प्रेमळ, अनासक्त आणि श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणार्या (कै.) श्रीमती लक्ष्मीबाई नखाते (वय ८७ वर्षे) !
‘६.१.२०२३ या दिवशी माझ्या आजी (वडिलांची आई) श्रीमती लक्ष्मीबाई नखाते (वय ८७ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. आजींना ५ मुले, ४ सुना आणि ८ नातवंडे आहेत. आजींची सर्व मुले मुंबईत रहात असल्याने काही कालावधीसाठी त्या प्रत्येक मुलाकडे रहात असत; पण त्या कधीच कुणात अडकत नसत.
२. परिस्थिती स्वीकारणे
माझे आई-वडील (सौ. चारुलता नखाते आणि श्री. भारत नखाते) ठाणे येथील सनातनच्या सेवाकेंद्रात आणि मी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात रहात असल्याने आजी माझ्या काकांकडे मुंबईला रहात होत्या. आजींना पुष्कळ बरे नसल्याचे कळल्यानंतर काही दिवसांतच त्यांना आमच्या घरी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे आणले. वयोमानानुसार प्रवास करणे शक्य नसतांना, तसेच आजारपणामुळे थकवा असतांनाही त्यांनी कोणतीही तक्रार न करता मुंबई ते लांजा हा १० घंट्यांचा प्रवास केला.
३. श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणे
अ. आमचे घर कल्याण (जिल्हा ठाणे) येथे होते. आम्ही कल्याण येथून लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे स्थलांतरित होण्याचे ठरवले. तेव्हा कल्याणच्या घरातील साहित्य स्थलांतरित करतांना आम्ही आजींच्या खोलीतील भिंतीवर लावलेले श्रीकृष्णाचे चित्र काढले. त्या वेळी आजींनी मला विचारले, ‘‘येथे असलेले श्रीकृष्णाचे चित्र का काढले ? ते पुन्हा इकडेच लाव.’’ मी आजींना ‘स्थलांतर चालू आहे’, असे समजून सांगितल्यानंतर आजी काही बोलल्या नाहीत; पण त्यांच्या चेहरा पडला होता.
मी जेव्हा आजींना भेटायला त्यांच्या खोलीत जायचे, तेव्हा आजी ज्या भिंतीवर श्रीकृष्णाचे चित्र होते, त्या भिंतीकडे बघत असायच्या. त्या वेळी मी आजींना विचारले, ‘‘त्या रिकाम्या भिंतीकडे काय बघता ?’’ तेव्हा आजी म्हणाल्या, ‘‘तिथे कृष्ण होता ना !’’ ते ऐकून मला वाटले, ‘आजींना अजूनही तिथे कृष्णाचे चित्र दिसते.’ भिंतीवर चित्र नसतांनाही आजी जेवणापूर्वी प्रार्थना करतांना त्या भिंतीकडे बघून ‘कृष्णा, जेवायला ये’, असे म्हणत. आजी एवढ्या सहजतेने बोलत की, आम्हालाही ‘तेथे अजूनही श्रीकृष्णाचे चित्र आहे’, असे वाटायला लागले होते.
आ. त्यानंतर १ वर्षाने लांजा येथे नवीन घरी आजी प्रथमच आल्याने मी आजींना गमतीत विचारले, ‘‘आजी, कुणाच्या घरी आलात ?’’तेव्हा आजींनी लगेच उत्तर दिले, ‘‘कृष्णाच्या घरी आले !’’
४. प्रेमभाव
आजींना बरे नसल्याने बरेच साधक त्यांना भेटायला येत असत. तेव्हा आजी पलंगावरून उठून बसून सर्वांना प्रतिसाद देत असत. ‘सर्वांसाठी काहीतरी खायला कर’, असे त्या माझ्या आईला सांगत.
५. इतरांचा विचार करणे
माझ्या आईची आई आजारी असल्याने मी तिला भेटण्यासाठी नाशिकला जायला निघाले. तेव्हा मी या आजींना सांगितले, ‘‘नाशिकच्या आजीला पुष्कळ बरे नाही; म्हणून तिला भेटून येते.’’ त्या वेळी आजींनाही पुष्कळ बरे नव्हते, तरी त्यांनी मला ‘जाऊन ये’, असे मनापासून सांगितले. त्यांनी स्वतःचा विचार केला नाही.
६. जाणवलेले पालट
६ अ. पूर्वी आजींची खाण्याबद्दलची आवड-निवड जाणवायची; परंतु निधनापूर्वी काही मास आम्ही आजींना जे देऊ, ते त्या आनंदाने खात.
६ आ. नामजप केल्याने स्थिरता आल्याचे जाणवणे : आजींना शारीरिक त्रास होत असल्यास त्या पूर्वी अस्थिर व्हायच्या. आजी अधिक वेळ पलंगावर झोपून असायच्या. त्या वेळी त्यांचा अधिकाधिक जप व्हावा; म्हणून आम्ही त्यांना नामजप करण्यास सांगायचो. त्यानंतर आजीही आमचे लगेच ऐकून वैखरीतून नामजप करायच्या. त्या वेळी आजी स्थिर असल्याचे जाणवले.
६ इ. ‘डोळे बंद केल्यानंतर मला परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) दिसतात’, असे त्या सांगायच्या.
७. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. काकांच्या घरचे कुणीही साधनेत नाही; परंतु आजीच्या अंत्यविधीच्या वेळी वातावरणात दाब जाणवत नव्हता. वातावरणात शांतता आणि चैतन्य जाणवत होते.
आ. आजीची त्वचा पिवळसर दिसत होती.’
– कु. एकता नखाते ((कै.) श्रीमती लक्ष्मीबाई नखाते यांची नात (मुलाची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |