सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री. विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास
१८.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘श्री. विश्वास लोटलीकर यांचा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/774800.html
३. सेवेतून विविध अनुभूती येऊन पुष्कळ आनंद मिळणे आणि साधनाच करण्याचा निर्धार करणे
सर्व प्रसंगांतून गुरुदेवांनी वेळ येईल, तशी रहाण्याची सिद्धता करून घेतली. त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. मला पुष्कळ आनंद मिळायला लागला होता. निरनिराळ्या अनुभूती येत होत्या. त्या वेळी भंडारे आणि भजनेही चालायची. त्या वेळी ‘कधी एकदा कार्यालय संपेल आणि मी सेवेला जातो’, असे मला वाटायचे.
एका सत्संगात सत्संगसेवकाने ३ मित्रांची गोष्ट सांगितली होती. माणसाचा मृत्यू होतो. तेव्हा त्याचा पहिला मित्र, म्हणजे दागदागिने, पैसा-अडका, संपत्ती आपली साथ सोडतात; कारण अंगावरचे दागदागिने काढून घेतात. म्हणजे त्या गोष्टी इथेच रहातात. दुसरा मित्र, म्हणजे आपले नातेवाइक आपल्याला स्मशानापर्यंत सोडायला येतात. एकदा अग्नी दिला की, ते निघून जातात. तिसरा मित्र, म्हणजे ईश्वराचे नामस्मरण, चांगले कर्म हे या जन्मातच नव्हे, तर अनेक जन्मांत आपल्या समवेत येते आणि वाढत जाते. ते आपली साथ कधीच सोडत नाहीत. त्यामुळे मायेतील सर्व गोष्टी, ज्या इथेच रहाणार आहेत, त्यात अडकण्यापेक्षा नामजप आणि साधना अधिकाधिक केल्यानेच आपले कल्याण होईल’, ही गोष्ट माझ्या मनावर पक्की बिंबली होती.
४. स्वतःच्या समवेत मालवाहू गाडीही (ट्रक) पूर्णवेळ सेवेसाठी रुजू होणे
४ अ. ‘व्यवसाय बंद करून आपण अधिकाधिक सेवा करावी आणि स्वतःकडील मालवाहू गाडीही (ट्रक) गुरुसेवेत रुजू करावी’, असा दृढ निश्चय होणे : माझा वाहतुकीचा (ट्रान्सपोर्टचा) व्यवसाय होता. माझी मालवाहू गाडी (ट्रक) प्रतिदिन भिवंडी ते वाशी येथील आस्थापनांमध्ये (कंपन्यांमध्ये) जात होती. ती मालवाहू गाडी सकाळी जाऊन रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत घरी यायची. अधून-मधून गाडी येण्यास विलंबही होत असे. एके दिवशी माझी प्रकृती बरी नव्हती. मला पुष्कळ ताप आला होता. त्याच दिवशी माझी मालवाहू गाडीही रात्री १ वाजेपर्यंत आली नाही. मला काळजीने झोप लागत नव्हती. त्यामुळे मी गाडी पहाण्यासाठी गेलो. मार्गात तुर्भे नाक्यापासून थोड्या अंतरावर गेल्यावर माझा ताप वाढला आणि मला उलट्या होऊ लागल्या. तेथे माझ्या डोळ्यांवर अंधारी आली. थोड्या वेळाने मालवाहू गाडी आली आणि मी त्या गाडीतून घरी आलो. तेव्हा माझ्या मनात आले, ‘पैसा-अडका काय कामाचा ? मला आता देवाविना कोण साहाय्य करणार होते ?’ माझा नामजप आणि प्रार्थना चालू होती. मला केवळ आणि केवळ गुरुकृपा अन् नामजपच वाचवू शकेल. हा मनाचा निश्चय पक्का झाला आणि मी ठरवले हा व्यवसाय बंद करून आपण अधिकाधिक सेवा करावी अन् ‘ही मालवाहू गाडीही गुरुसेवेत रुजू करावी.’ नंतर मी माझ्याजवळ असलेले सर्व पैसे व्यय करून मालवाहू गाडीच्या दुरुस्तीचे काम करून घेतले आणि उत्तरदायी साधकांना ती अर्पण करण्याचा माझा विचार बोलून दाखवला.
