परिपक्वता आणि नेतृत्वगुण असलेले सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) !
‘पू. भार्गवराम यांची आधीची शाळा धर्मनिरपेक्ष विचारसरणीची असल्याने हल्लीच आम्ही त्यांना ‘अमृता विद्यालयम्’ या शाळेत घातले. पू. भार्गवराम शाळेत नवीन असल्याने शाळेतल्या शिक्षकांना ‘ते कोण आहेत ? आणि त्यांची वागणूक कशी आहे ?’,याची काहीच कल्पना नव्हती. शाळेच्या पहिल्याच दिवशी घडलेला पुढील प्रसंग पू. भार्गवराम यांच्या शिक्षिकेने आम्हाला सांगितला.
शाळेच्या प्रांगणात सर्व मुले एकत्र जमली असतांना अकस्मात् पाऊस पडणे, सर्व मुले इतरत्र धावत असतांना पू. भार्गवराम यांनी त्यांना एकत्र करून एका झाडाखाली घेऊन जाणे आणि पाऊस थांबण्यासाठी सर्वांना देवाकडे प्रार्थना करण्यास सांगणे
नवीन शाळेतील पहिल्या दिवशी सर्व मुले शाळेच्या प्रांगणात प्रार्थनेसाठी जमली होती. प्रार्थना चालू असतांना अकस्मात् पाऊस पडू लागला आणि सर्व मुले आश्रयासाठी इकडे तिकडे पळू लागली. त्या वेळी पू. भार्गवराम यांच्या वर्गशिक्षिकेने पाहिले, ‘मोठी मुले पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी पळत होती. तेव्हा पू. भार्गवराम आपल्या वर्गातल्या सर्व मुलांना (ती मुले त्यांच्यासाठी अगदी नवीन आणि अनोळखी होती) एकत्र करून एका झाडाखाली घेऊन गेले. एवढेच नाही, तर ‘पावसापासून सर्व मुले सुरक्षित आहेत ना ?’, याचीही ते निश्चिती करत होते. सर्व मुले झाडाखाली एकत्र आल्यावर पू. भार्गवराम यांनी सर्वांना ‘पाऊस थांबण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया’, असे नम्रपणे सांगितले. केवळ ६ वर्षांच्या पू. भार्गवराम यांच्यातील परिपक्वता, नेतृत्व आणि इतरांची काळजी घेणे, हे गुण पाहून त्यांची वर्गशिक्षिका आश्चर्यचकित झाली. त्यांना हे असामान्य वाटले. त्यांनी हा प्रसंग पू. भार्गवराम यांच्या आईला सांगितला. तेव्हा आम्हाला जाणवले, ‘आता हळूहळू सामान्य लोकांनाही पू. भार्गवराम सर्वसाधारण बालक नाहीत’, हे समजू लागले आहे.
पू. भार्गवराम यांच्या रूपात आम्हाला बालसंत दिले आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी दिली, यासाठी मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. भरत प्रभु (पू. भार्गवराम यांचे वडील), मंगळुरू, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (२८.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |