
फ्रान्समध्ये तब्बल १५ सहस्त्र ‘एक्स मुस्लिम्स’, तर अमेरिकेत प्रतिवर्षी १ लाख मुसलमान करतात इस्लामचा त्याग !
(एक्स मुस्लिम्स म्हणजे इस्लाम त्यागणारे)
वॉशिंग्टन (अमेरिका) – जगात ख्रिस्त्यांनंतर मुसलमानांची संख्या सर्वाधिक आहे. आज जगभरात १८० कोटींहून अधिक लोक इस्लामला मानतात. एकीकडे तो सर्वाधिक वाढणारा पंथ आहे, तर दुसरीकडे त्याचा त्याग करणार्यांची संख्याही अत्यधिक आहे. अन्य पंथांनाही त्यांचे अनुयायी सोडत असल्याचे वेळोवेळी समोर आले असले, तरी इस्लाम आणि अन्य पंथ यांच्यात एक महत्त्वपूर्ण भेद आहे. इस्लाम त्यागण्याचा प्रयत्न करणार्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागतो. यांना ‘एक्स मुस्लिम्स’ म्हटले जाते आणि पाश्चात्त्य देशांत याने एका चळवळीचे रूप घेतले आहे. या चळवळीमुळे नव्याने इस्लाम त्यागणार्यांना एक आधारही मिळत असल्याचे समोर आले आहे. युरोपमधील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या फ्रान्समध्ये १५ सहस्त्र ‘एक्स मुस्लिम्स’ आहेत, तर अमेरिकेत प्रतिवर्षी १ लाख मुसलमान इस्लामचा त्याग करतात.
१. वर्ष २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालात असे दिसून आले की, मुसलमान कुटुंबात वाढलेल्या अमेरिकी प्रौढांपैकी तब्बल २३ टक्के लोक हे स्वत:ला ‘मुसलमान’ म्हणून ओळखत दाखवत नाहीत. इस्लाम त्यागणार्यांपैकी ७ टक्के लोकांनी सांगितले की, ते इस्लामच्या शिकवणीचा स्वीकार करत नाहीत. ‘अँग्लिकन इंक’ या संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेमधील एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अनुमाने ५५ टक्के ‘एक्स मुस्लिम्स’ नास्तिक बनले आहेत, अनुमाने २५ टक्के ख्रिस्ती बनले आहेत, तर इतर १० टक्क्यांचा धर्म अनिश्चित आहे.
२. मुसलमान समाजात धर्म सोडणे हे अत्यंत निषिद्ध कृत्य मानले जाते; परंतु ते उघडपणे जाहीर करण्यात एक मोठा संदेश दडलेला आहे. साधारणपणे इस्लामी देशांमध्ये इस्लाम सोडणे बेकायदेशीर आहे; परंतु युरोप आणि अमेरिका यांसारख्या ठिकाणीही जेथे ते कायदेशीर आहे, तेथे असे करणार्या माजी मसलमानांना पुष्कळ अडचणींचा सामना करावा लागतो. बीबीसीने वर्ष २०१५ मध्ये केलेल्या तपासणीत असे आढळून आले होते की, ब्रिटनमध्ये इस्लाम सोडणार्यांना छळाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत या ‘एक्स मुस्लिम्स’चे समाजासमोर येणे हे अन्यांना धैर्य देते.
अमेरिका आणि युरोप येथे कार्यरत ‘एक्स मुस्लिम्स’ चळवळ !१. वर्ष २००७ मध्ये जर्मनीमध्ये ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ एक्स मुस्लिम्स’ची स्थापना झाली. ‘एक्स मुस्लिम्स’साठी हे पहिले मोठे व्यासपीठ होते. तेव्हापासून पाश्चात्त्य देशांमध्ये असे अनेक गट उदयास आले आहेत, जे इस्लाम सोडणार्यांना साहाय्य करतात. २. अमेरिकेची ‘एक्स-मुस्लिम्स’ संघटना हे करणार्यांचे समर्थन करते. ते इस्लामच्या विरोधात जोरदार युक्तीवाद करतात आणि स्त्रियांना असमान वागणूक आणि बहुपत्नीत्व यांसारखे त्रासदायक सूत्रे समोर आणतात. ३. लॉस एंजेल्समध्ये रहाणारी वफा सुलतान ही अशीच एक माजी मुसलमान आहे, जी अरबी भाषिकांना संबोधित करते. ती त्यांना इस्लामच्या उणिवांविषयी सांगून इस्लाम सोडण्यास सांगते. ४. फ्रेंच पत्रकार झैनाब अल्-रिझाई या एक सुप्रसिद्ध ‘एक्स मुस्लिम’ असून त्या इस्लामवर कठोर टीका करतात. |