४ आ. मालवाहू गाडीचा पहिला धर्मरथ बनवणे आणि तो रथ महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटक अशा ठिकाणी सेवेसाठी जाणे : तेव्हा मी गुरुदेवांना भेटायला गेलो असता ते म्हणाले, ‘‘तुमची गाडी आपण घेऊया.’’ अशा प्रकारे ती गाडी सेवेसाठी रुजू झाली. मला माझ्या समवेत ती गाडीही गुरुसेवा करणार आहे, याचा पुष्कळ आनंद झाला. त्या गाडीचा पहिला धर्मरथ बनला. तो रथ सर्वदूर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा ठिकाणी सेवेसाठी गेला. अशा प्रकारे गुरुदेवांनी माझी आणि मालवाहू गाडीची साधना करून घेतली. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
४ इ. गुरुदेवांनी मायेपासून दूर करणे : गुरुदेवांनी माझे मायेचे आकर्षण न्यून करून माझ्याकडून त्यागही करून घेतला. माझ्या जवळील सर्व पैसे व्यय (खर्च) करून मी मालवाहू गाडीचा साचा (ट्रकची बॉडी) बनवला होता. पुन्हा तिचा धर्मरथ केला.
५. साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा
५ अ. साधकाच्या मनातील ओळखून स्वतःमध्ये अडकू न देणारे परात्पर गुरु डॉक्टर ! : परात्पर गुरु डॉक्टर यांची डोंबिवलीमध्ये सभा घेण्याचे ठरले होते. सभेचा प्रसार झाल्यावर प.पू. गुरुदेवांची सभा झाली. तेव्हा त्यांच्या भोजनाचे नियोजन आमच्या घरी केले होते; परंतु अकस्मात् नियोजन पालटले. तेव्हा मला थोडे वाईट वाटले; परंतु ईश्वराला सर्व समजते. त्यांनी मला जवळ बोलावले आणि म्हणाले, ‘‘तुमच्याकडील कार्यक्रम पालटला आहे का ? मी आहेच तुमच्या घरी ! जेथे जाणे आवश्यक आहे, तेथे जातो.’’
५ आ. साधकांना प्रीतीने बांधून ठेवणे : मी अधून-मधून काही कामानिमित्त मुंबई सेवाकेंद्रात जात असे. तेव्हा गुरुदेव आमच्याकडून सूक्ष्मातील प्रयोग करून घ्यायचे. ते मला सांगायचे, ‘‘वा ! बरोबर आहे. तुमची साधना चांगली चालली आहे.’’ प.पू. गुरुदेव सर्व साधकांना प्रीतीने बांधून ठेवत असत.
५ इ. प.पू. गुरुदेवांनी सांगितल्यानुसार चाकरीचे त्यागपत्र देता न येणे आणि निवृत्त होईपर्यंत चाकरी करणे : मी सतत धर्मप्रसाराला जात असल्यामुळे माझे चाकरीकडे दुर्लक्ष होत होते; म्हणून मीप.पू. गुरुदेवांना विचारले, ‘‘चाकरीचे त्यागपत्र (राजीनामा) द्यावे का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘योग्य वेळ आल्यावर मी सांगीन. सध्या नको.’’ चाकरीमध्ये माझा सेवेमुळे पुष्कळ खंड होत होता. त्यामुळे पदाधिकारी लोकांची बोलणी ऐकायला लागायची. त्या त्रासाला कंटाळून मी परत प.पू. गुरुदेवांना सर्व स्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यागपत्र देऊन काय होते, ते बघा !’’ मी त्यागपत्र दिल्यावर मला माझ्या वरिष्ठ अधिकार्यांनी पुष्कळ समजावले. त्यांनी मला सांगितले, ‘‘मी तुझ्या त्यागपत्रावर स्वाक्षरी करणार नाही.’’ नंतर त्यांनी मला पुष्कळ साहाय्य केले. ही गोष्ट मी प.पू. गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘वा ! छान ! मी सांगितले होते ना ! कार्यालयामध्ये चांगली माणसे हवी असतात.’’ अशा प्रकारे मी निवृत्त होईपर्यंत हीच चाकरी केली.
