विनाअनुमती निवडणूक कार्यक्रम राबवल्यास कारवाई !

प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांची चेतावणी

सातारा, १८ मार्च  (वार्ता.) – सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवारांची पदयात्रा, प्रचार आणि उद्घाटन आदी कार्यक्रमांसाठी अनुमती घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुमतींसाठी ‘एक खिडकी’ योजना चालू करण्यात आली आहे. विनाअनुमती निवडणुकीशी संबंधित कोणताही कार्यक्रम राबवल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

प्रांताधिकारी भोसले पुढे म्हणाले, ‘‘निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सर्व पक्षांचे साहाय्य आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान, तर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. सातारा तालुका विधानसभा मतदारसंघात एकूण ४४५ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ३०३ मतदान केंद्रे ग्रामीण भागात, तर १४२ केंद्रे शहरी भागात आहेत. मतदारसंघात एकूण ३ लाख ३१ सहस्र ९७७ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ६७ सहस्र १०१ पुरुष, तर १ लाख ६४ सहस्र ८४८ महिला मतदार आहेत. निवडणूक आचारसंहितेमध्ये जी विकासकामे चालू आहेत, ती कामे करण्याची अनुमती आहे; मात्र नव्याने विकासकामांना मान्यता नाही. विविध राजकीय उमेदवारांच्या प्रचाराला शासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना सहभागी होता येणार नाही.