भारताला घटनात्मकरित्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
|
मुंबई – देशासमोर खलिस्तान, जिहाद, आतंकवाद यांसह अन्य अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जात घटनात्मक मार्गाने भारत हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले. १७ मार्च या दिवशी कांजूरमार्ग येथील महावीर मॅजेस्टिक सभागृह येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला आणि हिंदु जनजागृती समितीच्या मराठवाडा समन्वयक कु. प्रियांका लोणे उपस्थित होत्या.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते, विविध संप्रदाय, मंडळे यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समिती स्थापन करून संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला. या वेळी मार्गदर्शन करतांना भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी आवाहन केले की, हिंदु राष्ट्र आणायचे असेल, तर हिंदु समाजाला प्राणवान बनवावे लागेल. हिंदु बांधवांनी धर्मग्रंथांतील ज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. कु. प्रियांका लोणे यांनी सांगितले ‘हिंदूंवर विविध माध्यमांतून होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे. हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा आणि भूमिका निश्चित करून याविषयीचे कार्य होण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समिती सर्व स्तरांवर कार्यान्वित करणे आवश्यक आहे.’’
अधिवेशनात ‘हिंदु धर्मरक्षणाचे कार्य’, ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’ या विषयांवर परिसंवाद घेण्यात आला. महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील गड-दुर्ग यांसह अन्य ऐतिहासिक स्थळे यांवरील अतिक्रमण रोखून त्यांचे संवर्धन करण्याचा निश्चय या वेळी करण्यात आला. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कार्यात अधिकाधिक मंदिर विश्वस्तांना जोडून घेणे, तसेच येत्या काळात मंदिर-न्यास परिषद आणि गड-दुर्ग परिषद आयोजित करण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. या अधिवेशनात विविध सत्रांत विविध संघटनेचे प्रतिनिधी आणि अन्य मान्यवर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी राष्ट्र आणि धर्मकार्य करतांना साधना करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.