५ ई. साधकाच्या मनातील ओळखून त्याला आनंद देणारे परात्पर गुरु डॉक्टर !
५ ई १. गुरुदेवांनी स्वतःच बोलावून साधकाला भेटणे आणि आनंद देणे : पूर्वी मी माझ्या वाढदिवसाला प.पू. गुरुदेवांना भेटायला गोव्याला जात असे. तेव्हा तेथील साधक ‘आज प.पू. गुरुदेवांची भेट होणार नाही’, असे मला सांगत असत; परंतु १० ते १५ मिनिटांनी प.पू. गुरुदेव स्वतःहून यायचे आणि मला बोलावून घ्यायचे. माझी भेट व्हायची. मग मी आनंदाने परत जात असे.
५ ई २. ‘प.पू. गुरुदेवांना साष्टांग नमस्कार करावा’, असा विचार मनात आल्यावर प.पू. गुरुदेवांनी हा विचार ओळखून नमस्कार करण्यास सांगणे : अशाच एका वाढदिवसाला मी गोव्याला गेलो अन् प.पू. गुरुदेवांची भेट व्हावी; म्हणून बसलो असतांना प.पू. गुरुदेवांनी मला बोलावून घेतले. आम्ही दोघे (मी आणि माझी पत्नी) भेटण्यासाठी गेलो असतांना बोलून झाल्यावर माझ्या मनात ‘प.पू. गुरुदेवांना साष्टांग नमस्कार करावा’, असा विचार आला. २ मिनिटांत प.पू. गुरुदेव उभे राहिले आणि मला म्हणाले, ‘‘काय, नमस्कार करायचा आहे ना ! करा नमस्कार.’’ नंतर मी साष्टांग नमस्कार केला. माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते. माझा देव माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो.
६. आध्यात्मिक त्रास चालू होणे
जसजशी माझी साधना वाढू लागली, तसतसा मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला. मी घरामधून बाहेर निघाल्यावर तिठ्यावर (तीन रस्ते एकत्रित येतात, तो रस्ता) मला मेंढ्यांच्या अंगाची दुर्गंधी यायची. तेव्हा अंगावरील केस उभे रहायचे आणि फारच त्रास व्हायचा; म्हणून मी निरनिराळ्या मार्गावरून जात असे; परंतु तो त्रास प्रत्येक वेळी तिठ्याच्या ठिकाणी होत असे. हे मी कुणाशीही बोललो नव्हतो.
६ अ. प.पू. गुरुदेवांनी सांगितल्यानुसार पू. जोशीबाबांकडे उपायांसाठी जाणे आणि तो त्रास निघून जाणे : एक दिवस सद्गुरु सत्यवान कदम यांचा मला भ्रमणभाष आला आणि त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला होणार्या त्रासासाठी प.पू. गुरुदेवांनी घाटकोपरच्या पू. जोशीबाबांकडे जायला सांगितले आहे.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘मला कोणत्याही संतांकडे किंवा बाबांकडे जावेसे वाटत नाही. माझे गुरु माझे रक्षण करतील.’’ एवढे सांगितल्यावर त्यांनी भ्रमणभाष ठेवला. नंतर पुन्हा ८ ते १० दिवसांनी भ्रमणभाष आला.
‘प.पू. गुरुदेवांनी सांगितले आहे की, मी सांगतो म्हणून जा.’ मग मी ‘हो’ म्हटले. मी पू. जोशीबाबांकडे जाऊ लागलो. नंतर माझा तो त्रास निघून गेला; परंतु मला हे ठाऊक आहे की, हे प.पू. गुरुदेवांनीच केले.
‘प.पू. गुरुदेव स्वतःकडे कुठलेही श्रेय घेत नाहीत’, हे माझ्या लक्षात आले. त्या आजारातून मी बरा झालो. त्या वेळी प.पू. गुरुदेव मुंबई सेवाकेंद्रात रहात होते आणि मी डोंबिवलीला रहात होतो, तरीही त्यांना मला होणारा त्रास समजला. आपल्याला होणारे त्रास ते जाणतात आणि त्यातून ते बाहेरही काढतात.’
– श्री. विश्वास लोटलीकर, म्हार्दाेळ, फोंडा, गोवा. (२६.४.२०२३)
(क्रमशः)
|
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/775518.html